धक्कादायक! पत्नीच्या खुनासाठी पतीची सुपारी – ‘अपघात’ की थंड डोक्याने आखलेला कट?
जळगाव जामोद : एका निष्पाप महिलेच्या मृत्यूला सुरुवातीला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला; मात्र पोलिसांच्या तपासात या घटनेमागील भीषण सत्य उघड झाले. हा साधा अपघात नव्हता, तर पत्नीचा जीव घेण्यासाठी पतीनेच रचलेला थरारक कट होता!
वृषाली गावंडे यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर जळगाव जामोद पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. तपासाच्या धागेदोऱ्यांनी जे चित्र उभे केले ते अंगावर काटा आणणारे आहे.
पोलिस तपासात उघड झाले की, वृषाली यांचे पती प्रकाश अनंत गावंडे (वय ३७) यांच्यात घरगुती कारणांवरून सातत्याने वाद होत होते. या वादांचा राग मनात धरून प्रकाश गावंडे याने आपल्या पत्नीला कायमचे संपवण्याचा थंड डोक्याने कट रचला. या कटासाठी त्याने आपला मित्र मंगेश चौहूलकर (रा. पातुर्डा) याच्या माध्यमातून एका वाहनचालकाला थेट एक लाख रुपयांची सुपारी दिली.
घटनेच्या दिवशी वृषाली आपल्या स्कूटरने (क्रमांक MH 28 AL 5815) जात असताना ‘टाटा छोटा हत्ती’ (क्रमांक MH 28 BB 5753) या मालवाहू वाहनाचा चालक मनीष नारायण सिंग सूर्यवंशी याने त्यांच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यात वृषाली यांचा जागीच मृत्यू झाला. तपासात स्पष्ट झाले की हा अपघात नसून पूर्वनियोजित खून होता.
जळगाव जामोद पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत पती प्रकाश अनंत गावंडे आणि वाहन चालक मनीष सूर्यवंशी या दोघांना अटक केली आहे. या कटाचा मध्यस्थ असलेला मंगेश चौहूलकर अद्याप फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
न्यायालयाने आरोपींना कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण तपासाचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी केले असून पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेंडगे पुढील तपास करत आहेत. पत्नीच्या नात्यालाच काळिमा फासणारा हा थरारक कट उघड झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.