हात छाटायला निघालात; तुमची जीभ छाटली तर...!

हात छाटायला निघालात तुमची जीभ छाटली तर...!
विधानसभेच्या मोर्शी-वरूड मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याला कुणी धक्का लावला तर तलवारीने हात छाटून टाकीन, अशी उघड धमकी दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटून त्याच्यात धडकी भरविली होती. आमदार देवेंद्र भुयार यांनी भरदिवसा त्यांच्या लेखी गनिम ठरलेल्यांचे थेट हात कलम करण्याची बात करीत त्यांच्या राजकीय विरोधकांच्या छातीत धडकी भरविण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे ’ओपन चैलेंज’ माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे सुपुत्र विक्रम ठाकरे यांनी स्विकारले एवढेच नव्हे तर दोन हात करण्यासाठी वरुडच्या केदार चौकात अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांच्या पुतल्यासमोरची जागा निश्चित केली. त्यानुसार ते तेथे पोहोचले, मात्र आमदार देवेंद्र भुयार कुठल्या बिळात दडून बसले, त्याचा सुगावा मात्र अद्यापी लागू शकलेला नाही. आमदार देवेंद्र भुयार यांनी विक्रम ठाकरे यांना ललकारून 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा शंखनाद केलेला आहे. त्याशिवाय आमदार भुयार यांच्या डरकाळीचा दुसरा अर्थ नाही.
निवडणुका आल्या की पाटील विरुद्ध देशमुख असा सामना रंगवला जातो. जातीचे विष पेरले जाते. मुंबईच्या ठाकरेंंची दहशत काल, आज आहे आणि उद्याही असेल. तुमची दहशत नदीच्या काठापर्यंतच आहे. आमच्या नादाला लागायचे नाही. शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत जाणीवपूर्वक धक्काबुक्की केली, पण याद राखा यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याना धक्का लावला तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही. जुना देवेंद्र भुयार अंगात आणला तर तुमची पाटीलकी काढल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी आमदार देवेंद्र भुयार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या साक्षीने ठाकरे गटाला दिल्याचे स्पष्ट आहे.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख (रा. जरूड) तसेच माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे (रा. हातुर्णा) एकमेकांचे मित्र असून त्यांच्यातील कौटुंबिक संबंध जिव्हाळ्याचे असले तरी राजकीय हाडवैर तेवढेच तलवारीच्या पात्यासारखे धारदार आहे. हर्षवर्धन देशमुख शिस्तप्रिय आणि स्पष्टवक्ता म्हणून परिचित आहेत. त्यांनी 1990 मध्ये अपक्ष व 1995 मध्ये काँग्रेसतर्फे तर 1999 मध्ये नरेशचंद्र ठाकरे यांनी मोर्शी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. 2004 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी युतीत मोर्शी मतदारसंघ काँग्रेसच्या वाटयाला गेल्याने राष्ट्रवादीचे हर्षवर्धन देशमुख यांनी बंडखोरी करीत विनय कोरे यांच्या जनसुराज्य पार्टीतर्फे निवडणूक लढवित नरेशचंद्र ठाकरे यांचा कडेलोट केला. बंडखोरीसाठी राष्ट्रवादीने त्यांना पक्षातून निलंबित केले होते, परंतु त्यांची ती संपूर्ण टर्म राष्ट्रवादीला समर्पित होती. अमरावतीच्या डॉ. अनिल बोंडे यांनी 2009 हर्षवर्धन देशमुख यांच्या साम्राज्याला खिंडार पाडले. दोघांच्या भांडणात तिसर्याचा फायदा झाल्याची जाणीव दोन्ही गटांना झाली. 2014 च्या निवडणुकीतही तेच चित्र पुढे आले. हर्षवर्धन देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेत कूच केली.
2019 च्या निवडणुकीत मोर्शी-वरुड मतदारसंघाची जागा काँग्रेस-राष्ट्रवादी युतीमध्ये राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाला सुटली. तत्कालिन जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार यांनी स्वाभिमानी शेतकरी पक्षातर्फे विधानसभा निवडणूक लढविली. बाहेरच्या बोंडे यांना छातीवर बसवून घेतल्यापेक्षा आपल्यातील उमद्या तरुणाला संधी देण्याचा विडा मतदारसंघाने उचलला. त्याचे पुढारपण हर्षवर्धन देशमुख यांनी केले. त्यासाठी जागोजागी ‘जॅक’ लावले. देवेंद्र भुयार यांनी ऐन मतदानाच्या दिवशी 21 ऑक्टोबर 2019 ला आपल्यावर विरोधकांकडून गोळीबार झाला, आपले वाहन जाळले, अशी बोंब समाजमाध्यमावरून हवेसारखी पसरवून सहानुभूतीची लाट निर्माण केली. त्या लाटेने देवेंद्र भुयार यांचा विजय सुकर केला. आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी देवेंद्र भुयार यांच्या मार्गात तडीपारीसह विविध मार्गाने आणलेली आडकाठी निष्फळ ठरली. दुसर्या शब्दात सांगायचे झाल्यास कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचे राजकीय डायग्नोसिस (निदान) आणि ट्रीटमेंट (उपचार) पूर्णतः चुकली. ड्रायझोनमध्ये पैशाचा पाट वाहूनही डॉ. बोंडे यांच्या राजकीय बगिच्यात मृग बहराऐवजी आंबट चवीच्या आंबिया बहराची फळे आली. अर्थात समर्थकांची नाराजी हा एक तर दुसरा फॅक्टर म्हणजे विरोधकाच्या सुरक्षेची निगराणी करण्यात डॉ. बोंडे असफल ठरले. तेव्हापासून सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या राजकीय कॅलिफोर्नियात देवेंद्र भुयार नावाचे संकरीत वाण ‘सेटल्ड’होऊ पाहत आहे, हर्षवर्धन देशमुख यांचे बोट धरून राजकिय शिवारात डोलत असलेल्या देवेंद्र भुयार यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेेने ‘गेटपास’ दिल्याने त्यांना राष्ट्रवादीच्या छायेत सांभाळण्याची जबाबदारी आता हर्षवर्धन देशमुख यांचीच आहे.
मुघल सम्राट शहाजहाँ याने त्याची प्रिय पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ 1632 मध्ये आग्रा येथे ताजमहल ही प्रतिकृती साकारली. अशीच दुसरी प्रतिकृती साकारली जाऊ नये, यासाठी शहाजहॉ याने तुर्की कारागिर इस्माईल खान याच्यासह राबणार्या 20 हजार मजुरांचे हात छाटल्याचे वाचनात (दावा नाही) आहे. आमदार देवेंद्र भुयार नुकतेच चतुर्भूज झालेले आहेत. त्या जोशातून त्यांनी तलवारीने हात छाटण्याचे व कुणाला ‘इम्प्रेस’ करण्यासाठी वक्तव्य केलेले असेल तर ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आमदार देवेंद्र भुयार यांना पाटीलकी नेमकी कुणाची काढायची आहे, ते अद्याप अस्पष्ट आहे. असे असले तरी विक्रम ठाकरे यांनी त्यांचे आव्हान स्वीकारत त्यांना ललकारलेले आहे. देवेंद्र भुयार तेथे पोहोचले नाहीत. त्यांच्या पाटिलकीची गंजलेली समशेर खुराड्यात वा अडगळीत शोधूनही सापडत नसल्याने त्यांचे वक्तव्य फुसका बार ठरला आहे. आमदार आमदार देवेंद्र भुयार यांचे राष्ट्रवादी नेत्यांच्या पुणेरी स्टाईलने अवकाळी बडबडणे 2024 च्या निवडणुकीसाठी जमीनीची मशागत व त्यांच्या आकांची खुशामत करणारे आहे. ठाकरे गटासह त्यांना निवडून देणारे बव्हंशी हात पाटलांचेच होते. आगामी निवडणुकीत अनेक राजकीय गणिते आहेत, ठाकरे यांच्याकडेही पर्याय आहेत. पानिपत कोणाचे होईल ते आताच सांगता येणार नाही. आमदार देवेंद्र भुयार तडफदार असले तरी त्यांच्या बेपत्ता तलवारीची धार मात्र बोथट असल्याचे त्यांनीच नाहक दाखवून दिलेले आहे. आमदार भुयार त्यांना निवडून देणारे हात छाटण्याची वांझोटी भाषा केल्याने त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केलीच पाहिजे. जीभ घसरल्याने इतिहासात जिभ छाटण्याचे प्रकार घडलेले आहेत. आमदार देवेंद्र भुयार यांची जीभ मतदारांनी मतदानाने छाटली तर त्यांची बोलती बंद होईल. हातात पुन्हा ऋमणे घेण्याची वेळ येण्यास वेळ लागणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. शुभ दिपावली!
गोपाल हरणे,
अमरावती.
9422855496