समृद्धी महामार्गावर पोलिसांची मोठी कारवाई: ८३ लाखांचा गुटखा व वाहन जप्त

छत्रपती संभाजीनगर, २२ जुलै: गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २१ जुलै रोजी रात्री ११:३० च्या सुमारास माळीवाडा परिसरात समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई केली. यात ८३ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहन जप्त करण्यात आले.
पोलिस उपनिरीक्षक नवनाथ पाटवदकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे करोडी टोलनाक्याजवळ एक संशयास्पद आयशर टेम्पो (क्र. DD 01 G 9092) थांबवला. चालक बनसिंग बाबुलाल कटारिया (वय ३७, रा. बडागाव, मध्य प्रदेश) याने वाहनात ७५ गोण्या 'बाजीराव' पानमसाला (किंमत ५६.२५ लाख) आणि 'मस्तानी' जर्दा (किंमत ६.७५ लाख) असल्याचे आढळले. याशिवाय, २० लाख रुपये किंमतीचा टेम्पोही जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त, उपायुक्त आणि सहायक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक नवनाथ पाटवदकर आणि इतर पथकाने केली.