प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा शिंदे गटाला जाहीर पाठींबा
मुंबई: प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने बुधवारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितित जाहीर पाठींबा देत युती करण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेब भवनात आयोजित करण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेत प्रा.कवाडे यांनी हा निर्णय जाहीर केला.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रमाण मानून सहा महिन्यांपूर्वी आम्ही राज्यात सत्तांतर घडवून आणले. त्यानंतर सातत्याने लोकाभिमुख निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. याच निर्णयांनी प्रभावित होऊन पीपल्स रिपब्लिकन पक्षाने आम्हाला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
महाविकास आघाडीत असताना ज्या कामासाठी पाठपुरावा केला तरीही जी कामे अपूर्ण राहिली ती आमच्या सरकारने पूर्ण करण्याची तयारी दाखवल्याने त्यांनी आम्हाला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. नामांतराच्या लढ्यात प्रा.कवाडे यांचा लॉंग मार्च प्रचंड गाजला होता. तोच मार्च आता योग्य ठिकाणी पोहोचला असल्याचे सांगून त्यांचे मनापासून स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यकत केले.
याप्रसंगी खासदार गजानन कीर्तीकर, माजी खासदार आंनदराव अडसूळ, खासदार राहुल शेवाळे, आमदार संजय शिरसाट, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, प्रवक्ते राहुल लोंढे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७