खासदाराचे ड्रायव्हरची 'लँडिंग' – हिबानाम्याच्या नावावर कोट्यवधींचा गेम?

छत्रपती संभाजीनगर : (प्रतिनिधी) : जालना रोडवरील दाऊदपुरा भागातील तब्बल 150 कोटींची 3 एकर जमीन खासदार संदीपान भुमरेंचे ड्रायव्हर जावेद रसुल शेख यांना भेट म्हणून कशी काय दिली गेली, यावरून वाद निर्माण झाला आहे. ही जमीन सालारजंग घराण्याच्या माजी स्वयंपाकीचा वंशज मीर महेमूद अली यांनी ‘हिबानामा’द्वारे दिल्याचा दावा आहे. मात्र, याला सालारजंग दुसरे – मीर युसुफ अली खान यांचे नातू ऐहतेशाम अली खान यांचे वकील एड. हारुण अन्सारी यांनी पत्रकार परिषदेत जोरदार आक्षेप नोंदवला आहे.
त्यांनी सांगितले की, मालमत्तेची आजतागायत कायदेशीर वाटणी झालेलीच नाही, मग हिबानामा कसा काय दिला गेला? याबाबत चौकशी झाली पाहिजे. ब्लड रिलेशन नसताना शरीयती कायद्यानुसारही अशी भेट वैध ठरत नाही. यामागे राजकीय हस्तक्षेप असून, मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा संशय आहे, असा आरोप अन्सारी यांनी केला.
तसेच याच पत्रकार परिषदेत त्यांनी पुढील मुद्दे स्पष्ट केले:
• सालारजंग मालमत्तेवर 1958 पासूनच हैदराबाद उच्च न्यायालयात दावा सुरू आहे.
• 124 प्रकरणांमध्ये वारसांची अधिकृत चौकशी झाली असून, ऐहतेशाम अली खान यांच्याकडे कोर्टाचा सक्सेशन सर्टिफिकेट आहे.
• छत्रपती संभाजीनगरमधील बायजिपुरा, काल्डा कॉर्नर, दाऊदपुरा, मजनूहिल यासारख्या भागांमध्ये सालारजंगची शेकडो एकर मालमत्ता असल्याचा दावा.
• एकूण 16 ब्लॉकपैकी साडेसहा ब्लॉकवर ऐहतेशाम अली यांचा हक्क असल्याचेही अन्सारी यांनी सांगितले.
याआधीही 2018 मध्ये अशाच प्रकारे एक प्लॉट विकून फसवणूक झाल्याचे उदाहरण देत, आर्थिक गुन्हे शाखेने त्या रजिस्ट्रेशनवर आक्षेप घेतल्याचेही त्यांनी सांगितले. आता जावेद रसुल यांना भेट म्हणून दिलेली जमीन खरेच त्यांच्याजवळ आहे का, याबाबत संशय असून, न्यायालयात यावर लढाई होणार आहे.
अन्सारी यांनी स्पष्ट इशारा दिला की, भविष्यात याच प्रकरणामुळे जावेद रसुल आणि त्यांच्या मागे असलेल्या नेत्यांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पुण्यातील एक मालमत्ता विकण्याचा प्रयत्नही सुरू असून, नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
अन्सारी यांनी सांगितले की, मालमत्तेविषयी कोणी व्यवहार करत असेल, तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. अन्यथा बोगस व्यवहारात फसवणूक होऊ शकते. ज्या जमिनीवर घर बांधले गेले, तिथल्या रहिवाशांना त्रास द्यायचा आमचा हेतू नाही. पण सर्वांनी आपल्या कागदपत्रांची कायदेशीर खात्री करून घ्यावी.
ही बातमी नागरिकांनी वाचून सावध राहण्याची गरज आहे, कारण बेकायदेशीर मालमत्तेचे व्यवहार पुढे गंभीर कायदेशीर गुंतागुंतीस कारणीभूत ठरू शकतात.