आयुष्यात भेटलेली भली माणसे :  माधवराव कर्वे सर (IPS) निवृत्त IGP, पुणे...!!

आयुष्यात भेटलेली भली माणसे :  माधवराव कर्वे सर (IPS) निवृत्त IGP, पुणे...!!
Madhavrao Karve (IPS) IGP and J.S.Kazi PI

सन 1996 मधील सुरवातीच्या महिन्यात माझी बदली  लातूरहून बीड जिल्ह्यात झाली. मी त्या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक या हुद्द्यावर होतो.

     हजर झालो तेव्हा बीड जिल्ह्यात श्री जगन्नाथ सर (IPS) पोलीस अधीक्षक होते. त्यांची भेट घेतली असता त्यांनी सध्या कंट्रोल रूमला काम करा, एखादे पोलीस ठाणे रिकामे झाले तर देता येईल. असे सांगून मला कंट्रोल रूमला बसवले.

      मी 15 दिवस तेथे काढले. तेथे कधीमधी बाहेर बंदोबस्त शिवाय काही काम नसायचे, आणि रिकामपणाचा कंटाळा वाटायचा. या काळात मला कर्मचाऱ्यांकडून समजले की श्री जगन्नाथ साहेब पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांशी अत्यंत प्रेमाने व आपुलकीने वागतात.

     एक दिवशी मी हळूच श्री जगन्नाथ साहेबांच्या चेंबर मध्ये शिरलो आणि मला अंबाजोगाई पोलीस ठाण्यात देण्यात यावे अशी विनंती केली.  त्यावर, तुम्ही एपीआय पदावर राहून पीआय यांचे अधीन काम कसे कराल? असा सरांनी प्रतिप्रश्न केला. कारण त्यावेळी ईतर पोलीस ठाण्यांत व कांहीं तालुक्याचे पोलीस ठाण्यांत सुध्दा पीएसआय दर्जाचे अधिकारी प्रभारी म्हणुन नेमणुकीस होते. मी साहेबाना अंबाजोगाई ठाण्यात पोलीस निरीक्षकांचे हाताखाली आनंदाने काम करण्यास तयार असल्याचे सांगितले.

     सरांनी मला तोंडीच अंबाजोगाईला जावून हजर होण्यास सांगितले. त्यांची पद्धत अशी होती की ज्या पोलीस ठाण्यात एखाद्या अधिकाऱ्याला  पाठवायचे असेल तर त्याला ते ऑर्डर न देताच तोंडी रुजू होण्यास सांगत. आणि दोन-तीन महिन्या नंतर त्याची तक्रार न आल्यास रुजू झाल्या तारखे पासूनचा नेमणुकीचा आदेश काढत. एखाद्याची तक्रार आल्यास त्याला 'साभार' कंट्रोल रूमला परत घेत असत. हसत खेळत काम  करण्याची त्यांची पद्धत होती. राग, चीडचीड ते करीत नसत. 

     मी अंबाजोगाई गेलो आणि ठाण्यात पोलीस निरीक्षक श्री. आर. एल्. पाटील सरांना रिपोर्ट केला आणि त्यांचे अधीन मर्जी प्रमाणे काम करू लागलो.     

      अंबाजोगाई हे प्राचीन नगर असून येथे योगेश्वरी माता (अंबा) चे सर्वज्ञात मंदिर असून प्रसिध्द कवी मुकुंदराज यांची समाधी आहे. येथील  शैक्षणिक वातावरण छान असल्याने मुलांना  शाळा सुद्धा चांगल्या मिळाल्या.

    मी दिलेले काम जबाबदारीने करीत असे. त्याच प्रमाणे लहान मोठी गोष्ट सुद्धा पोलीस निरीक्षक यांच्या सल्ल्यानेच करीत असल्यामुळे  राजकरण्यांचे आणि वरिष्ठांचे टेन्शन मला नव्हते. तसेच पोलीस निरीक्षक सुद्धा माझ्यावर समाधानी होते,  काही चुकल्यास ते मला समजावून सांगत.

    दिवस सरकत गेले 6 महिने कधी निघून गेले कळालेच नाही. दरम्यान पोलीस अधीक्षक श्री जगन्नाथ सरांची बदली झाली. बीड जिल्ह्यात नवीन पोलीस प्रमुख श्री माधवराव कर्वे सर (IPS) रुजू झाले.

      एक दिवस ते अंबाजोगाईला भेट देत असल्याचे कळाले. भेटीचा दिवस उजाडला त्या दिवशी पाहिल्या गणवेशात पोलीस निरीक्षक यांचे सोबत मी  विश्रामगृह येथे पोचलो. सोबत ग्रामीणचे मंडळ पोलीस निरीक्षक सुद्धा होते. मी काहींसा काळजीत, काहींसा टेन्शन मध्ये होतो. काळजी, टेन्शन नवीन साहेबांच्या आगमनामुळे होती. नवीन साहेब कडक स्वभावाचे असतील काय? हिडीस पिडीस करणारे असतील काय? माझेकडे  उघडकीस न आलेले तपासावरील  चोऱ्यांचे  गुन्हे तर विचारणार नाहीत ना? असे विविध प्रश्न मला सतावत होते.

    थोड्याच वेळात एकदाचे नवीन माननीय साहेबांचे आगमन झाले. आम्ही रीवाज, शिस्ती प्रमाणे त्यांना रिसिव्ह केले. आम्हाला वऱ्हांड्यात  बसण्यास सांगुन साहेब आत जावून फ्रेश होवून बाहेर आले. 

       नवीन साहेब बोलके होते. (ते पूर्वी प्राध्यापक असल्याचे नंतर समजले) त्यांनी आम्हा समोर मृद भाषेत संवाद साधून  अंबाजोगाई शहराची माहिती घेतली आणि आम्हा प्रत्येकाची आस्थेने विचारपूस केली.  माझा  जीव भांड्यात पडला. मला विचारपूस करताना त्यांनी  विचारले की तुम्ही एपीआय असताना पीआयचे अधीन काम करता आणि पीएसआय लोक स्वतंत्र पोलीस स्टेशन करीत आहेत, हे कसे काय? त्यावर मी त्यांना उत्तर दिले की  मी माझे मर्जीने तेथे आलो आहे. स्वतंत्र पोस्टिंग  साठी मी कोणताही प्रयत्न केला नाही आणि  जेथे वरिष्ठ देतील तेथे मी काम करीन वगैरे नम्र भाषेत त्यांना उत्तर दिले.

     माझी नम्रता आणि मराठीत मी केलेला संवाद त्यांना बहुतेक पसंत आला, कारण पुढल्या काळात प्रत्येक भेटीला  साहेब माझ्याशी आस्थेने बोलत.
     नंतर पोलीस स्टेशनला भेट देवून मार्गदर्शन करून साहेब बीडला निघून गेले.

     कालांतराने अंबाजोगाई जिल्हा करण्यासाठी जनतेचे आंदोलन झाले, कांही गंभीर गुन्हे पण घडले. प्रसंगानुरूप एसपी सरांच्या भेटी, आमच्याशी संवाद होत गेला.

      अंबाजोगाई पोलीस ठाण्यात माझा एक वर्षावर कालावधी झाला. मी एका दिवशी बंदोबस्त करून रात्री उशीरा परत पोलीस ठाण्यात पोचलो. मी  येताच पोलीस ठाण्यात हजर असलेले कर्मचारी माझे अभिनंदन करीत पेढे मागू लागले.  आणि माझी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतंत्ररित्या नेमणूक झाल्या बाबत वायरलेस आल्याचे सांगू लागले. मी बिनतारी संदेश वाचला. तरी  वाटले की कदाचित कर्मचारी माझी चेष्टा करीत असावेत म्हणून मी पोलीस निरीक्षक साहेबांना घरी जावून भेटलो. त्यांनी मला सांगितले एसपी साहेबांची तुमच्यावर विशेष मर्जी आहे तुम्ही लवकर जावून चार्ज घ्या.

     दुसऱ्या दिवशी मी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचा चार्ज घेतला. आणि  रीती प्रमाणे पोलीस अधीक्षक श्री कर्वे साहेबांना भेटायला गेलो. त्यावर साहेब एवढेच म्हणाले की, तुमच्या ग्रामीण हद्दीत मंत्री महोदय यांच्या मतदार संघांपैकी  भाग आहे. तुम्ही दक्ष राहून काम करा तक्रार येवू देवू नका.

    पोलीस अधीक्षक श्री कर्वे सर सतत माझ्या पाठीशी राहिले. वेळोवेळी मार्गदर्शन करीत राहीले. साहेबांची बदली झाली. त्यावर माझी सुद्धा दुसरी कडे बदली झाली. मी त्या पोलीस ठाण्यात   साहेबांच्या आशीर्वादाने 20 महिने काढली.

       नंतर मला कळाले बीड ग्रामीण पोलीस स्टेशनवर पोस्टिंगसाठी  इतर दोन-तीन अधिकाऱ्यांनी  राजकारणी लोकां कडून खूप दबाव आणला होता. परंतु यांच्या पैकी कोणाच्याही दबावाला बळी न पडता, राजकरण्यांची नाराजगी पत्कारून, कोणत्याही प्रकारची आर्थिक फायद्याची अपेक्षा न ठेवता  केवळ मला न्याय मिळावा या हेतुने श्री कर्वे साहेबांनी मला स्वतंत्र पदभार दिला होता.

       मी विचार करीत राहिलो कोण मी!  एक मुस्लिम धर्मीय, अल्पसंख्यांक, ज्याची कांहीं एक पोच नाही, कोण्या मोठ्याशी आपली ओळख नाही, आपला संबंध नवाब घराण्याशी नसून सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाशी, आपले नाते  तरीही, अग्रकमाने आपल्याला केवळ न्याय  देण्यासाठी "रामशास्त्री प्रभुणे" या  वृत्तीने न्याय देणारे कर्वे सर.

      स्वतःला ईजा न होवू देता, स्वतःचे इभ्रतीला आच न येवू देता सल्ले देणारे, न्याय निवाड्याच्या गोष्टी करणारे हजारो भेटतील.  एखादा दूरचा नातेवाईक मोठ्या पदावर असेल किंवा पैसेवाला असेल त्याला 'जवळचा' किंवा 'सख्खा' म्हणणारे, आणि तोच उच्च पदस्थ अडचणीत असेल किंवा पैसेवाला बिना पैसेवाला किंवा गरीब झाला  असेल तर तो नातेवाईक लगेचच 'जवळचा' नसून 'लांबचा' म्हणणारे  आणि 'सख्ख्या' चा लांबच्या नात्याने  असल्याचे सांगणारे, स्वार्थीवृत्तीचे लोक आज समाजात आहेत. अश्या या स्वार्थाने  बरबटलेल्या समाजात राहताना वाटते की, आपण एखाद्या निर्जन  रखरखत्या वाळवंटात प्रवास करत आहोत, आणि  वाळवंटात रस्त्याचे कडेला एखादे विशाल गर्द सावलीचे झाड अचानक दिसल्यावर    मनाला जो आनंद होतो त्याप्रमाणे कर्वे साहेबांसारखे एखादे व्यक्तिमत्त्व समाजात दिसले की मन कमालीचे उल्हासित होऊन जाते.

      कर्वे सर आज निवृत्त आय जी असून पुण्यात कधी तरी घेतलेल्या जुन्या फ्लॅट मध्ये राहतात. मुलगा अमेरीकेत असून मुलगी स्वित्झर्लंडला प्रशिक्षण घेवून पुण्याला आपला व्यवसाय पतीसह चालवते.
  निवृत्त माणसाला कोण भेटायला जाणार? कारण त्यांच्या कडून  कोणाला काय मिळणार? 

     होय! मी जातो. मी वर्षातून एखादे वेळी त्यांना भेटत असतो. अधून मधून फोन वर त्यांना बोलत असतो.
     का बरे? त्यांनी मला पोलीस ठाणे दिले म्हणून? माझी किंमत वाढवली म्हणून?  नाही! तर एक निःस्पृह, निर्भिड आणि  न्यायप्रिय व्यक्तिमत्त्वाला सलाम करून एका निवृत्त आयजीपीची साधी राहणीमान व जूना छोटासा फ्लॅट पाहून आपले राहणीमान कसे ठेवावे याची सतत आठवण राहावी  आणि निर्धनांना न्याय देण्याची प्रेरणा ज्योत कायमची आपल्या मनामध्ये  जिवंत राहावी यासाठी..

- जे. एस. काझी
  (B.Com.BJ)
सेवानिवृत्त वरीष्ठ पोलीस निरीक्षक, पुणे-औरंगाबाद
मो.नं.: 9923421947