'...तर मराठवाड्याचा विकास होणार कसा' : खा. इम्तियाज जलील भडकले रेल्वे अधिकाऱ्यांवर
औरंगाबाद : (दि 20 ऑक्टोबर) मराठवाड्याने मागणी केलेल्या नव्या रेल्वे लाईनवर सर्वेक्षणात फायदा मिळणार नसल्याचे रेल्वेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगताच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील रेल्वे प्रश्नांवरील बैठकीत चांगलेच भडकले. आधीच मागास भाग त्यात नवीन रेल्वे येणार नसल्यास या भागाचा विकास कसा होईल, असा संतापजनक सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. वातावरण चांगलेच तापत असल्याने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले.
मराठवाड्यातील खासदारांची आज औरंगाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वेच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक झाली. अंदाजे दोन दशकांनंतर रेल्वेची बैठक औरंगाबादेत होत असल्याने मराठवाड्यातील रेल्वे प्रवासी, संघटनांचे बैठकीकडे लक्ष होते. बैठकीत केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, खासदार फौजिया खान आदींची उपस्थिती होती. यावेळी मराठवाड्यातील रेल्वेचे विद्युतीकरण आणि नवीन रेल्वे सुरु करण्यात याव्यात ही मागणी पुढे आली. यावर बैठकीतील मध्य रेल्वेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी, सर्वेक्षणात या मार्गावर फायदा नसल्याचे सांगितले.
यामुळे खासदार इम्तियाज जलील चांगलेच भडकले. मराठवाडा आधीच मागास असल्याने त्याची तुलना इतरांशी होऊ शकत नाही. आधीच भागास त्यात विद्युतीकरण, नवीन रेल्वे नसल्यास या भागाचा विकास कसा होईल असा संतप्त सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. बैठकीत वातावरण चांगलेच तापत असल्याने केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मध्यस्थी केली. दानवे यांनी, तुमच्या सर्व मागण्या मान्य आहेत असे आश्वासन खासदार इम्तियाज जलील यांना देत वातावरण शांत केले. तसेच यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी मराठवाड्याचे रेल्वे प्रश्न निकाली काढण्यासाठी कोकण रेल्वेच्या धर्तीवर मराठवाडा रेल्वे डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनची स्थापना करावी अशीही मागणी केली.
रेल्वे बैठकीत खासदार इम्तियाज जलील यांनी मराठवाडा रेल्वेच्या विकासासंदर्भात विविध मुद्दे उपस्थित केले
• मराठवाड्यातील रेल्वे विकासासंदर्भात नेहमी प्रमाणे अन्याय होत असल्याने मराठवाड्यातील रेल्वेचा सर्वांगिण विकास करण्यासाठी कोकण रेल्वे डेव्हलपमेंट कॉरपोरेशनच्या धर्तीवर मराठवाडा रेल्वे डेल्हलपमेंट कॉरपोरेशन स्थापन करण्यात यावे.
• मराठवाड्याच्या रेल्वे विकासासंदर्भातील सर्व वर्षानुवर्षाचे प्रलंबित मागण्या, प्रकल्पे, कामे करण्यासाठी व मराठवाड्यात रेल्वे विकासाकरिता भरवी निधी उपलब्ध होण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे विभागातुन मराठवडयास सेंट्रल रल्वे सोबत जोडण्यात यावे.
• शिवाजीनगर येथील भुयारी मार्गाचे एका महिण्यात काम सुरु झाले नाही तर रेलरोको जनआंदोलन करण्यात येणार आहे. राज्य शासनाने त्यांच्या हिश्याचे ५०³ देणार असल्याचे पत्र दिलेले आहे तरी सुध्दा काम प्रलंबितच का आहे ?
• औरंगाबाद येथे पीटलाईन करण्यात यावे, अनेक वर्षापासुनची प्रलंबित मागणी असुन औरंगाबाद येथेच पीटलाईन व्हावे जालना किंवा इतरत्र ठिकाणी हलविण्यात येवु नये
• फायदा होत नाही म्हणुन मराठवाड्याचे प्रकल्प व कामे रद्द करण्यात येत असुन सहानुभुतीपुर्वक विचार करुन तात्काळ कामास सुरुवात करावी, नाही तर मराठवाड्याचा कधीच विकास होणार नाही
• रोटेगाव – कोपरगांव २२ किमी रेल्वे रुळाचे काम २०१७-१८ साली मंजुर असुन आजपर्यंत त्याचा सर्वेच होत असल्याने त्यास तात्काळ पुर्ण करण्यात यावे.
• दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने एकूण ४०१४.०८ कि.मी. चे विद्युतीकरण करण्यात आले आहे, त्यामध्ये सिकंदराबाद – ११८९.९०, विजयवाडा – ९२५.८६, गुंटाकाल – ११५२.५८, गुंटुर – ६२९.१४ किमी चे विद्युतीकरण करण्यात आले असुन नांदेड म्हणजे मराठवाड्यास फक्त ३५ कि.मी चेच विद्युतीकरण करण्यात आले आहे. हा दुजाभाव का करण्यात आला ? याचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी द्यावे असे खासदार यांनी सांगितले
• औरंगाबाद – चालीसगाव ८८ किमी रेल्वे रुळाची मागणी प्रलंबितच आहे, ती तातात्काळ पुर्ण करण्यात यावी.
• मुकुंदवाडी येथे स्टॉपेज देण्यात यावे.
• विद्यार्थी, कंपनी व इतर कामगारांना पॅसेंजर साठी रात्री १.३० वाजेपर्यंत वाट पाहावी लागते म्हणुन तात्काळ विद्यार्थी, कामगारांसाठी विशेष नविन पॅसेंजर सुरु करण्यात यावी.