आम्ही रझाकार होतो का?
हैदराबाद मुक्ति संग्राम किंवा मराठवाड़ा मुक्ति संग्राम हा विषय निघाला की आपण निजामाच्या जुलमी राजवटीतुन, रझाकारांच्या पाशवी जाचातुन कसे मुक्त झालो या विषयी भरभरून बोलतो, लिहितो ठीक आहे, याला कुणाची पण हरकत असण्याच कारण नाही,नसावी,
पण पण पण
या स्वातंत्रलढयाच्या आड़ किती दारोडेखोरानीं, चोरांनी, गुंडानी, बदमाश लोकांनीं धुमाकुळ घातला, सर्व सामान्य मुसलमानांवर अत्याचार केले गेले, त्यांच्यावर कुणी चर्चा करत नाही की काही बोलत नाही.
17 सप्टेंबर ला एकच बाजू मांडली जाते, एका धर्म विशेष समाजाला आरोपीच्या पिंजर्यात बंदिस्त करण्याचा प्रयत्न केले जातात .
आंबेजोगाई सारख्या शांततावादी शहरामध्ये जिथे रझाकारानी निमूटपणे शस्त्रे खाली ठेवली होती, कुठे ही भारतीय सैनिकांना प्रतिकार झालेला नव्हता, त्या अंबाजोगाईत, "सर्वत्र राज्य प्रशासन कोलमडलेले होते. अधिकारी, पोलिस, रझाकार सारे पळून गेलेले होते, कुठेच कोणाचा पत्ता नव्हता, काही ठिकाणी गुंड राज्य चालू होते, मुस्लमानांच्या कत्तली झालेल्या होत्या, लूटालूट, जाळपोट चालू होती.
याची असंख्य उदाहरण आहेत की हिंदूंनी पुढे येऊन हजारो मुसलमानांची अब्रू, जीव वाचविला याला मीच काय कुणीही नाकारू शकत नाही, याच्या विषयी गौरवाने बोललं गेलं पाहिजे, लिहल गेलं पाहिजे, यात दुमत नाही, पण...
निजामाच्या हैदराबाद संस्थानात एकूण 16 जिल्ह्यात 22,00 गाव होती, खेड्यापाड्यातून एकेकाळी जहागीरदार, जमीनदार असलेली मुसलमान कुटुंबे रस्ता दिसेल तिकडे पळत होती, हयातभर गोशाच्या बाहेर न आलेल्या स्त्रियानां चिखलात, पावसात, नदीच्या पुरात जीव घेऊन अब्रू वाचविण्यासाठी आणि जीव वाचविण्यासाठी लपावे व पळावे लागत होते, त्यांना कुणी त्राता नव्हता. अंबाजोगाई गावात खूपच लुटालूट झालेली होती, गुंड रात्रीचा फायदा घेऊन मुसलमान मोहल्लयात जावून धुमाकूळ घालीत होते, या सर्व परिस्थिती मध्ये मुसलमान स्त्री पुरुषांची दैना, त्यांची गावोगावी पडून असलेली मोकळी घरे, मोकळया घरातील मोकळी पडलेली संपत्ती हे सर्व भयंकर होते,
केजचा अनुभव तर अत्यंत ह्र्दय द्रावक होता, तेथे अफाट लुटालूट झालेली होती, बारव भरून प्रेते साठलेली होती, घराघरातुन आणि गल्लीगल्लीतून हुंदके, आक्रोश या शिवाय कानावर काही येत नव्हते, एके घरी एका सासूने आपल्या 13 सुनांना आणून उभे केले, त्यांचे नवरे या मध्ये मारले गेले होते, ती स्फुंदुन स्फुंदुन, "आम्ही रझाकार होतो का???" असा प्रश्न करीत होती, अश्रुंचे पाट वाहात होते आणि तिने सवाल केला "या 13 जणीचे काय करू ???" या प्रश्नाचे कुणा जवळच उत्तर नव्हते, साश्रुनयनाने मान खाली घालण्याशिवाय कोणी काय करू शकणार होते??? या दृश्याने ह्र्दय पिळवटुन निघालेले नसेल असा कुणी असणे शक्यच नव्हते .
येलंब आणि नांदूरघाट याच्या जवळच्या भागाला अमळाचा बरड म्हणतात, कळंबचे एक अति श्रीमंत कुटुंब महंमद शरीफ कळंब सोडुन आश्रयासाठी फिरत होते, फिरत फिरत या बरडावर आले, महंमद शरीफ कळंबचे कपड्यांचे व किराणाचे एक मोठे व्यापारी होते, लग्नाचे बसते मानवतनंतर त्यांच्याकडेच बांधले जात, ते मोठे जमीनदार व सावकार होते, या कुटुंबात एकूण 13 माणसे होती, जीव वाचविण्या साठी बरोबर ऐवज व पैसे घेऊन ते लोक फिरत होते, पैसे घ्या पण जीवदान द्या असा त्यांचा घोषा होता, पण त्या पैश्यानेच त्यांचे प्राण धोक्यात आणले, प्रत्येका जवळ 1,1 लाखाचे धन होते, हे सर्वच्या सर्व अमळाच्या बरडावर कापले गेले, आवरगाव, चिंचोली माळी आणि केजच्या गुंडानी त्यांना लुटले आणि खलास केले.
मराठवाड्यात या वेळ पर्यंत झालेल्या लुटी मध्ये ही सर्वात मोठी लूट होती आणि ही लूट या भागातील आजूबाजूच्या प्रतिष्ठित लोकांनी केली होती, चिंचोली माळी, केज चे त्यात फार मोठे धागेदोरे होते. आवरगाव च्या गुंडांचा त्यात प्रभावी हात होता.
वरील घटना या ऐकीव नाहीत, याचे लेखी पुरावे आहेत माझ्याकडे आणि हे लिहिणारे कुणी मुस्लिम नसून अंबाजोगाईतील प्रतिष्ठित आदरणीय स्वतंत्रतासेनानी आहेत, ह्या संवेदनशील लोकांनी जर हे त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले नसते तर हे सत्य कधीच समोर आले नसते .
या 2,3 घटनाच मुख्यतः मी इथे मांडल्या, अशी हजारो घटनांचं उल्लेख करता येईल, धारूर, उस्मानाबाद, नांदेड इथे प्रचंड प्रमाणात मुस्लिम समाजाचे शिरकाण करण्यात आले, संपत्ती लुटली गेली, हजारोंच्या संख्येने लोक देशोधडीला लागले,
या पोलीस एक्शन मध्ये सरकारी आकड्यांचा जर आपण विचार केला तर जवळपास 40,000 हजार निष्पाप, माणसं मारली गेली असे हे आकडे सांगतात, कोट्यावधीची त्यांची संपत्ती लुटली गेली, हे सर्वचे सर्व काही रझाकार नव्हते.
पण कुणी यांच्या विषयी चिकार एका शब्दाने पण बोलत नाही की लिहीत नाही. हैदराबाद मुक्ती संग्राम वर लिहल्या गेलेल्या कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकात तुम्हांला यावर एक ओळ सुध्दा सापडणार नाही. गुजरातलाही लाजवेल अस हे हत्याकांड आपल्या मराठवाड्यात घडलेलं आहे. हा इतिहास आहे यावर अभ्यास करून. संशोधन करून अजून प्रकाश टाकता येईल,
17 सप्टेंबरची ही पण एक बाजू आहे. जी मला आपल्यासमोर आणायची होती, मांडायची होती.