मुस्लिम व्यक्तीचा सन्मान मुस्लीमेतर लोक करतात तेंव्हा..

श्री. शब्बीर साहेब जिल्हा न्यायाधीश सोलापूर जिल्हा हे सेवा निवृत्त होताना त्यांच्या शेवटच्या दिवशी कोर्टातील लोकांनी (ज्यात इतर न्यायाधीश,वकील आणि कर्मचारीवर्ग यांचा समावेश असावा)जो सन्मान त्यांच्या साठी दाखवला असा सन्मान आप्तेषटांच्या कडून सुध्धा अपेक्षित नाही.(  व्हिडिओ मध्ये सविस्तर दाखविले आहे)

   आधुनिक जग जसजसे अत्याधुनिक होत आहे तसतसे लोकांच्या स्वार्थी वृत्तीचा विकास झपाट्याने होत आहे. पुर्वीच्या लोकात असलेली निःस्वार्थी भावना नैतिकमूल्ये दिवसेंदिवस लोप पावत चालल्याचे चित्र आहे. 

      स्वार्थासाठी एखाद्या पुढाऱ्याला किंवा अधिकाऱ्यास बोलावून किंवा त्याच्याकडे जावून त्याची टिमकी वाजवणारे असंख्य दिसतील परंतु एखाद्याची जात,पंथ अथवा धर्माचा विचार न करता निःस्वार्थी भावनेने कौतुक करणारे किंवा सन्मान करणारे आजकाल  पहायला मिळणे दुर्मिळच.

      अशी एखादी घटना पहिली किंवा ऐकली तर वाटते की समाजा मध्ये अद्याप माणुसकी जिवंत असून जातीपाती, पंथाच्या  पलीकडे  एकमेकांविषयी 
आत्मियतेेचा आणि आपुलकीचा भाव  अद्याप जिवंत आहे.  व्हिडिओ पाहून गैरमुस्लिमांबद्दल मुस्लिमांच्या मनात कमालीची आत्मीयता आणि आपुलकीचा भाव  निर्माण होइल यात शंका नाही.

     न्यायाधीश शब्बीर साहेब धर्माने मुस्लिम आहेत हे नावा वरूनच कळते आणि त्यांचा सत्कार,सन्मान करणारे शेकडो च्या संख्येत असलेले अधिकारी,कर्मचारी बंधूभगिनी पाचदहा वगळता सर्व मुस्लिमेतरच असतील यात शंका नाही.
 एवढा सन्मान एका मुस्लिम अधिकाऱ्याचा  निवृत्तीच्या वेळी इतरधर्मीय करतात याचा अर्थ निवृत्त होणाऱ्या व्यक्तीचे चारित्र्य आणि वर्तन अत्यंत शुद्ध आणि चांगले असले पाहिजे आणि ज्या मुस्लिम व्यक्तीचे चारित्र्य शुद्ध आणि वर्तन चांगले आहे ती व्यक्ती   इस्लामची मूल्य जपणारी खरी असली पाहिजे हे निश्चित!

      इस्लाम धर्मियांना प्रेषित मुहम्मद(स) यांचे जीवन हेच आदर्श व मार्गदर्शक मानण्यात आले आहे. प्रेषितांच्या अनेक उपदेशां पैकी एक महत्वाचा उपदेश करताना त्यांनी म्हंटले आहे की 'सत्य आणि न्यायचे साक्षीदार व्हा यात तुमची किंवा तुमच्या स्वकियांचे नुकसान झाले तरी चालेल'.     

       न्या.शब्बीर यांनी हा उपदेश लक्षात ठेवूनच न्याय देण्याचे काम केलेले आहे आणि म्हणूनच त्यांचा असा बहुमान झाला असावा.

      न्या. शब्बीर  यांच्या सन्मानाने इतर मुस्लिमांना दिसून आले की हा सन्मान पैशाने मिळणे शक्य नाही त्यासाठी सद्गुणा चीच कास धरली पाहिजे आणि त्यासाठी आपण सुध्धा शुद्ध चारित्र्यवान बनले पाहीजे.

        एखाद्या व्यक्तीचे सद्गुणाचे अनुकरण करणे एवढे सोपे नसले तरी मनात अशी भावना निर्माण होणे हे सुध्धा कमी नाही.

       सोशल मीडियाचा काळ असल्याने मागे सांगली जिल्ह्यात पुर आल्याने एक तहसीलदार स्वतःचे डोक्यावर मदती प्रीत्यर्थ ओझे वाहताना दिसले, 
कोण्या राज्यात एक आयएएस अधिकारी कार्यालयाचे पायरीवर बसलेल्या एका महिलेच्या बाजूला बसून त्याच ठिकाणी सबंधिताना बोलावून तिचे काम करून देताना दिसले आणि सोलापूरचे हे न्यायाधीश महोदय बहुमोल सन्मानाचे धनी होताना सर्वांनी पाहिले आहे.

       या अशा सद्गुणी अधिकाऱ्यांच्या कथा ऐकून असे वाटते की  अथांग समुद्रात  डुबकी मारल्यावर एखाद्याला शिंपल्या  ऐवजी मोती मिळाल्याचा आनंद व्हावा त्याप्रमाणे, बहुतांश स्वार्थी,नैतिकमूल्ये आणि वचन न पाळणाऱ्या या समाजात अशी माणसे दिसल्यावर आनंद तर होतोच पण त्यांच्यासाठी मन भरून येते ते निराळेच.

       आजच्या या समाजरुपी समुद्रात जागोजागी असे गुणी रत्न,मोती मदतीसाठी लोकांच्या   हाती  पडावेत या मागणीसाठी परमेश्र्वराकडे हात निश्चितच पसरले जातात.

- (ज.स.काझी), सेनि. वरिष्ठ पोलीस निरीक्षक
  B.Com, BJ
  9923421947
   औरंगाबाद / पुणे