राष्ट्रवादीचे दादा भाजपच्या दादांवर भारी

राष्ट्रवादीचे दादा भाजपच्या दादांवर भारी

     भाजपचे सध्या एकच ध्येय आहे ते म्हणजे काहीही करुन २०२४ सालची सार्वत्रिक निवडणूक जिंकायचीच आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी बसवायचे. एकदा का दिल्लीची सत्ता हाती आली की विविध राज्यात जरी जनतेने निवडून दिले नाही तरी यंत्रणांना हाताशी धरून सत्ता कशी मिळवायची यात भाजपचा हातखंडा आहे. मग त्यासाठी कितीही वैचारिक मतभेद असले, आपणच भ्रष्टाचाराचे आरोप केलेले असले तरी सत्ताकारणासाठी भाजपला कोणीही चालतो आणि ऐन केन प्रकाराने सत्ताप्राप्तीसाठी आजचा नव भाजप काहीही करू शकतो हे अनेकदा अधोरेखित झाले आहे.

      गेल्या वर्षी राज्यात भाजपने ऐकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांना शिवसेनेतून फोडले आणि सत्तांतर केले, मात्र या सगळ्या घड़ामोडीत शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून जुलैमध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून अजित दादांना थेट उपमुख्यमंत्रीपदी बसवले. दादांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिल्याची वंदता आहे.

      अजितदादांचा पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात चांगला प्रभाव आहे. त्यांची कार्यशीलता तर सर्वाना परिचित आहे. पवार साहेबांचे पुतणे म्हणून ते राजकारणात आले मात्र कालांतराने त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. सडेतोड स्वभाव, प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव. पुणे जिल्हा ही त्यांची कर्मभूमी, पुणे जिल्हयात 'एकच वादा अजित दादा' मात्र गेल्या निवडणुकीत भाजपचे कोल्हापुरातील चंद्रकात दादा पाटील यांनी पुण्यातून निवडणूक लढली आणि जिंकली. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते पुण्याचे पालकमंत्री होते, मात्र अजितदादांचा मंत्रिमंडळात प्रवेश झाला तेव्हा पासून पालकमंत्रीपदा साठी अजित दादां आग्रह धरुन होते. अखेर दोन दिवसापूर्वी पुण्याचे पालकमंत्रीपद अजितदादांना देणे भाग पडले आणि चंद्रकांत दादांना हटवले गेले.

       हल्ली हल्ली अजित दादा रागावतात मोक्याच्या क्षणी आजारी पडतात, पण लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपला सगळे काही सहन करावे लागणार आहे. भाजपचे अनेक नेते वारंवार अजितदादांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून चुकीने करतात, मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही भविष्यात योग्य वेळी अजितदादांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवु असे स्पष्ट केले, अर्थात राजकारणात कधीही काहीही घड़ू शकते.

     १०५ आमदार असूनही भाजपला दुसऱ्यांना मुख्यमंत्री पदावर बसवावे लागते आहे मग 'मी पुन्हा येईन' च्या स्वप्नाचे काय? या सगळ्या घडामोडींमुळे भाजप मध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे. मेगाभरती केलेल्या बाहेरच्यांचीच पालखी किती काळ खांद्यावर घेऊन मिरवायची? त्याग करण्याचा आजचा काळ नाही.

-अनंत बोरसे