शनिवारवाड्याचे पवित्र्य(?) भंग
दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे. देशभरातील, घराघरा मधून, उजळलेल्या करोडो दिव्यांनी, अवघा आसमंत प्रकाशमान व्हावा आणि या प्रकाशाप्रमाणेच, आपल्या मनातील आनंद चौखुर विखरावा, असा हा सण. परंतु पणत्यांनी उजळलेला आसमंत बघण्यापेक्षा, हिंदू मुसलमान दंगलित पेट घेतलेल्या, घरांनी उजळलेल्या आसमंताची शोभा काही औरच असते, असे मानणारा एक वर्ग भारतात आहे. लोकांच्या आनंदात मिठाचा खडा टाकून, विरजन लावण्याचे काम, या वर्गाकडून प्रामाणिकपणे केले जाते. पुण्यातील, भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभा सदस्य, खासदार मेघा कुलकर्णी यांच्याकडून, अशाच प्रकारे सर्वसामान्य माणसाची दिवाळी, कलुषित करण्याचा असफल प्रयत्न झाला आहे. जनतेने दाखवलेल्या जागरूकतेमुळेच, मेघा कुलकर्णी यांचा हा प्रयत्न असफल ठरला आहे. पुण्यातील शनिवारवाड्यात,शुक्रवारी दुपारी, काही मुसलमान महिला, नमाज पढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. मेघा कुलकर्णी यांच्यापर्यंत, हा व्हिडिओ पोहोचल्यानंतर, त्या लगेच आक्रमक झाल्या. आता मुसलमान महिलांनी, शनिवारवाड्याच्या परिसरात, नमाज पढण्यात काय गैर आहे आणि त्यामुळे कोणत्या कायद्याचा भंग होतो, या गोष्टीची चर्चा होणे आवश्यक ठरते. परंतु आवश्यक चर्चा बाजूला राहून, विषय भलत्याच दिशेने भरकटायला लागला. कारण बोलण्याच्या ओघात, मेघा कुलकर्णी यांनी, शनिवार वाड्याचा उल्लेख "पवित्र वास्तू" असा केल्याचे समजते. एकदा शनिवारवाड्याला, पवित्र वास्तू म्हणून संबोधले, की पेशवाईचे धिंडवडे काढायला तयार असणारे, अनेक इतिहासकार, आपल्या लेखण्या पाजरून तयार असतील, यात शंका नाही. या शनिवारवाड्याच्या परिसरात असणारी, एक मजार देखील, कोणत्याही ऐतिहासिक पुराव्या शिवाय तिथे असल्याचा दावा, मेघा कुलकर्णी करत आहेत. तर त्यांच्यासोबत असणाऱ्या, एक महिला इतिहासकार, त्या मजारीच्या खाली, शिवलिंग असल्याचे सांगताना, दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे, इतिहासाविषयीचे ज्ञान, नरेंद्र मोदी यांच्यापासून, खालच्या स्तरातील नेत्यांपर्यंत पाझरत गेलेले असल्यामुळे, या सर्वांचेच इतिहास विषयक ज्ञान, दिव्य आहे असे म्हणायला हरकत नाही. मग मेघा कुलकर्णी, त्याला अपवाद कशा असतील, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

चारशे वर्षापेक्षा जास्त काळापासून, त्या ठिकाणी ही मजार असल्याचा उल्लेख असणारे, दस्तऐवज सादर करण्यात आले आहे. ज्या शनिवारवाड्यात, बाजीरावने मस्तानीला आणून ठेवले होते, तो शनिवारवाडा, आज त्या ठिकाणी, नमाज पढल्यामुळे अपवित्र कसा होतो, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, मस्तानी, शनिवार वाड्यात वास्तव्यात असताना, त्या मजारीवर जाऊन, पूजा करत असल्याचा उल्लेख असल्याचे, सांगितले जाते. शनिवारवाड्याच्या पावित्र्याचा उल्लेख, मेगा कुलकर्णी यांच्याकडून झाल्यानंतर, दुपारी बारा वाजेपर्यंत, बायांच्या सानिध्यामध्ये, संपूर्ण नग्न अवस्थेत वावरणारा बाजीराव पेशवा, नग्न महिलांच्या धावण्याच्या शर्यतीत रस घेणारा पेशवा, घटकांचुकी सारख्या खेळामध्ये, विरंगुळा शोधणारा पेशवा, अशा साऱ्या पेशव्यांचा उद्धार होणे साहजिक होते. शनिवार वाड्याचा मुद्दा पुढे करत, सामाजिक सलोखा बिघडवण्याचा, मेघा कुलकर्णी यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे, अशातला भाग नाही. यापूर्वी एकदा तर हिरवा रंग असलेल्या भिंतीवर, आपल्या हातात ब्रश घेऊन, भगवा रंग मारत असल्याचा त्यांचा फोटो व्हायरल झालेला आहे. मुस्लिम महिलांनी शनिवारवाड्यात नमाज पढावी, या घटनेमुळे, मेघा कुलकर्णी यांना, एवढे व्यतीथ होण्याचे कारण काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नग्न महिलांची शर्यत, एका घटामध्ये, महिलांच्या कंचूक्या एकत्र करून, ज्या पुरुषाच्या हातात, ज्या महिलेची कंचुकी येईल, त्या महिलेसोबत, त्यानी शैया सोबत करावी, असा घटकांचुकीचा खेळ, नागडा फिरणारा बाजीराव, आणि शनिवार वाड्यात मस्तानी आणून ठेवणारा बाजीराव, या सर्वच पवित्र घटनांचा साक्षीदार असणाऱ्या या वाड्यात, चार-पाच मुस्लिम महिला, अंगावर पूर्ण कपडे घालून, नमाज पढत असतील, तर हा समस्त महिलांचा अपमान झाला आहे, असे मेघा कुलकर्णी यांना वाटले असेल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
शनिवारवाड्यात, दुपारी दीडच्या सुमारास, या मुस्लिम महिला नमाज पढत असल्याचे सांगण्यात येते. मुस्लिम धर्मात, शुक्रवारी दुपारी दीड वाजताची नमाज, पुरुषांनी अदा केल्यानंतरच, महिला नमाज अदा करतात, असे सांगण्यात येते. अर्थात दुपारी दीड वाजता, महिलांची नमाज अदा करण्याची वेळ नसताना, या कोण महिला होत्या, ज्या त्या ठिकाणी नमाज अदा करत होत्या, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी नमाज अदा करणे चुकीचे आहे, असे कोणाला वाटत असेल, तर त्यांना तसे करण्यापासून रोखण्या ऐवजी, त्यांचा व्हिडिओ बनवणारा हा महाभाग कोण होता, त्याचे नाव देखील जनतेपुढे यायला पाहिजे. या महिला कॅमेरात कैद झालेल्या असल्यामुळे, त्यांचे नाव सुद्धा पुढे यायला हरकत नाही. मुस्लिम महिलांच्या वेषात, काही हिंदू महिलांकडून, हे कृत्य करून घेतले का, असाही प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होत आहे. कारण हिंदू महिला - पुरुष, हे मुसलमानांचा वेश परिधान करून, मुस्लिम नाव धारण करून, अनेक समाजविघातक कृत्य करत असल्याच्या घटना, वारंवार उघडकीस येत आहेत. कोणत्याही प्रश्नावर सरकारची अडचण होत असली, की हिंदू मुसलमान यांच्यामध्ये ठिणगी पडेल, असे एखादे प्रकरण शोधून काढायचे, हा विद्यमान सत्ताधाऱ्यांचा, गोरख धंदा झालेला आहे. म्हणूनच औरंगजेबच्या कबरीच्या प्रकरणानी अचानक डोके वर काढले होते. भरपूर चर्चेचे गुऱ्हाळ करून, हे प्रकरण संपवण्यात आले. कारण औरंगजेबची कबर, ही सरकारची, त्या काळातील गरज होती. आज पुण्यात देखील, सरकार करता अडचणीच्या ठरणाऱ्या, दोन प्रकरणाची चर्चा सुरू आहे. या प्रकरणावरून जनतेचे लक्ष वळवण्याकरताच, मेघा कुलकर्णी यांनी, शनिवार वाड्यातील, नमाज अदा करण्याचा प्रश्न पुढे केल्याची चर्चा आहे. जैन समाजाची अब्जो रुपयाची जमीन, कवडीमोल भावात पचवण्याच्या कार्यात, भारतीय जनता पक्षाच्या, एका मंत्र्याचे हात बरवटलेले असल्याचा आरोप आहे. प्रकरण अंगाशी येत आहे असे दिसताच, चॅरिटी कमिशनरने, याबाबत तातडीची सुनावणी घेत, त्यावर स्थगिती दिल्याचे सांगितले जात आहे. परदेशात शिकणाऱ्या, एका मागासवर्गीय मुलाला, पुण्याच्या एका महाविद्यालयाने, तो आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी होता, असे प्रमाणपत्र देण्याचे नाकारल्यामुळे, त्याला नोकरी पासून मुकावे लागले आहे. अशा प्रमाणपत्राची मागणी करताच,मला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी, प्रथम जात विचारल्याचा आरोप, त्यानी केला आहे. आम्ही संबंधित कंपनीकडे, तुमच्या नावाची शिफारस करू शकत नाही, असे उत्तर प्राचार्यांनी, त्या विद्यार्थ्याला दिले होते. वास्तविक महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी होता, असा दाखला देणे आणि शिफारस करणे, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, याचे ज्ञान, प्राचार्यांना नव्हते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या, एकाही विषयात, या प्राचार्यांनी पदवी प्राप्त केलेली नसल्याचे सांगण्यात येते. इंजीनियरिंगची पदवी प्राप्त केलेली व्यक्ती, आर्ट्स कॉलेजची प्राचार्य कशी काय असू शकते, असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत आहे. मागासवर्गीयांचे दमन करण्याचा प्रयत्न म्हणून, या घटनेकडे बघितले जात आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून, या घटनेचा निषेध केला जात आहे. अशा प्रकरणावरून, लोकांचे लक्ष विचलित व्हावे, म्हणूनच मेघा कुळकर्णी यांनी, शनिवारवाड्यातील, नमाज अदा करण्याचे प्रकरण, पुढे आणले असावे. या वाड्यातील मजार, फार जुन्या काळापासून तिथे होती, ही बाब पुढे आलेली आहे, शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावर देखील, आपल्याला मुस्लिमांची प्रार्थना स्थळे असल्याचे दिसून येईल. या मागचे कारण म्हणजे, शिवाजी महाराजांच्या सेनेत, मुसलमान सरदार आणि शिपाई होते. त्यांच्या राज्यात देखील मुस्लिम जनता होती. या मुस्लिम जनते करता प्रार्थना स्थळ उपलब्ध करून देण्याचे कर्तव्य राजांनी पार पाडले होते, याची, शिवाजी महाराज केवळ हिंदूंचेच राजे होते, असा अपप्रचार करणाऱ्यांना, कल्पना नसावी. शनिवारवाडा, केवळ महिलांवर झालेल्या अत्याचारा करताच कुप्रसिद्ध होता, अशातला भाग नाही. तर अनेक कुट कारस्थानांचे हा वाडा केंद्रबिंदू राहिला आहे. ध चा मा करून, नारायण रावाच्या झालेल्या खुनाचा, हा वाडा साक्षीदार आहे. सनातनी धर्मात महिलांचे स्थान काय होते, याचे आकलन करून घेण्याकरता, तुम्हाला पाच हजार वर्षा पूर्वीच्या इतिहासात डोकवण्याची आवश्यकता नाही. पेशवाईचा अभ्यास केला तरी, त्या काळात, समाजात महिलांचे स्थान काय होते, याची आपल्याला कल्पना येते. शनिवार वाडा आज पुरातत्त्व खात्याच्या आखत्यारीत येत असल्याचे सांगितले जाते. ही ऐतिहासिक वास्तू असली, तरी ते हिंदू धर्मीयांचे, धार्मिक स्थळ नसल्यामुळे, कोणी त्या ठिकाणी, नमाजपठन केल्याने, त्या वास्तूचे पावित्र्य(?) भंग होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीसुद्धा या प्रकरणाला धार्मिक स्वरूप देऊन, जनतेच्या भावना भडकवण्याचा, जो प्रयत्न मेघा कुलकर्णी यांनी केला आहे, तो महाराष्ट्रातील जनतेने हाणून पडला, याकरता महाराष्ट्रातील जनतेचे मनापासून आभार.
• पंकज वैद्य, वरिष्ठ पत्रकार अमरावती
9823014040