गणेश मिरवणुकीत डीजे वाजवल्याने गुन्हा दाखल : डीजे चालकांचे धाबे दणाणले

सातारा, १२ ऑगस्ट: सातारा शहरात गणेश आगमनाच्या मिरवणुकीदरम्यान नियम मोडून डीजेचा आवाज तब्बल 110 डेसिबलपर्यंत वाढवल्यामुळे शाहूपुरी पोलिसांनी थेट कडक कारवाई केली. या प्रकरणात डीजे मालक आणि बीम लाईट चमकवणारे चार जण यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, १० ऑगस्ट रोजी रात्री देवी चौकात गणेश आगमनाची मिरवणूक सुरू असताना ट्रॅक्टर-ट्रॉलीवर लावलेल्या डीजेचा आवाज ठरलेल्या मर्यादेपेक्षा खूपच जास्त होता. सोबत लावलेल्या बीम लाईट आणि एलईडी स्क्रीनमुळे लोकांच्या डोळ्यांना त्रास होत होता आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण झाला. पोलिसांनी वारंवार नियम सांगूनही डीजे मालकाने त्याचे उल्लंघन केले.
शांतता क्षेत्रात आवाजाची मर्यादा दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल आहे, तर शाळा, रुग्णालय परिसरात दिवसा 50 डेसिबल आणि रात्री 40 डेसिबल आहे. मात्र या मिरवणुकीत डीजेचा आवाज तब्बल 110 डेसिबल मोजला गेला.
पोलिसांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढे अशाच प्रकारे नियम मोडणाऱ्या कोणत्याही डीजे मालकावर तात्काळ गुन्हा दाखल केला जाणार आहे. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच कारवाई झाल्याने इतर डीजेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
आता असा प्रश्न उपस्थित झाला आहे की, अशीच कडक कारवाई छत्रपती संभाजीनगरसह इतर जिल्ह्यांतही होणार का? जर पोलिसांनी हीच भूमिका कायम ठेवली, तर ठराविक डेसिबलमध्ये डीजे वाजवणे जवळपास अशक्य असल्याने डीजेचा धंदाच बंद पडण्याची शक्यता आहे.