क़ुरआन सोपं आहे : स्मरणासाठी आणि मंथनासाठी
"वा लक़द यस्सरनल क़ुरआना लिज़्ज़िक्री फहल मिम्मुद्दकिर" (सूरह अल-क़मर, ५४:१७) याआयतीत अल्लाह क़ुरआनच्या शिकवणीला सोपा बनवल्याचा उल्लेख करतो, जेणेकरून लोक त्यातून शिकू शकतील आणि त्यावर विचार करू शकतील.
ही आयत क़ुरआनच्या अनोख्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकते. अल्लाहने या आयतीत क़ुरआनला स्मरणासाठी सोपा बनवल्याचा उल्लेख केला आहे. याचा अर्थ असा आहे की, क़ुरआनच्या शिकवणींमध्ये असे एक वैशिष्ट्य आहे जे साध्या व्यक्तीला देखील समजण्यास सोपे आहे, जर ती मनापासून शिकण्याची आणि समजण्याची इच्छा बाळगते.
या संदर्भात अनेक हदीस देखील आहेत, ज्या क़ुरआनच्या शिकवणींना सोपं, प्रभावी आणि विचारशील बनवण्याच्या अल्लाहच्या इच्छेची पुष्टी करतात. एक हदीस प्रमाणे, पैग़ंबर मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) म्हणाले, "तुमच्यापैकी सर्वोत्तम तो आहे जो क़ुरआन शिकतो आणि दुसऱ्यांना शिकवतो." (सहीह बुखारी). या हदीसच्या माध्यमातून क़ुरआन शिकण्याची आणि इतरांना शिकवण्याची महानता स्पष्ट होते. क़ुरआनला समजण्याचे कार्य केवळ विद्वानांसाठी मर्यादित नाही, तर प्रत्येक सामान्य मुसलमानसाठी उपलब्ध आहे.
क़ुरआनचा अभ्यास आणि स्मरण हे फक्त धार्मिक कार्य नाही, तर जीवनाला दिशा देणारे साधन आहे. जीवनातील समस्या आणि संकटांवर मात करण्यासाठी क़ुरआनच्या आयतींचे चिंतन केल्यास अनेक मार्गदर्शक गोष्टी मिळतात. तसेच क़ुरआनला समजणे आणि त्यावर आधारित वागणे हे अल्लाहच्या आज्ञांचे पालन करण्याचे साधन आहे. अल्लाहने क़ुरआनमध्ये विविध उदाहरणे आणि गोष्टी दिल्या आहेत ज्यामुळे लोक त्यातून शिकू शकतात आणि दृष्टीकोन विकसित करू शकतात.
अल्लाहने कुरआनला सोपा बनवल्याने, हे केवळ निव्वळ ग्रंथ नसून मानवासाठी एक मार्गदर्शक, समाधान, आणि प्रेरणा आहे.
- डॉ. रियाज़ देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त (सेनि), औरंगाबाद.