स्मार्टसिटी प्रक्लपांतर्गत होणारे रस्त्यांची प्रलंबित कामे त्वरित सुरू करून इतर कामांची गती वाढवावी : खासदार इम्तियाज जलील

आयुक्त तथा सिईओ यांच्यासोबत सविस्तर चर्चा; हेरिटेज वॉक, आर्ट गॅलरी, बेरोजगारांना स्वयंरोजगार यांच्यासह पर्यटनास चालना देणारे विकास कामांचे दिले प्रस्ताव..
औरंगाबाद : खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी आज स्मार्ट सिटी कार्यालयात आयुक्त तथा सिईओ अभिजित चौधरी यांची भेट घेवुन स्मार्ट सिटी प्रक्लपांतर्गत प्रगतीपथावरील व प्रलंबित असलेले विकास कामे, ड्रेनेज लाईन व रस्त्याच्या कामाविषयी सविस्तर चर्चा करुन कामांची सद्यस्थितीची माहिती घेतली. मंजुरी प्राप्त रस्ते व प्रगतीपथावर असलेली विकास कामे विहीत मुदतीत होणेस्तव कामांची गती वाढवण्याचे सुचना खासदार इम्तियाज जलील यांनी देवून पर्यटनास चालना देणारे नविन प्रक्लप व कामे प्रस्तावित केली.
खासदार इम्तियाज जलील यांनी मुलभुत सुविधा, शहराच्या सर्वांगिण विकासाच्या व पर्यटनाच्या दृष्टीने असलेली कामे व प्रकल्पाविषयी आयुक्त तथा सिईओ अभिजित चौधरी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. ज्यामध्ये ऐतिहासिक सलिम अली सरोवर ते जगप्रसिध्द बिबी का मकबरा पर्यंत हेरिटेज वॉक, टाऊन हॉल बिल्डींगमध्ये अद्यावत सुविधायुक्त आर्ट गॅलरी, ऐतिहासिक सलिम अली सरोवराचे पुनरुज्जीवन करुन सुशोभीकरण व संवर्धनाचे काम, नेहरु भवन येथे सुरु असलेले अद्यावत सांस्कृतिक सभागृह व व्यापारी क्रिडा संकुलाच्या बांधकामाची पाहणी करुन काम जलदगतीने पूर्ण करणे, मौलाना आझाद रिसर्च सेंटरचे नूतनीकरण करुन अद्यावत सोयीसुविधा उपलब्ध करणे, सलीम अली सरोवरालगत असलेले एसटीपी प्लांन्टची नादुरुस्त यंत्रणेची दुरुस्ती करुन प्लांन्ट कार्यान्वित करणे आणि औरंगाबाद शहरातील सुशिक्षित बेरोजगार, निराधार महिला व दिव्यांग व्यक्तींना रोजगार व स्वयंरोजगारासाठी पूणे महानगरपालिकेने ज्या पध्दतीने त्यांच्या जागेवर छोटे दुकाने / किओस्कची उभारणी केली आहे; त्याचधर्तीवर औरंगाबाद मनपाच्या जागेवर सुध्दा छोटे दुकाने / किओस्कची उभारणी करण्यात यावी.
तसेच मुख्य बाजारपेठ व वसाहतींना जोडणारे नेहरु भवन ते औरंगपूरा रस्ता, कट कट गेट ते जमात-ए-इस्लामी कार्यालय रस्ता, पटेल हॉटेल किराडपूरा ते रोशन गेट रस्ता, चंपा चौक ते चेलीपूरा रस्ता, खासगेट ते जीन्सी चौक रस्ता आणि रोझेबाग इदगाह या मंजुरी प्राप्त रस्त्यांचे कामे त्वरीत सुरु करण्याचे सुचना खासदार इम्तियाज जलील यांनी केल्या.