दिव्याखाली अंधार!!

या सामान्य म्हणीचा अर्थ बहुधा सर्वांना माहितच असावा की, उजेड/प्रकाश देणाऱ्या दिव्याखाली अंधार असतो. म्हणजे कसे की प्रश्न-उत्तर, सुख-दुःख, चांगले-वाईट, गुण-अवगुण, इत्यादी हे उजेड आणि काळोखाखाप्रमणे परस्परविरोधी असेल तरी एकमेकांशी निगडितच असतात. किंबहुना काही घटक तर इतके परस्परविरोधी भासवले जातात जणू जन्माचे वैरीच! जसे ; सत्ताधारी आणि विपक्ष! पण वास्तवात पडद्यामागे काय व कसे साटेलोटे असेल हे सांगणे किंवा याचा कयास लावणे ही फार अवघड गोष्ट आहे. आजमितीला देशाची स्थिती फारशी अशीच जाणवते, म्हणजे दिव्याखाली अंधारच आणि परस्परविरोधी वैरी भासविणारे षडयंत्र हे जणू एकाच वेळी चालू आहे - ते ही जनतेच्या डोळ्यांदेखत! तसे देशाच्या बहुतांश जनतेला छोट्या, खोट्या, अत्यंत क्षुल्लक व अनावश्यक मुद्द्यांच्या नादी लावून मूळ विषयापासून दूर ठेवणे हे स्वातंत्र्यापूर्व काळातील शासाकांना व इंग्रजांनाही जमले नसावे तितक्या खुबीने व सहजतेने आजकालचे बहुतांश कथित लोकप्रतिनिधी जमवून घडवतात. आणि आम्ही कथित मायबाप जनता हे जाणूनही यांना विकासाचे प्रवर्तक मानत समाजाचे आणि देशाचे नुकसान करण्यात यांना अप्रत्यक्षपणे साथ देतो!?!
प्रचंड बेरोजगारी, महागाईचे वाढते प्रमाण, शिक्षण व आरोग्य या महत्त्वाच्या बाबींचा वाढीव खर्च (शासकीय रुग्णालयांत एकतर स्वस्तात उपचार होतात आणि तिथे उपचाराची अव्वाच्या सव्वा देयके माथी मारली जात नाहीत. मात्र खाजगी रुग्णालयांना कठोर दिशानिर्देश लागू करण्याऐवजी आणि त्याशी निगडित प्रस्थापितांना पोसण्यासाठी जनतेला आर्थिक मदत करण्याच्या नावाखाली काही आरोग्य योजना राबविल्या जात असाव्यात), इत्यादी बाबी हे सत्तेचे अपयश आणि विरोधकांच्या अपुऱ्या विरोधाची लाचारी मुळीच नाही! तर हीदेखील या परस्परविरोधी भासवणाऱ्यांची योजना असावी, ज्याद्वारे या दोन्ही स्वार्थी व षडयंत्रकारी घटकांना स्वतःचे अनावश्यक/फालतू मुद्दे/विषय बळेच नचविण्यासाठी व कथित रीतीने गाजविण्यासाठी भडकलेली/भडकवलेली उद्विग्न रिकामी डोकी आणि रस्त्यावर उतरून कथित निषेध/मोरच/आंदोलन/दंगल/हिंसाचार/गुन्हे/आतंकवाद/दहशतवाद/इत्यादी समाजघातकी कृत्य करण्यासाठी/करवून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात फुकट/स्वस्त असे समाजकंटक मिळणार तरी कुठून आणि कसे? आणि हे जमल्याशिवाय/जमावल्याशिवाय यांच्या वास्तविक स्वार्थी, छुप्या, भ्रष्ट कारवाया पूर्ण होणार तरी कश्या?
समर्थनाचे महत्त्व तिथेच ठळकपणे दिसून येते किंवा दाखवले जाते जिथे तुल्यबळ विरोध किंवा विरोधाभास आहे. अशीच दयनीय, केविलवाणी आणि वस्तुस्थिती दिव्याखाली अंधार आणि समाजात अशंतातेसह अराजकता पसरवत आहे. त्याला साथ देण्यासाठी मानवतेच्या मर्यादा आणि राजकारणाची पातळी सोडून खालील युक्त्या/क्लृप्त्या वापरल्या जात आहेत...
कथित विकासाची व जनतेच्या समर्थनाची भ्रामक व स्वयंघोषित कथित सकारात्मक पण वास्तवात तथ्यहिन व बळेच सकारात्मकता दर्शविणारी आकडेवारी,
खोटी वक्तव्य आणि माहितीची वारंवारतेसोबत आरोपांची केविलवाणा धडपड किंवा त्यांचे खंडन करण्याची तगमग करणे,
समाजाचा आरसा म्हणविणाऱ्या आणि लोकशाहीचा स्तंभांपैकी एक असलेल्या सत्य मांडणाऱ्या घटकांशी/साधनांशी अर्थपूर्ण तडजोड किंवा दबावतंत्र वापरून त्यांची मुस्कटदाबी,
किर्रकिट्ट करणाऱ्या आरोपांच्या फैरी किंवा पत्रकार परिषदेद्वारे/श्वेतपत्रिकेद्वारे भ्रष्टशिरोमणी जाहीर केलेल्या व्यक्तीला नंतर आदर्श ठरवत आपल्या पंगतीत आदरसन्मानाने वागवत सत्ता व सामर्थ्यात छोटासा वाटा देणे,
लोकशाहीची तमा बाळगणाऱ्या न्यायपालिकेतील जबाबदार व्यक्तींना सत्य अर्थात वस्तुस्थितीला सप्रमाण मान्य करून त्याला केवळ शेऱ्याचे स्वरूप देऊन विपरीत अर्थात आपल्या मर्जीचा निकाल देण्यास भाग पाडणे,
अत्याचार-पक्षपात व जातीवादाच्या उघडपणे होत असलेल्या पाशवी घटनांकडे त्यावर अंकुश ठेऊन न्याय करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांनी अमानवीय अश्या निर्लज्जपणाने दुर्लक्ष करणे,
प्रजासत्ताक यंत्रणेतील प्रशासकीय धुरा सांभाळणाऱ्या मुख्य यंत्रणेला मूळ कर्तव्यापासून परावृत्त करून स्वर्थसाठीच वापरणे,
सर्वसामान्य जनतेला मूलभूत गरजांना उत्तमोत्तम साकार करण्याची आश्वासनं देऊन त्यांचा जीवनप्रवास क्लेशदायक करणे, स्वार्थ व सामर्थ्य बळकाव्यासाठी (ब्रिटिश राजवटीच्या काळातील ब्रिटिशांचे मांडलिकत्व स्वीकारणाऱ्या शासकांप्रमाणे) मोजक्या उद्योजकांच्या/व्यावसायिकाच्यां सेवेसाठी जनतेला देशोधडीला लावणे,
प्राथमिक शिक्षण घेताना सुरवातीलाच कळते की, भारत कृषीप्रधान देश आहे. पण वास्तव व्यावहारिक जीवनात हे कळते की या कृषीप्रधान यंत्रणेचा कणा असणाऱ्या बळीराजाच्या समस्या प्रलंबित ठेवणे, ज्याला कंटाळून (राजाप्रमाणे मान सन्मानाचा मानकरी असलेला) हा स्वतःचा बळी देतो आणि हे अनादी काळापासून अविरतपणे चालू आहे. विविध सत्तांतर घडतात, पण यांच्या आयुष्याची वाताहत लावणे निर्दयीपणे चालविली जाते,
अत्यावश्यक योजना-प्रकल्प टाळून किंवा ते मुद्दामून वादग्रस्त ठरवत भलत्याच योजनांच्या अंमलबजावणीसाठी सार्वजनिक संपत्तीची लूट करत भ्रष्टाचार माजविणे,
सत्ता, सामर्थ्य व संपत्तीचा उन्मादात लोकशाहीची तत्त्वं आणि संविधानाचे महत्त्व यांना औपचारिकतामात्र स्थान देऊन जनतेच्या, समाजाच्या आणि देशाच्या न्याय्य अपेक्षांना/अधिकारांना हरताळ फासणे,
देशसेवा व जनसेवा यांच्याशी फारकत घेतलेल्या बहुतांश लोकप्रतिनिधींना जनतेला व्यस्त ठेवण्यासाठी (देशसेवा/जनसेवा करत आहे असे भसवण्यासाठी) काही मुद्दा मिळाला नाही तर वर्तमानात विरोधी तर कधी काळी सत्तेत असलेल्या गटाची उणीधुणी उकरून काढणे आणि तसेच काहीसे वर्तमानातील विरोधी व कधी काळी सत्तेत असलेला गटही करतो! सावत्रापणाचा आव आणून तुलनात्मक भांडण करणारी ही दोन्ही मंडळी आपापल्या सत्ताकाळात एकमेकांना केलेल्या छुप्या मदतीचे पांग संधी मुळीच सोडत नाहीत. यातूनच एकाने मारण्याचे आणि दुसऱ्याने रडण्याचे नाटक करणे सहजपणे जनतेच्या माथी मारले जाते.
पक्षपात व जातीवाद यासोबत प्रांतवाद माजवून राजकीय व सामाजिक अस्थिरता जाणीवपूर्वक वाढविणे,
विरोधी विचारसरणीच्या घटकांना नाममात्र शिल्लक ठेवणे किंवा त्यांच्यासोबत अर्थपूर्ण तडजोड करणे किंवा त्यांना विरोधीच अशी बतावणी करण्याची सुपारी देऊन जनतेला चुना लावणे, इत्यादी. थोडक्यात ते असे की संविधानिक लोकशाही ही कागदावरच सक्षम ठेऊन वास्तविक्तेत या ना त्या योजना, सुधारणा, विकास, आधुनिकता, ऐतिहासिक संदर्भ, इत्यादी कारणांनी पोखरून खिळखिळी केली जात आहे. जनता, समाज व देश यांच्या हितासाठी दिव्याखलचा हा अंधार दूर करण्यासाठी "सत्ता/सरकार सुधारणा कायदा" आणून त्याची सकारात्मक व वास्तविक अंमलबजावणी आवश्यक आहे.
- इकबाल सईद काझी (विश्लेषक/लेखक/कवी)