पोलिसांची कर्तव्य तत्परता :  पाच तासात जनावर चोरीचा गुन्हा उघड

पोलिसांची कर्तव्य तत्परता :  पाच तासात जनावर चोरीचा गुन्हा उघड

उरळ, 27 मार्च : (मोतेबर देशमुख) अकोला जिल्ह्यातील पुरण पोलीस ठाण्याचे हद्दीतील ही घटना. मोरगाव सादीजन येथील एक गरीब शेतकरी, नामे विष्णू तुळशीराम टेकाळे हा  उरळ  पोलीस ठाण्यात आला. त्यांनी ड्युटीवरील अधिकाऱ्यांना सांगितले की हसनापूर रोडवरील त्यांचे शेतातील गोठ्यातून दोन गोरे एक जर्सी जातीचा आणि एक गावरान ज्यांची किंमत किंमत अंदाजे चाळीस हजार रुपये आहे, शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री कुणीतरी चोरून नेले आहे. आजूबाजूला शोध घेतला परंतु मिळून आले नाही. 

     पोलिसांनी कर्तव्य तत्परतेने त्यांची तक्रार लिहून घेत भारतीय दंडविधानाची कलम 380 नुसार गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली. तपासी अंमलदारासह ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंतराव वाडतकर यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली, आपले गुप्त बातमीदारांना माहिती देऊन आरोपींचा पत्ता काढण्यास सांगण्यात आले. 

     याचा फायदा झालाच.  ठाणेदार अनंतराव वडतकर यांचे एका गुप्त बातमीदारांनी त्यांना माहिती दिली की ही चोरी मोरगाव सादीजन येथीलच दोन भामटे, संतोष देवसिंग सोळंके आणि सतीश शांताराम निखाडे यांनी मिळून केली आहे. मिळालेली गोपनीय माहिती खात्रीशीर असल्याने या दोघांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आपल्या सायंटिफिक पद्धतीने विचारपूस करून त्यांना बोलते केले. तेव्हा दोघांनी पटपट गुन्ह्याची कबुली दिली. 

     चोरलेले जनावर हातरुन गावाचे शिवारातील एका शेतात बांधून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ हातरून शिवार गाठून चोरांनी सांगितलेल्या ठिकाणावरून चोरीस गेलेले जनावर पंचनामा करून ताब्यात घेतले. दोन्ही चोरांना अटक करण्यात आली असून आज त्यांना बाळापूर न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात येणार आहे. यापूर्वीही त्यांनी गुन्हे केलेले आहेत का?  याबाबतचा कसून शोध घेतला जात आहे.

      तक्रार आल्यानंतर अवघ्या पाच तासात गुन्हा उघडकीस आणणारे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंतराव वाडकर यांनी ही कारवाई त्यांचे सहकारी पोलीस हवालदार विजयसिंह झाकर्डे, पोलीस अंमलदार रघुनाथ नेमाडे, शैलेश घुगे, नागेश बाभुळकर, अतुल क्षीरसागर यांचे सह पार पाडली