पोलीस निरीक्षकाला निलंबित करा : वकीलांचा पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा
औरंगाबाद ७ जानेवारी: जिल्हा वकील संघाचे दोन सभासद, एड. सिद्धार्थ बनसोडे आणि एड. किशोर वैष्णव यांना सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संग्राम ताठे यांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले व चुकीचा गुन्हा नोंदवून त्यांची समाजात बदनामी केली, असा आरोप आहे.
या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जिल्हा वकील संघाने पेनडाऊन आंदोलन करत, जिल्हा न्यायालयापासून पोलिस आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यावेळी पोलिस निरीक्षक संग्राम ताठे यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी करत निवेदन पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना देण्यात आले. आयुक्तांनी याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
मोर्चामध्ये जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एड. मिलिंद पाटील, सचिव एड. तिर्थराज चावरे, उपाध्यक्ष एड. सुनील पडूळ व सुवर्णा डोणगावकर, सहसचिव एड. करण गायकवाड यांच्यासह अनेक वकील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, फुलंब्री, सोयगाव, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद आणि कन्नड तालुक्यांमधील वकील संघटनांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला.