बाजार समितीच्या गैरकारभाराविरोधात व्यापाऱ्यांचा इशारा – AIMIMच्या नेतृत्वात आंदोलनाची तयारी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारातील अनियमितता, बेकायदेशीर बांधकामे आणि शासकीय जमिनीच्या विक्रीमुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. यापुढे अन्याय सहन करणार नाही, असा इशारा देत AIMIMच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
व्यवसायासाठी आवश्यक कागदपत्रे मिळाली नाहीत
गेल्या अनेक वर्षांपासून मार्केटमध्ये दुकाने चालवणाऱ्या गाळाधारकांना आजतागायत कोणतीही बांधकाम परवानगी, मंजूर नकाशा किंवा पूर्णता प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचे व्यवसाय आणि बँकेशी संबंधित व्यवहार अडकले आहेत.
सुधारीत नकाशात गैरप्रकाराचे आरोप
२०१८ आणि २०२४ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या सुधारीत नकाशांमध्ये पार्किंग व सार्वजनिक उपयोगाच्या जागा खासगी वापरासाठी दाखवण्यात आल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. हे नकाशे नगररचना विभाग आणि महापालिकेने व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता मंजूर केल्याने तीव्र नाराजी आहे.
शासकीय जमिनीची बेकायदेशीर विक्री सुरू?
जळगाव रोडवरील बाजार क्षेत्र शहरी भागात आल्यामुळे तिथल्या जमिनीचे दर वाढले आहेत. या संधीचा गैरफायदा घेत बाजार समितीकडून एजंटांच्या मदतीने शासकीय प्लॉट्सची विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.
अडथळा आणणाऱ्यांना धमक्या
ज्यांनी या सर्व गोष्टींवर आक्षेप घेतला, त्यांना स्ट्रक्चरल ऑडिटच्या नावाखाली धमकावले जात असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले. सेल हॉल क्र. ५ धोकादायक स्थितीत असल्याचे कारण देऊन दुकान रिकामी करण्याचे नोटीस दिले गेले. पण जेव्हा व्यापाऱ्यांनी दुसरे ऑडिट करण्याची मागणी केली, तेव्हा त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला.
वसतिगृहाच्या नावाखाली शॉपिंग कॉम्प्लेक्स?
व्यापाऱ्यांचा आरोप आहे की, शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी आरक्षित जागेवर आधीच बांधकामाचा प्रयत्न झाला, जो विरोधामुळे थांबवावा लागला. त्यानंतर वसतिगृहाच्या नावाखाली तोच प्रकल्प पुन्हा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. व्यापाऱ्यांनी स्पष्ट सांगितले की त्यांना वसतिगृहाला विरोध नाही, पण ते नियमानुसार आणि वादमुक्त जागेवरच व्हावे.
राज्यपालांना चुकीची माहिती देण्याचा आरोप
व्यापाऱ्यांनी असा आरोपही केला की महामहीम राज्यपालांना चुकीची माहिती देत व्यापारी विकासकामांना विरोध करतात, असे भासवले जात आहे – जे पूर्णपणे खोटे आहे.
AIMIMच्या नेतृत्वात मोठ्या आंदोलनाचा इशारा
सुभेदारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत AIMIMचे माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आणि AIMIMचे जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी एकमताने ठरवले गेले की, बाजार समितीने त्वरित अन्याय थांबवावा, अन्यथा AIMIMच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात येईल.