पोलिसांविरुद्ध मराठवाडा विभागीय तक्रार निवारण प्राधिकरणाचे उदघाटन

पोलिसांविरुद्ध मराठवाडा विभागीय तक्रार निवारण प्राधिकरणाचे उदघाटन
Dr Nikhil Gupta, CP, Aurangabad

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील तसेच औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांचे विरुद्ध नागरिकांना तक्रार करण्यासाठी शासनाने औरंगाबादेत विभागीय तक्रार प्राधिकरण सुरू केले आहे. या प्राधिकरणाचे उदघाटन आज औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांचे हस्ते करण्यात आले.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील नागरिकांना पोलीसांबद्दल काही तक्रार असल्यास त्यांना या प्राधिकरणात तक्रार नोंद करता येणार असून कायद्याप्रमाणे तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे. तसेच तक्रारींचे आणि समस्यांचे तात्काळ निवारण झाल्याने नागरिकांना न्याय व सुविधा मिळणे सुलभ होणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात माहिती दिली.

रेल्वे स्टेशन रोड वरील महापौर बंगल्याच्या शेजारील साई ट्रेड सेंटर येथील पहिल्या मजल्यावर सुरू करण्यात आलेल्या या विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी डॉ. उमेश टाकळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी विभागीय तक्रार प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलेले निवृत्त जिल्हा न्यायाधीश दे.अ. शेगोकार, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) तथा या प्राधिकरणाचे सदस्य श्रीमती मीना मकवाना,  पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार, इतर अधिकारी, पोलीस अंमलदार आणि नागरिक उपस्थित होते.

जनसत्ताच्या बातम्या WhatsApp वर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

या प्राधिकरणा बाबत माहिती देताना पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता म्हणाले की, पोलीस नेहमीच नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज असतात. काम करताना कधीकधी चुका होत असतात.  त्याबद्दल तक्रारी निर्माण होऊन प्रकरणे कोर्टात ही जातात. सहज सुटणाऱ्या छोट्या-मोठ्या समस्या आणि तक्रारींचे निवारण आता या प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जाणार आहे. हे प्राधिकरण पोलीसांना त्रास देण्यासाठी नसून काम करताना झालेल्या चुका दुरुस्त करणे आणि नागरिकांना चांगल्या सुविधा देणे हे या प्राधिकरणाचे उद्देश आहे.

याप्रसंगी प्राधिकरणाचे अध्यक्ष शेगोकार यांनी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या न्याय निवाड्याची प्रक्रिया समजावून सांगितली.