समान नागरिक कायदा: हिंदुत्ववादी जंगलातील गोंधळाचा "महाकाव्य" अध्याय!

समान नागरिक कायदा: हिंदुत्ववादी जंगलातील गोंधळाचा "महाकाव्य" अध्याय!

      भारताचे संविधान तयार करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदूंच्या "कायदा जंगलाचा" उल्लेख केला होता, हे आपण विसरलो नाहीत ना? जिथे प्रत्येक जातीचं आपलं वेगळं "सविधान" होतं आणि न्यायाचा बायका-मुलांसारखा बाजार लागलेला होता. आज संघ विचारवंत याच जंगलात उभं राहून समान नागरी कायद्याचा ढोल बडवत आहेत. ते सांगतात की, समान नागरी कायदा हा मुस्लिमांना "शरीयतीच्या मोहातून" सोडवण्यासाठी आणि त्यांना राष्ट्रप्रेमी बनवण्यासाठी आवश्यक आहे. मग हिंदूंच्या जाती, वर्ण, शंकराचार्यांच्या सनातनी घोषणांचे काय?
सुरुवातीला, संघाच्या विद्वानांनी आपल्या हिंदू समाजाला समान नागरी कायद्याचं प्रशिक्षण दिलं का? जिथे जाती, उपजाती, वर्णसंस्था हे धर्माचे "गौरवशाली" भाग मानले जातात, तिथे हे समानता आणि न्यायाचे तत्व कुठून येणार? हिंदुत्ववादी म्हणतात, "समान कायदा हवा, पण आम्हाला आमचं जातीचं सोनेरी गाठोडं पाहिजे!" हा विरोधाभास म्हणजे "घरी शिस्त नाही, पण शेजाऱ्याला शिकवण्याचा हट्ट" असं काहीसं आहे.

          समान नागरी कायदा लागू न करण्याचं खापर नेहमी मुस्लिमांवर फोडलं जातं. मुस्लिम नेत्यांची भीती आणि इस्लामची अडाणी प्रतिमा संघाने तयार केली आहे. त्यामुळेच जेव्हा संघाचे प्रतिनिधी चॅनेल्सवर "समान कायदा लागू करा" असं ओरडतात, तेव्हा मुस्लिम नेते लगेच "शरीयत बचाव" मोर्चे काढतात. मग काय, सामान्य हिंदूच्या डोक्यात विचार जातो – "बघा, मुस्लिमांना देशाच्या कायद्यावर किती राग आहे!"
पण हा प्रोपगंडा इतका सराईत आहे की सामान्य हिंदूंना कधीच विचार येत नाही – "आमच्या जातीच्या जंगलात समतेचा सूर कधी लागणार?" बाबासाहेबांनी या जंगलाची व्यवस्थित छाननी करून सांगितलं होतं की, पहिल्यांदा हिंदूंनी आपला कायदा ठरवावा, मगच इतरांसाठी समान कायद्याचा विचार होईल. पण संघाचं म्हणणं वेगळं आहे – "सगळ्यांचं जंगल साफ करा, पण आमचं जंगल पवित्र आहे!"

          डॉ. आंबेडकर म्हणाले होते, हिंदू कायद्यात सुधारणा केल्याशिवाय समान कायद्याचं स्वप्न बघणं हास्यास्पद आहे. पण संघाचं अजूनही तेच आहे – "आमच्या जातीय जंगलात हात लावू नका, फक्त मुस्लिम कायद्यावर टीका करा." आजही हिंदू समाजातील वर्णव्यवस्थेवर प्रश्न विचारल्यास, "ही तर आमची परंपरा आहे, धर्माचा आत्मा आहे," असं म्हणून ते टाळलं जातं. मग समान नागरी कायदा नेमका कुणासाठी आहे? फक्त मुस्लिमांच्या शरीयतीसाठी का?

          संघाच्या विद्वानांना असं वाटतं की समान नागरी कायदा लागू केल्यावर मुस्लिम थेट "संघ विचारधारेशी" जुळतील. पण त्याआधी आपल्या घरातील जातीय गोंधळावर काय उपाय?
समस्या: मुस्लिम विरोध करत आहेत!
उत्तर: हिंदूंचं जंगल आधी स्वच्छ करा!
समस्या: शरीयतीतून इस्लाम कधीच बाहेर येणार नाही!
उत्तर: तुमचं वर्ण आणि जातीय जंगल तरी कधी एकसमान होणार?

          डॉ. आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारांचा विपर्यास करून संघ "समान कायदा" या नावाखाली मुस्लिमविरोधी अजेंडा रेटतो आहे. प्रत्यक्षात, समान नागरी कायदा लागू करायचं स्वप्न तोपर्यंत पूर्ण होऊ शकत नाही, जोपर्यंत हिंदू समाज आपलं जातीय जंगल साफ करत नाही.

           त्यामुळे, समान नागरी कायद्याच्या नावाखाली फक्त मुस्लिमांवर हल्ला करण्याऐवजी हिंदू समाजानं प्रथम आपल्या घरात सुधारणा केली पाहिजे. नाहीतर संघाचं हे "समान कायदा" नाटक फक्त एक विनोदी प्रयोग ठरेल!
-डॉ. रियाज़ देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त (नि), औरंगाबाद