रमेश बिधुडी यांच्या विरोधात काँग्रेसचे जोरदार जोडे मारो आंदोलन

रमेश बिधुडी यांच्या विरोधात काँग्रेसचे जोरदार जोडे मारो आंदोलन

औरंगाबाद, ७ जानेवारी: भाजप नेते आणि कालका विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रमेश बिधुडी यांनी खासदार प्रियंका गांधी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी सिंग यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याने काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या वक्तव्यामुळे महिलांच्या भावना दुखावल्याने औरंगाबाद येथील आंबेडकर नगरात शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने "जोडे मारो आंदोलन" करण्यात आले.

          शहर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मंजुताई लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आंदोलनास सुरुवात झाली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रमेश बिधुडी यांच्या प्रतिमेला चपलांचा वर्षाव केला आणि भाजपाने त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.

          रमेश बिधुडी यांनी प्रियंका गांधी, आतिशी सिंग आणि अल्पसंख्याक समाजाबद्दल वादग्रस्त विधानं केली. यापूर्वीही त्यांनी संसदेत मुस्लिम समाजाविरोधात अपशब्द वापरले होते. यामुळे काँग्रेसने भाजपावर महिलांचा आणि अल्पसंख्याकांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने मागणी केली की भाजपाने बिधुडी यांना पक्षातून काढून टाकावे आणि उमेदवारी रद्द करावी.

            आंदोलनादरम्यान महिलांनी "महिलाओ के सन्मान में काँग्रेस मैदान", "प्रियंका गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं" आणि "रमेश बिधुडी मुर्दाबाद" अशा जोरदार घोषणा दिल्या.

          या आंदोलनाला काँग्रेसचे डॉ. जफर अहमद खान, इब्राहिम पठाण, जगन्नाथ काळे, मोईन इनामदार, डॉ. अरुण शिरसाट यांसह अनेक नेते आणि महिलांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेखाताई राऊत व रवी लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

           काँग्रेसने रमेश बिधुडी यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.