अजिंठा बँक घोटाळा प्रकरण : माजी आम. सुभाष झांबडला अटक

औरंगाबाद, ७ फेब्रुवारी: अजिंठा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचा माजी आमदार सुभाष झांबड याने आज सकाळी पोलिस आयुक्तालयात आत्मसमर्पण केले, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
गेल्या काही महिन्यांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते. अटकेपूर्वी झांबडने जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली. सर्व मार्ग बंद झाल्यानंतर, शुक्रवारी सकाळी झांबडने स्वतःला पोलिसांसमोर हजर केले.
माजी आमदार सुभाष झांबड हा अजिंठा अर्बन कॉपरेटिव बँकेचा अध्यक्ष आहे. त्याच्याविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात ९८ कोटी ४८ लक्ष आणि २१ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला गुन्हा ऑक्टोबर २०२३ मध्ये दाखल करण्यात आला होता, तर दुसरा गुन्हा नोव्हेंबर २०२४ मध्ये दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार होता. आणि तो अटकपूर्व जामिनासाठी विविध न्यायालयांमध्ये धाव घेत होता, परंतु जिल्हा आणि सत्र न्यायालय, औरंगाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्याचे अर्ज फेटाळले. नाईलाजाने सुभाष झांबड आज पोलिसांना शरण आला पोलिसांनी त्याला रीतसर अटक केली आणि त्याला आज दुपारी ३ वाजता न्यायालयात हजर केले. सुमारे २० मिनिटे चाललेल्या सुनावणीनंतर, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.