चोरी केली मुलाने शिक्षा भोगावी लागेल बापाला : असे आहे प्रकरण.....

चोरी केली मुलाने शिक्षा भोगावी लागेल बापाला : असे आहे प्रकरण.....

औरंगाबाद : न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग औरंगाबाद श्री एस एम एच शाहिद यांनी एका प्रकरणात आरोपी शशिकांत सोनवणे यांना तीन महिने कैदेची शिक्षा सुनावली आहे. 

     या संबंधी मिळालेली माहिती अशी आहे की फिर्यादी नारायण अल्हाड यांनी आपल्या मुलाच्या ऍडमिशन साठी दोन लाख रुपये कपाटात ठेवले होते. ही रक्कम चोरी गेली होती. या प्रकरणातील आरोपी शशिकांत सोनवणे यांचे मुलाने ही रक्कम चोरी केली होती. व त्याची कबुली पण दिली होती.

     नारायण अल्हाड यांनी चोरीस गेलेली रक्कम परत मागितली व रक्कम परत केली नाही तर पोलीस स्टेशनला  तक्रार करीन अशी धमकी दिली होती.  त्यावेळी काही प्रतिष्ठित लोकांनी मध्यस्थी केली. त्यानुसार शशिकांत सोनवणे यांनी नारायण आल्हाड यांना एक लाख 80 हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. आणि शशिकांत सोनवणे यांनी नारायण अल्हाड यांना तेवढ्या रकमेचा चेक दिला. 

     नारायण आल्हाड यांनी बँकेत चेक वटवण्यासाठी दिला असता तो बाउन्स झाला. म्हणून नारायण अल्हाड यांनी शशिकांत सोनवणे यांचे विरुद्ध न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, औरंगाबाद यांचे न्यायालयात खटला दाखल केला. 

     न्यायालयात सुनावणी दरम्यान आरोप सिद्ध झाल्याने न्यायदंडाधिकारी यांनी चेक बाउन्स बाबत शशिकांत सोनवणे यांना दोषी ठरवले. आणि निर्णय दिला की एका महिन्यात फिर्यादी नारायण अल्हाड यांना दोन लाख सात हजार पाचशे चाळीस रुपये द्यावेत. एका महिन्यात जर रक्कम दिली नाही तर तीन महिने कैदेची शिक्षा भोगावी लागेल. 

     फिर्यादी नारायण आल्हाड यांचे वतीने एडवोकेट अंजली मोरे यांनी खटला चालवला असून आरोपी शशिकांत सोनवणे यांच्या वतीने एडवोकेट अंकुश जाधव यांनी कामकाज पाहिले.