रिटायर्ड एसीपी डॉ. रियाज़ देशमुख यांची समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती

रिटायर्ड एसीपी डॉ. रियाज़ देशमुख यांची समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती

औरंगाबाद, २२ जानेवारी (प्रतिनिधी) :  समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू असीम आझमी यांनी एक मोठा निर्णय घेत महाराष्ट्र पोलीस विभागातील डॅशिंग अधिकारी, रिटायर्ड असिस्टंट पोलीस कमिशनर डॉ. रियाज़ देशमुख यांची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या पोलीस विभागातील दीर्घ अनुभवामुळे समाजवादी पक्षाला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.

           रिटायर्ड झाल्यानंतर डॉ. रियाज़ देशमुख औरंगाबाद येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी नेहमीच अन्यायग्रस्त आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मागील चार वर्षांपासून ते औरंगाबाद येथून 'सत्यपत्रक' या मराठी दैनिकाचे संपादन व प्रकाशन करत आहेत, ज्याद्वारे सामाजिक मुद्द्यांवर आवाज उठवला जातो.

          सन २०२३ मध्ये रामनवमीच्या वेळी किराडपूरा येथे झालेल्या दंगलीत पोलिसांच्या अंधाधुंद फायरिंगमध्ये एका निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झाला होता. शेख मुनिरुद्दीन नामक व्यक्ती आपल्या घराच्या कुलूपबंद गेटच्या आत असताना त्याला गोळी लागून मृत्यू झाला होता. परंतु, पोलिसांनी त्याच्यावर खोटी एफआयआर दाखल करून त्याला जमावातील असल्याचे दाखवले. या प्रकरणात डॉ. रियाज़ देशमुख यांनी पुढाकार घेत पोलिसांना त्यांच्या चुकीसाठी नागडे केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे सरकारला या गोळीबाराच्या प्रकरणाची दंडाधिकारी चौकशीचे आदेश द्यावे लागले. चौकशीदरम्यान डॉ. देशमुख यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करून बिल्डिंग मधील सीसीटीव्ही फुटेज सादर करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

          आमच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर डॉ. रियाज़ देशमुख म्हणाले की, "औरंगाबादच नव्हे, तर महाराष्ट्रात कुठेही अत्याचार झाला तर मी अन्यायग्रस्तांसाठी आवाज उठवेन." त्यांनी असेही स्पष्ट केले की, समाजवादी पक्षाला महाराष्ट्रात अधिक बळकट करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहतील.

          डॉ. रियाज़ देशमुख यांच्या पोलीस विभागातील अनुभव आणि सामाजिक कार्याचा मोठा फायदा पक्षाला होईल, असे समाजवादी पक्षाचे नेतृत्व मानत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नवा जोम मिळेल, अशी आशा आहे.