महाराष्ट्रातील महायुतीचे अजब लग्नसमारंभ!

महाराष्ट्रातील जनतेच्या चर्चेचा विषय बनलेल्या "महायुतीच्या लग्न समारंभाची" सध्या जोरदार तयारी सुरू आहे. लग्न ५ डिसेंबर २०२४ रोजी होणार असून, वरात थेट मुंबईच्या आझाद मैदानावर जाणार आहे. निमंत्रण पत्रिकाही छापून तयार आहे. परंतु या पत्रिकेतील एका अजब गोष्टीमुळे हा समारंभ वादाचा केंद्रबिंदू ठरत आहे – पत्रिकेत नवरदेवाचे नावच नाही!
निमंत्रण पत्रिकेत सगळं काही अगदी व्यवस्थित दिलं आहे. लग्नाचा दिवस, स्थळ, उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची यादी, आणि खाली बच्चे कंपनीचे कौतुकाने लिहिलेले "आमच्या (काका-मामा ऐवजी) आमच्या......... यांचे लग्नला सर्वांनी जरूर या!" पण पत्रिकेत नवरदेवाचं नाव मात्र गायब आहे. अजबच गोष्ट आहे, कारण पत्रिकेतील प्रत्येक गोष्टीची जबाबदारी गोदी मीडियाने घेतली असून वराचे गुणगान देखील केले आहे – "संस्कारी, हुशार, धर्माचं रक्षण करणारा, महाराष्ट्राचा विकास करणारा" असे विशेषण वरासाठी वापरले आहेत. पण, तरीसुद्धा, हा नवरदेव कोण आहे, हे सांगण्यात आलेले नाही.
महायुतीचा लग्नसमारंभ – नाव न ठरलेल्या नवरदेवाचा सोहळा
महायुतीत सामील खानदानमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. नवरदेव कोण असावा यावरून वाद आहेत. देवेंद्रराव एकनाथराव ही दोन नावं चर्चेत आहेत. एकनाथरावांना कळालं की, त्यांच्या नावाची चर्चा होत नसल्यामुळे ते थेट आपल्या गावी जाऊन रुसून बसले आहेत. “आपल्या सख्या बापाचा झाला नाही, तो दुसऱ्याचा कसा होणार” अशी चर्चा या लग्न समारंभाला विरोध करणाऱ्या मध्ये सुरू आहे.
परंतु महायुतीच्या राजकारणात एक वेगळंच ट्विस्ट येऊ शकतं – नवरदेवाच्या शर्यतीत अजून एक नाव आहे, जे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. एका नव्या चेहऱ्याला पुढे आणून सर्वांना आश्चर्याचा धक्का देण्याची तयारी महायुतीतील काही गट करत असल्याचं सूत्रांकडून कळतंय. हा चेहरा कोण असेल, याबद्दल तर्क-वितर्क सुरू आहेत.
तरीदेखील गोदी मीडिया मात्र महायुतीच्या नवरदेवाच्या गुणगानात व्यस्त आहेत. या नवरदेवाने लग्नाच्या आधीच अनेक आश्वासने दिली आहेत – महाराष्ट्राचा विकास करण्याचं, तुष्टीकरण न करण्याचं. परंतु हा नवरदेव प्रत्यक्षात दुमला असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. "या महायुतीचं लग्न म्हणजे फक्त जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे," अशी टीका विरोधकांनी केली आहे.
लग्नसमारंभाची तयारी आणि गोंधळ
२३ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या निर्णयात महायुती परिवाराशी लग्न करायचे ठरले परंतु नवरदेव म्हणून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करायचं यावरून ताळमेळच जुळत नाहीये. अजितराव, देवेंद्रराव , आणि एकनाथराव यांच्यातील हेवेदाव्यांमुळे महाराष्ट्राची जनता ताटकळत आहे.
आझाद मैदानावर होणाऱ्या या "लग्न समारंभात" नरेंद्ररावच्या उपस्थितीचंही सूतोवाच पत्रिकेत करण्यात आलं असल्याचे समजते. परंतु नवरदेवाचे नाव अजून गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्राची जनता – एका अजब लग्नाची साक्षीदार
या परिस्थितीवर महाराष्ट्रातील जनता दोन गटांत विभागली गेली आहे. एक गट आशावादी आहे – की महायुतीच्या नवऱ्याने लग्नानंतर दिलेली आश्वासनं पूर्ण करावी. दुसरा गट मात्र या लग्नाचा अंत फक्त राजकीय फायद्यासाठी झालेल्या सौद्याच्या रूपात पाहतो. “महाराष्ट्राचा विकास लग्नपत्रिकेत लिहिल्याने होत नाही, तो कृतीतून दिसायला हवा,” असं संतप्त लोक म्हणत आहेत.
५ डिसेंबर रोजी हे लग्न होईल, की आणखी काही नवीन गोंधळ समोर येईल? महाराष्ट्राची जनता प्रतीक्षेत आहे – एका अजब लग्न समारंभाच्या, जिथे नवरदेवाचा शोध अजूनही सुरू आहे!
-डॉ. रियाज़ देशमुख, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस (रि), औरंगाबाद.