गैरकायद्याच्या मंडळीत सहभागी झाल्याबद्दल पालकमंत्री भुमरे आणि मंत्री सावे यांचे विरुद्ध पण गुन्हा दाखल होईल का?

गैरकायद्याच्या मंडळीत सहभागी झाल्याबद्दल पालकमंत्री भुमरे आणि मंत्री सावे यांचे विरुद्ध पण गुन्हा दाखल होईल का?

औरंगाबाद, १९मार्च : केंद्र शासनाने मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याचे समर्थनार्थ  सकल हिंदू समाजाचे वतीने आज 'हिंदू जनगर्जना मोर्चा' चे आयोजन करण्यात आले होते. त्याबाबत आयोजकांनी औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तांकडे मोर्चाची परवानगी मागितली होती.

          पोलीस आयुक्त औरंगाबाद डॉ. निखिल गुप्ता यांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर यांचे मान्यतेने पोलीस उपायुक्त, मुख्यालय, अपर्णा गीते यांचे स्वाक्षरीने सकल हिंदू समाजाद्वारा आयोजित मोर्चा आणि सभेसाठी आयोजक भाग्यतुषार जोशी यांना परवानगी नाकारल्याचे दिनांक 18 मार्च 2023 रोजी पत्राद्वारे कळविण्यात आले होते.

          मोर्चा आणि सभेची परवानगी नाकारण्याचे पोलीस आयुक्त यांचे पत्राचा जावक क्रमांक विशा-१/औ/परवानगी -  नाकारले/२०२३- १८११ औरंगाबाद शहर दिनांक १८/०३/२०२३ असा आहे.

          मोर्चा आणि सभेसाठी परवानगी नाकारल्यानंतर आयोजकांनी पोलीस आयुक्तांचे आदेशाला न जुमानता आज दिनांक 19 मार्च 2023 रोजी क्रांती चौक येथे गैरकायद्याची मंडळी जमवून मोर्चा काढलाच. त्यात औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे आणि सहकार मंत्री अतुल सावे यांचे सह काही आमदार आणि सुमारे दीड ते दोन हजार लोक सामील होते. क्रांती चौक येथून या गैरकाद्याचे मंडळी ने मोर्चा काढलाच.

पाहा व्हिडिओ : दोन्ही मंत्री महोदय गैर कायद्याच्या मंडळीत

          दिनांक 9 मार्च 2023 रोजी खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराचे विरोधात कॅण्डल मार्च काढला होता. त्यांना पण कॅन्डल मार्च काढण्यासाठी ची परवानगी नाकारण्यात आली होती. त्यांनी पोलिसांचे आदेशांचे उल्लंघन केले आणि गैर कायद्याची मंडळी जमविली म्हणून त्यांचे सह 28 ज्ञात आणि सुमारे 1000 ते 1500 लोकांचे विरुद्ध पोलीस स्टेशन सिटी चौक येथे दिनांक 10 मार्च 2023 रोजी भारतीय दंडविधानाचे कलम 143 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

            तसेच दिनांक 16 मार्च 2023 रोजी औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजी नगर किल्ल्याचे समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वप्नपूर्ती रॅलीचे आयोजन केले होते. त्यांनाही पोलिसांनी रॅली ची परवानगी दिली नव्हती. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व कार्यकर्त्यांनी पोलिसांचे आदेशाला धुडकाऊन गैर कायद्याची मंडळी जमवून रॅली काढली. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुमित खांबेकर यांचे सह ज्ञात दहा इसम आणि अज्ञात 125 ते 150  लोकांचे  विरुद्ध भारतीय दंडविधानाचे कलम 143 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 102 आणि 135 नुसार पोलीस स्टेशन सिटी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

          याचप्रमाणे आज रोजी सकल हिंदू समाजाचे वतीने पोलिसांचे आदेशाला धुडकावून क्रांती चौकात गैर कायद्याची मंडळी जमवून मोर्चा काढलात व सभा ही घेतली. या गैर कायद्याचे मंडळी मध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे आणि सहकार मंत्री अतुल सावे यांचे सह काही आमदार व अनेक ज्ञात लोकांसह अज्ञात सुमारे दोन हजार लोकांनी सहभाग घेतला होता. ही गैर कायद्याची मंडळी जेव्हा क्रांती चौकात जमली होती व मोर्चा काढला होता त्यावेळी औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्तांसह इतर वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते. 

          राज्यघटनेनुसार कायदा सर्वांसाठी समान आहे तर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे सह सहकार मंत्री अतुल सावे हे पण उपस्थित असल्याने या दोन्ही ज्ञात मंत्र्यांचे विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे का? होणार किंवा नाही हे सध्या तरी कोणी सांगत नाही. या गैर कायद्याच्या मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल होईल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. आणि गुन्हा दाखल  झालाच तर त्यात या दोन्ही मंत्र्यांची नावे असणार की नाही याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता लागलेली आहे. याबाबतचा खुलासा उद्या होण्याची शक्यता आहे.