औरंगाबादला चकाचक केल्याबद्दल मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी MIM कडून मुख्यमंत्र्यांचे तुतारी वाजवून केले जाणार जंगी स्वागत : खा. इम्तियाज़ जलील
मराठवाड्याचा सर्वांगिण विकास केल्याबद्दल मुख्यमंत्र्याचा तुतारी वाजवुन पुष्पवृष्टीने होणार जंगी स्वागत – खासदार इम्तियाज जलील
१७ सप्टेंबरला १४ कर्तृत्वान महापौरांनी औरंगाबादेत व राज्य शासनाने मराठवाड्यात केलेल्या विकासकामांच्या माहितीचे फलक
औरंगाबाद, दि.१४ : मराठवाड्याचा सर्वांगिण विकास आणि सर्वसामान्य जनतेचे विविध प्रलंबित समस्या व तक्रारींचे निवारण करुन मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सिध्दार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभाजवळ ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभात उपस्थित राहण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटीत येणारे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेबांचे मराठवाड्यांवर प्रेम करणारे माझ्यासह सर्व मावळे मराठवाड्याच्या संस्कृतीत ज्याप्रमाणे पाहुण्यांचे स्वागत करण्यात येते त्याचप्रमाणे चिकलठाणा विमानतळापासून ते सिध्दार्थ गार्डन पर्यंत तुतारी वाजवुन पुष्पवृष्टीने जंगी स्वागत करुन आभार व्यक्त करणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी सुभेदारी गेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषदेत दिली.
पाहा व्हिडिओ: नक्की काय म्हणाले खासदार इम्तियाज जलील.
मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास मी उपस्थित राहुन मराठवाड्यास अतिजास्त भरीव निधी देवुन विविध लोकोपयोगी प्रकल्प व प्रस्तावांना मान्यता देवुन मराठवाड्याचा सर्वांगिण विकास करणाऱ्या राज्यशासनाच्या सर्व मंत्रीमंडळाचे आणि विशेष करुन औरंगाबादचे शिवसेना पक्षाचे १४ कर्तृत्वान महापौर ज्यांनी औरंगाबादेत विकासाची गंगा वाहिली व विकासाच्याबाबतीत संपुर्ण जगात औरंगाबादचे नाव लौकिक केले त्यांचा हि औरंगाबाद जनतेच्या वतीने अंत:करणाने आभार व्यक्त करणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री, माजी खासदार, आमदार तसेच शिवसेना पक्षाने १४ कर्तृत्वान महापौरांनी मराठवाड्याचा व औरंगाबादचा सर्वांगिण विकास व्हावा याकरिता आजतागायत केलेले विविध प्रकल्प, विकास कामे व सर्वसामान्य जनतेला मुलभुत सुविधा उपलब्ध व्हावे याकरिता राबविण्यात आलेल्या योजनांची व केलेल्या उल्लेखनिय कामगीरीचे फलक दाखविण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेबांनी औरंगाबादेत १४ कर्तृत्वमान महापौर दिल्याबद्दल, कचऱ्याचा प्रश्न सोडवल्याबद्दल, स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी दिल्याबद्दल, पाणी वितरण व व्यवस्थापनासाठी ऐतिहासिक काम केल्याबद्दल, औरंगाबाद विकास आराखड्याचे तीन तेरा केल्याबद्दल, उत्तम आरोग्य सेवा दिल्याबद्दल, चौकाचौकात शिवभोजनाच्या सुविधा दिल्याबद्दल, मनपावर भगवा फडकल्यानेच शहरात उत्तम रस्ते आहेत त्या दिल्याबद्दल, शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या निर्मिती केल्याबद्दल, कोरोना संकटात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून सेवा केल्याबद्दल, माजी खासदारांनी संसदेतील उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल, विमानसेवा व्यापक केल्याबद्दल, शैक्षणिक संस्थांच्या दर्जा उंचावल्याबद्दल, प्रत्येक रस्त्यावर दिवाबत्तीची उत्तम सुविधा दिल्याबद्दल, रेल्वेमार्ग विकासासाठी आहोरात्र परिश्रम घेतल्याबद्दल, रोजगारनिर्मिती व युवकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल, ऊसतोड व इतर कामगारांचे प्रश्न मार्गी लावल्याबद्दल, डंपिंग ग्राऊंडची समस्या धैर्याने हाताळल्याबद्दल, अर्थसंकल्पात पर्यटन विकासाचे पॅकेज दिल्याबद्दल, संतपीठ व वारकरी भवनासाठी बैठका घेतल्याबद्दल, मराठवाड्यातील दुष्काळ व अतिवृष्टीचे प्रश्न तत्परतेने सोडविल्याबद्दल, सिंचनाचा अनुशेष भरून काढल्याबद्दल, खेळाडूंना क्रीडा विद्यापीठ दिल्याबद्दल तसेच औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगिण विकास करुन सर्व सामान्य जनतेला मुलभुत सुविधा वेळेवर उपलब्ध करुन दिल्याबद्दल औरंगाबादच्या सर्वसामान्य जनतेच्या वतीने दिनांक १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या दिवशी आभार व्यक्त करणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्यासह आजपर्यंत महाराष्ट्राला लाभलेले सर्व पक्षाचे मुख्यमंत्री व विशेष करुन मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व सध्याचे केंद्र शासनाचे राज्य अर्थमंत्री भागवत कराड या सर्वांचे मराठवाड्याचा सर्वांगिण विकास केल्याबद्दल आभार मानले.
खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले की, शिवाजी महाराज हे सर्वांचे असुन रयतेचे राजा आहे, मला त्यांचा खुप अभिमान असुन त्यांच्याविषयी आदर आहे, परंतु फक्त राजकारणात फायदा व्हावा म्हणून त्यांचा नावाचा गैरवापर करुन शिवाजी महाराजांना एका विशिष्ट राजकीय पक्षापुरतेच मर्यादित केल्याची खंत असुन निवडणुक आली की शिवाजी महारांजाविषयी शिवसेना नेत्यांच्या मनात प्रेम जागृत होते अशी टीका हि केली.