बायकांचा भांगडा
अमरावती जिल्हा आणि शहराची धुरा सांभाळणार्या निवडक असाधारण महिलांनी चालविलेला राजकीय भांगडा गणेशोत्सवात नागरिकांचे निःशुल्क मनोरंजन करीत आहे. जिल्ह्याच्या सारिपाटावर ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडून रंगलेल्या या फडात अपवाद वगळून धुरिण पुरूष मंडळीची भूमिका प्रेक्षकांपुरती मर्यादीत झालेली आहे. असाधारण महिलांचे ‘अॅग्रेशन’ पाहून ते नुसते खजिलच झालेले नाहीत, तर ‘मी या गावचा रहिवासी नाही’, असे समजू लागले आहेत. हल्ली मनोरंजनाची साधने व प्रत्येकाच्या कामाचा व्याप वाढल्याने पूर्वीप्रमाणे गणेशोत्सवातील मनोरंजनाला फारसे महत्त्व दिले जात नसले तरी अमरावतीच्या रंगमंचावरील जातीवंत कलावंत स्वकेंद्रित होऊन आपला पुंगीपेटारा वाजविण्यात मश्गूल झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील असाधारण महिलांमधील हे "कॅलिबर" पाहून व्यवस्था स्वतःला धन्यधन्य झाल्याचे मनोमन निश्चित मानत असावी. हा अमरावती पॅटर्न संपूर्ण राज्यात पथदर्शी म्हणून राबविण्यास अमरावतीच्या आमच्या साधारण माय-बहिणींची हरकत राहणार नाही? फक्त असाधारण रणरागिनी व सतीसावित्रींचीसुद्धा हरकत नसावी.
खासदार नवनीत राणा, माजी पालकमंत्री आमदार अॅड. यशोमतीताई ठाकूर, आमदार सुलभाताई खोडके, जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह या नेतृत्वाची धुरा सांभाळत आहेत. आमदार यशोमती ठाकूर व आमदार सुलभाताई खोडके तसेच खासदार नवनीत राणा यांच्यातून विस्तवही जात नाही. खासदारांचे पोलीस आयुक्तच नव्हे तर कुणाशीच जमत नाही. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह व-जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे परस्परांशी फार चांगले आहे, असेही म्हणता येत नाही. पावसाळा असो नसो, सर्वच एकमेकांना गढूळ पाण्यात पाहतात. राणा दाम्पत्याविरुद्ध गुन्हे दाखल होणे, स्थानबद्धतेची कारवाई हे सर्व निमित्तमात्र आहे. राणा दाम्पत्याचे पोलीस आयुक्तांशी न जमण्याच्या मतभेदाला ऋषभ सिकची, नीलेश चौरासिया, अग्रवाल यांच्याशी संबंधित कोट्यवधीच्या प्रकरणाची किनार आहे. पोलीस आयुक्तांचे ‘हार्ट’ लवकरच ‘हर्ट’ होते, असे निदान बहुतेक माध्यम प्रतिनिधींनी केलेले आहे. अशा अंतर्गत वाद व कुरघोडीच्या राजकारणातून जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे.
खासदार नवनीत राणा व त्यांचे यजमान आमदार रवी राणा यांना प्रसारमाध्यमांत झळकण्याची व त्या माध्यमातून चर्चेत राहण्याच्या रोगाची लागण झालेली आहे. हिंदुत्ववाद जेवढा प्रखरपणे/जोरकसपणे मांडला जाईल, तेवढी मोठी राजकीय बक्षिसी दिल्लीच्या तख्ताकडून दिली जात असल्याने ती मिळविण्यासाठी राणा दाम्पत्याने जीव झोकून निःसंशय उठाठेव सुरू केलेली आहे. त्यासाठी जिल्ह्याची चिंता न करता वाट्टेल ते केले जात आहे. आक्रमकतेच्या बाबतीत जिथे न्याय मिळविण्यासाठी जर कोणी ऐकून घेतच नसेल तर त्याविरुद्ध झगडण्याची वृत्ती ठेवलीच पाहिजे. वेळप्रसंगी आक्रमकसुद्धा झालेच पाहिजे, पण त्या विषयाचा पायाही तेवढा मजबूत असला पाहिजे. अन्यथा तोंडघशी पडण्याची शक्यता जास्त असते. खासदार नवनीत राणा यांचे एका मुलीच्या प्रकरणात नेमके असेच झालेले आहे. ज्या मुलीचे ‘लव्ह जिहाद’ प्रकारातून अपहरण झाल्याचे खासदार पोलिसांना सांगत होत्या, ती मुलगी पालकांच्या रागावर घरून निघून गेल्याचे नंतर उघड झाले. या प्रकरणाच्या निमित्ताने का होईना कसेबसे जवळ आलेले भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी तसेच विहिंप-बजरंग दलाचे कार्यकर्ते पोलीस आयुक्तांना धन्यवाद देण्यासाठी पोहोचल्याने तो प्रकारसुद्धा खासदारांच्या जिव्हारी लागला, हे विसरून चालणार नाही. खासदार नवनीत राणा यांनी गणेशोत्सवात आढावा घेणारी बैठक बोलाविली, जिल्हाधिकार्यांनी बैठकीला उपस्थित राहण्याबाबतचे पत्र पोलीस आयुक्तांना पाठविले. त्या बैठकीला पोलीस आयुक्तांनी स्वतः न जाता आपला प्रतिनिधी म्हणून उपायुक्त मकानदार यांना पाठविले. आयुक्तांना लक्ष्य करण्याची संधी हुकल्याने त्यावरून खासदारांचा ‘इगो हर्ट’ झाला. विषय चर्चेत आला तेव्हा पोलीस आयुक्तांनी नियमावर बोट ठेवत त्याकडे खासदार आणि जिल्हाधिकार्यांचे लक्ष वेधले. खासदारांनी त्याची संपूर्ण भडास बेपत्ता मुलीच्या प्रकरणात उपायुक्त विक्रम साळी व राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यावर फोन कॉल रेकॉर्डच्या निमित्ताने काढली.
बेपत्ता मुलीच्या प्रकरणात खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ ठाण्यात जो आकांत केला, तो बघता त्या बेपत्ता मुलीचा शोध लागावा यासाठी कमी आणि त्यांचा फोन कॉल ठाणेदाराने रेकॉर्ड केल्यावरून त्यांच्याशी भांडण्यासाठी गेल्या होत्या, असेच जास्त दिसून आले. आज प्रत्येक स्मार्टफोनमध्ये कॉल रेकॉर्डींगची व्यवस्था आहे. एखाद्याला कॉल करणे आणि तो स्वतः रेकॉर्ड करणे आणि त्या संभाषणाचा गैरवापर करणे हे कदाचित एखादवेळी गैर व बेकायदेशीर ठरू शकते, पण ‘इनकमिंग’ कॉल संदर्भासाठी रेकॉर्ड करण्याचा निश्चितच प्रत्येकाला अधिकार आहे. त्यासाठी कॉल करणार्या व्यक्तीने मर्यादेेत राहूनच बोलले पाहिजे. कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कोणालाही काहीही बोलता येत नाही. नेमकी ही चूक खासदार नवनीत राणा यांच्याकडून झालेली आहे. मुलीच्या बेपत्ता प्रकरणात ताब्यात घेतलेल्या मुस्लीम युवकाला दोन फटके लावा, त्याच्या आई-वडिलांना ताब्यात घ्या, ही खासदारांनी पोलिसांना केलेली सूचना कायद्याची चौकट मोडणारी आहे, अशा पद्धतीने पोलिसांना कायदा हातात घेता येत नाही. खासदारांना जे अपेक्षित होते, तसेही होते, मात्र त्याची पद्धत वेगळी आहे, हे खासदार नवनीत राणा यांनी समजून घेतले पाहिजे. अमरावती शहर किंवा जिल्ह्यात तथाकथित लव्ह जिहादची जी काही प्रकरणे समोर येत आहेत, आणली जात आहेत, ती आत्ताच घडत आहेत, असे नाही. पूर्वी राजकारणी त्यांच्याकडे आलेली अशी आंतरधर्मीय संवेदनशील प्रकरणे "या हाताचे त्या हाताला कळू न देता", पोलिसांकडून परस्पर मार्गी लावत होती. आता मात्र मदतीच्या नावाखाली संबंधित कुटुंबाची इभ्रत वेशीवर टांगली जात आहे. यातून जिल्हा कुप्रसिद्ध होत आहे, हे मात्र खरे. एकवेळा जिल्हा बदनाम झाला तर सारेच सर्वच बाबतीत जिल्ह्याकडे पाठ फिरवतील, हा धोका अमरावतीकरांनी ओळखला पाहिजे. जळगाव सेक्स स्कॅण्डल चर्चेत आल्यानंतर त्या जिल्ह्यातील पालकांना मुलींचे लग्न जुळविण्याच्या मोठ्या सामाजिक समस्येला कित्येक वर्षसामोरे जावे लागले होते, त्यापासून बोध घेतला गेला पाहिजे.
खासदारांनी ठाण्यात पोलिस अधिकार्यांसमोर केलेल्या वर्तनावरून अनेक पोलीस कुटुंब अस्वस्थ आहेत. त्यांनी आता खासदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी रेटून धरलेली आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेविका, पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी खासदारांविरुद्ध आघाडी उघडली आहे. जोपर्यंत खासदार नवनीत राणा पोलिसांची माफी मागणार नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असे म्हटले आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होऊन प्रसारमाध्यमात झळकल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून खासदार नवनीत राणा यांनी माजी नगरसेवक सुमती ढोके यांना आखाड्यात उतरविले आहे. हा भांगडा येथून पुढे किती दिवस चालेल, ते बघावे लागेल. राणा दाम्पत्याच्या या वर्तनावर केंद्र सरकार कितीही खुश असले तरी जनतेत मात्र त्यांच्याविरुद्ध मोठा आक्रोश आहे. अशातच आमदार रवी राणा यांनी पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करणार असल्याचे तसेच मनपा आयुक्तांवरील शाईफेक प्रकरण सीआयडीला सोपविणार असल्याचे सूतोवाच केले आहे. "राजा बोले दल हाले", शासकीय अधिकारी पाठीवर बिर्हाड घेऊन असतात. या वादातून उसंत घेत नाही तोच आता राणा दाम्पत्यावर गणेशमूर्ती विसर्जनाच्या पद्धतीवरून टीकेची झोड उठली आहे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. आधी केले पाहिजे नंतर सांगितले पाहिजे. अर्थात याचा संबंध फक्त अक्कलदाढ असलेल्यांशी आहे. त्याचा इतरांशी दुरान्वये संबंध नाही. संतश्रेष्ठ गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भाऊसाहेब देशमुख, दाजीसाहेब पटवर्धन, संत अच्युत महाराज यांच्या नावाने ओळखला जाणार्या जिल्ह्याची संस्कृती, प्रतिमा, प्रतिष्ठा, मानसन्मान दोन-चार बायकांच्या भांडण-भांगड्याने वेशीवर टांगली जात असेल तर त्याचे निश्चितच चिंतन झाले पाहिजे, एवढेच !
-गोपाल हरणे
अमरावती
9422855496
(साभार ः दैनिक विदर्भ मतदार)
--------------