उघड्या डिप्यांना फाटके तात्काळ फाटके बसवा अन्यथा तिव्र आंदोलन : प्रहार जनशक्ती पार्टीचा इशारा
मलकापूर : मलकापूर शहरातील अनेक भागातील वीज वितरण कंपनीच्या इलेक्ट्रीक डिप्या ह्या उघड्या अवस्थेत असून याठिकाणी शॉक लागण्याच्या घटना घडण्या बरोबरच एखादवेळी मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शहरातील अशा उघड्या स्वरूपात असलेल्या व मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या डिप्यांना तात्काळ फाटके बसविण्यात यावी, अन्यथा २३ सप्टेंंबर रोजी अशा डिप्यांना चपलांचा हार घालून वीज वितरण कंपनीचा निषेध नोंदविण्यात येईल, असा इशारावजा निवेदन आज १७ सप्टेंबर रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टप यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.
वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार सर्वशृत असाच आहे. कोरोनाच्या काळातही वीज ग्राहकांना केवळ वसुलीच्या नावाखाली त्रास देण्याचे काम या वीज वितरण कंपनीकडून केले जात असतांना मात्र वीज वितरण कंपनीला त्यांच्या कर्तव्याची जाणिवच जणू नसल्याचे शहरात दिसत आहे.
शहरातील अनेक भागात वीज वितरण कंपनीकडून लावण्यात आलेल्या विद्युत डिप्यांची फाटके ही गायब आहेत तर काही ठिकाणी फाटके ही लटकलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे धोका निर्माण होवू शकणा-या या डिप्या उघड्याच स्वरूपात अनेक ठिकाणी दिसून येतात. काही डिप्यांमध्ये तर असलेले फ्युज हे उघडे असून काही ठिकाणीतर केवळ फ्युज पण नाही तर तार टाकुन विद्युत पुरवठा सुरू करण्यात आलेला दिसून येत आहे. त्यामुळे एखाद वेळी अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
मागील आठवड्यात चाळीस बिघा परिसरात एका गाईने अशाच उघड्या डिपीमध्ये तोंड टाकल्याने तिचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तरी सुध्दा वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना जाग आली नाही व त्यांच्याकडून शहरातील अशा डिप्यांना फाटके बसविण्या बाबत कुठलीही उपाययोजना केली नाही. तेव्हा येत्या ७ दिवसात शहरातील अशा उघड्या डिप्यांना व अपघाताला आमंत्रण देवू पाहणाऱ्या डिप्यांना वीज वितरण कंपनीकडून फाटके बसविण्यात न आल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वीज वितरण कंपनीचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येवून या डिप्यांना चपलांचा हार घालण्यात येईल, असा इशारा अजय टप यांनी दिला आहे.