महाराष्ट्र भावनासाठी श्रीनगरात जागा उपलब्ध करून द्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्यपालांकडे मागणी.
मुंबई, ११ जून (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Eknath Shinde) एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची श्रीनगर येथे भेट घेतली.
'महाराष्ट्र भवन' उभारण्यासाठी श्रीनगर येथे जागा देण्याची विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली. खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे (Dr Shrikant Eknath Shinde) यावेळी उपस्थित होते.
राज्यपालांना दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढविणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे यासाठी महाराष्ट्र भवनाला जागा मिळाल्यास दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होईल.
श्रीनगरमधील हे महाराष्ट्र भवन केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारे राहणार नाही तर या ठिकाणी महाराष्ट्राची समृध्द कला, खाद्य आणि संस्कृतीची झलक देखील पाहता येऊ शकेल.
जम्मू आणि काश्मीर समवेत नाते अधिक दृढ करण्यासाठी या महाराष्ट्र भवनाचा उपयोग विद्यार्थी, उद्योजक, वरिष्ठ अधिकारी यांना एक प्रमुख केंद्र म्हणून करता येईल.
महाराष्ट्र भवनसाठी योग्य ती जागा मिळाल्यास काश्मीरची संस्कृती, पर्यावरण लक्षात घेऊन एक चांगले भवन या ठिकाणी राज्य सरकार तर्फे बांधण्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी या पत्रात दिली आहे.