अधीक्षक/जिल्हा वक्फ अधिकारी प्रशिक्षणानंतरही नेमणुकीच्या प्रतीक्षेत : लिपिकांकडून गैरप्रकार करवून घेणे सोयीचे असल्याची चर्चा

अधीक्षक/जिल्हा वक्फ अधिकारी प्रशिक्षणानंतरही नेमणुकीच्या प्रतीक्षेत : लिपिकांकडून गैरप्रकार करवून घेणे सोयीचे असल्याची चर्चा

औरंगाबाद, २३ मे : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळासाठी एकूण १७९ पदे मंजूर केलेली आहे. त्या मंजूर रचनेनुसार मंडळाचे मुख्यालय असलेल्या ठिकाणी खालील नमूद शाखा राहतील आणि त्या प्रत्येक शाखेवर अधीक्षकाची नेमणूक असेल. तसेच महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या ठिकाणी जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल. असे या मंजूर आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद आहे.

 (१) नोंदणी व भंडार शाखा, (२) आस्थापना व कजाअत शाखा, (३) अभिलेख शाखा, (४) लेखा शाखा, (५) लेखापरीक्षण शाखा, (६) संगणक शाखा (७) बैठक व सुनावणी शाखा, (८) विधी शाखा, (९) कोकण विभाग शाखा, (१०) पुणे विभाग शाखा, (११) नाशिक विभाग शाखा, (१२) विदर्भ विभाग शाखा, (१३) औरंगाबाद विभाग शाखा आणि (१४) नांदेड विभाग शाखा.

         परंतु महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अधीक्षकांची भरती झालेली नसल्याने लेखा शाखा वगळता कोणत्याही शाखेवर अधीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नव्हती. आणि कोकण, पुणे, नाशिक, विदर्भ, औरंगाबाद आणि नांदेड या विभागीय शाखा  अस्तित्वातच नव्हत्या.  उर्वरित शाखांवर इन्चार्ज म्हणून लिपिकांचीच नेमणूक केलेली आहे. तसेच मराठवाड्यासह इतर जिल्ह्यात जिल्हा वक्फ अधिकारी पदाचा कार्यभार सुद्धा लिपिकांकडेच सोपवलेला आहे.

          महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने मागील वर्षी अधीक्षक आणि जिल्हा वक्फ अधिकारी या पदांच्या २५ पदभरतीसाठी  स्पर्धा परीक्षा घेतली होती.  त्यानुसार यावर्षी ही सर्व २५ पदे भरण्यात आली असून निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे प्रशिक्षण नाशिक येथील विभागीय महसूल प्रबोधिनी मध्ये पूर्ण झाले आहे. प्रशिक्षण घेऊन परत आल्यानंतरही या अधीक्षक/जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांना "अज्ञात कारणाने" अद्यापही नेमणूक देण्यात आलेली नाही.

          वक्फ मंडळातील सर्व शाखांवर अजूनही लिपिकच प्रभारी म्हणून कारभार सांभाळत आहेत. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हा वक्फ अधिकारी पदाचा कारभार पण लिपिकच सांभाळत आहेत. 

      नवीन भरती झालेल्या २५ अधिकाऱ्यांपैकी वक्फ मंडळाचे मुख्यालयाचे ठिकाणी असलेल्या कमीत कमी  (१) नोंदणी व भंडार शाखा, (२) आस्थापना व कजाअत शाखा, (३) अभिलेख शाखा, (४) लेखा शाखा, (५) लेखापरीक्षण शाखा, (६) संगणक शाखा (७) बैठक व सुनावणी शाखा, (८) विधी शाखा या शाखांवर अधीक्षक म्हणून आणि मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच मुंबई, ठाणे, पुणे, आणि नाशिक या जिल्ह्यात  तात्काळ नेमणूक करण्यात आल्यास "नाजाएज़ सीईओ"च्या अधिपत्याखाली  वक्फ मंडळात सुरू असलेल्या बिनधास्त गैरकारभाराला आळा बसेल अशी चर्चा वक्फ वर्तुळात सुरू आहे.