वक्फ मालमत्तेवर 'काझी' अतिक्रमणाचा मुद्दा अधिवेशनात चर्चेला घ्या : सीएमकडे आरिफ अलींची मागणी

वक्फ मालमत्तेवर 'काझी' अतिक्रमणाचा मुद्दा अधिवेशनात चर्चेला घ्या : सीएमकडे आरिफ अलींची मागणी

अंबाजोगाई, बीड: (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील वक्फ मालमत्तांवर झालेले बेकायदेशीर अतिक्रमण हटवून या मालमत्ता सुरक्षित आणि पुनर्संचयित करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी नाशिक येथील चार्टर्ड अकाउंटंट आणि वक्फ मालमत्तांचे व्हिसल ब्लोअर सय्यद आरिफ अली यांनी केली आहे. विशेषत: संगीन मस्जिदच्या वक्फ मालमत्तेवर महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे सध्याचे अध्यक्ष आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) अल्पसंख्याक विभागाचे कार्याध्यक्ष समीर गुलाम नबी काझी यांनी बेकायदेशीरपणे ताबा मिळवल्याचा गंभीर आरोप सय्यद अली यांनी केला आहे.

        या प्रकरणात समीर काझी यांच्यासह इतर संबंधित व्यक्ती आणि सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध वक्फ अधिनियम, १९९५ च्या कलम ५१, ५२अ आणि १०४अ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सय्यद अली यांनी केली आहे. यासोबतच, या मालमत्तांवर एफआयआर दाखल करून फौजदारी कारवाई करावी, तसेच बीडच्या पोलीस अधीक्षकांना विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे. 

         सय्यद आरिफ अली यांनी या मालमत्तांना "खिदमत मास" (सेवा इनाम) वक्फ मालमत्ता म्हणून तात्काळ मान्यता देण्याची आणि त्यांची अधिकृत सूचना जारी करण्याची मागणी केली आहे. तसेच, वक्फ मंडळाला या मालमत्तांचा भौतिक आणि कायदेशीर ताबा परत मिळवून देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असेही त्यांनी सुचवले आहे. याशिवाय, या मालमत्तांवर तृतीय पक्षाचे व्यवहार थांबवण्यासाठी सार्वजनिक चेतावणी परिपत्रक जारी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

         सय्यद आरिफ अली यांनी यापूर्वी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला असून, फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश असतानाही पोलिसांनी एफआयआर दाखल केलेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक विकास विभागाच्या मंत्र्यांसह विरोधी पक्षनेते आणि अनेक आमदार-खासदारांना पत्र पाठवून हा मुद्दा विधानसभा आणि विधान परिषदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्याची विनंती केली आहे.

             मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि वक्फ मालमत्तांचे संरक्षण, संवर्धन आणि जतन करण्यासाठी हा गंभीर मुद्दा पावसाळी अधिवेशनात विधानमंडळात चर्चेसाठी घ्यावा, असे आवाहन सय्यद आरिफ अली यांनी सर्व आमदारांना केले आहे. ते म्हणाले, "वक्फ मालमत्तांचे संरक्षण हा केवळ मुस्लिम समाजाचाच नव्हे, तर सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र येऊन तातडीने कारवाई करावी."

          या प्रकरणात त्वरित कारवाई होऊन वक्फ मालमत्तांचे संरक्षण आणि पुनर्स्थापना व्हावी, अशी अपेक्षा सय्यद आरिफ अली यांनी व्यक्त केली आहे.