काव्यसंग्रह जीवन संघर्ष : समीक्षा लेखक अशोक कांबळे

काव्यसंग्रह जीवन संघर्ष : समीक्षा लेखक अशोक कांबळे

जीवन संघर्ष

(  समिक्षा लेखक अशोक बी कांबळे, नागपूर
मो. ८६०००३३२०८  ) 

कवी श्री. नवनाथ रणखांबे यांचा पहिला काव्यसंग्रह "जीवन संघर्ष" खरचं त्यांच्या जीवन-संघर्षाचे बयान  करते म्हटले तरी ते वावगे होणार नाही. त्यांच्या या कविता संग्रहाला प्रा. डॉ. शहाजी कांबळे यांची प्रस्तावना लाभली आहे. कवी श्री. नवनाथ रणखांबे याच्या बऱ्याच कवितेत संघर्ष हा शब्द आलेला आहे, तो ओढून ताणून आला असे नाही. तर त्या आई- वडील किंवा कवी स्वतः वेदनामय व संघर्षमय जीवन जगत आले आहे त्याचीच ती छाप आहे. आई- वडील डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानेच प्रेरित होऊन आपली मुले शिकावी व विद्याविभूषित होवून समाजासाठी काहीतरी करावे असे त्यांना  वाटत असे. तशीच जडणघडण व संस्कार त्यांनी दिले. खरचं हा कवितासंग्रह जीवनाचा वेध घेणारा आहे. त्यामुळे "ऋण" या कवितेत आईवडीलांचे ऋण मानायला विसरत नाहीत. "माय तुला मी पाहिलय" आई -  वडीलांची जीवन-संघर्ष स्वानुभव कथन करतात. 

"उधळण" "माजोऱ्या पाऊस" "गावात आता कसं जगायचं?" "पाऊस पेरणी" "ढळला तोल" "प्रश्न अन् उत्तरी" या कविता शेतकऱ्यांना उधळपट्टी नको असा  तर, पावसालाही योग्य ठिकाणी बसण्याचा सल्ला देतात. पाण्यामुळे दुष्काळ पडला म्हणून कसं जगायचं तर निसर्गाचा तोल राखण्यासाठी जंगल झाडे लावण्याचे व त्यामुळे होणाऱ्या पर्यावरण दुष्परिणामाची जाणही करून देतात. तसेच कर्ज बुडव्यांना चापही देतात व भुमीहिन शेतमजूराच काय ? असा सवाल ही करतात. 

"बानं शिकवलं" या कवितेतून मुलगा शिकावा म्हणून वडीलांची तळमळ, पुस्तकाविषयी आस्ता व भिमाची शिकवन देतात, ते म्हणतात. 
"शिक्षण वाघीणीचं दूध आहे
भिमाच्या चळवळीचा गाभा आहे 
लोकांसाठी तुझं……………. 
जगणं हेच तुझे जीणं आहे. 
भिमाच्या चळवळीचं……….. 
नवनाथ शिलेदार तुला बनणं आहे! 

शिलेदार बनायचा आटोकाट प्रयत्न चालू आहे आणि तो सफल झाल्याशिवाय राहणार नाही. असे यशाच्या मी दर्दीत या कवितेतून सिद्ध होते. 

"भटकंती पोटाची अधोगती देशाची" विषमता व अंधश्रद्धेवर प्रहार करतात आणि गरिब श्रीमंताची दरी कशी वाढते हे कथन करतात. "उपाशी पोट" या कवितेत प्रहार करत बरचं काही शिकवून जातात. 
"श्रद्धा मानवाला बोले 
डोईवरी मुर्ती पाषाणांच्या…. 
तेल दूध तूप व्यर्थ गेले, 
श्रद्धेने मानवाच्या…. 
जगी अंधश्रध्देत रूपांतर झाले! 

" दाहकता ",   " मानवतेला डाग" , " शब्दाला जाळा", "जीवन संघर्ष",  "जातिचे ग्रहण", "शोध स्वतःचा" आणि  "माणूस पण विसरला"  या कवितेतून माणूस माणसाचा वैरी म्हटले तरी गैर होणार नाही. विषमतेचे जहर पाजणारा माणूस, पिढ्यानपिढ्या अन्याय, अत्याचार, शोषण करणारा माणूस व सहण करणाराही माणूस , मग उच निच जातपात व स्वतःला उच्चभ्रू मानणाराही माणूस मग त्यांच्याविरुद्ध बंड उभारने आलेचं. " दलीत"  म्हणून घेण्यापेक्षा  "बहूजन म्हणावे असेही सांगायला ते विसरत नाहीत. जीवन संघर्षासाठी हुंकार भरण्याचे आवाहन करतात तसेच माणसाला माणूसपण विसरू नको असेही सांगतात. 

" इतिहास पुरूष ", " ग्रेट मॅन" , " डॉ. आंबेडकर ", " मोडेल कणा" यातून माणूस कोणाला इतिहास पुरूष म्हणावे तर, निस्वार्थ , सुधारणावादी व आपल्या कर्तृत्वाने इतिहास घडवणारे. ग्रेट मॅन ज्यांचा सहवास हवाहवासा वाटतो. अभिमान, गर्व, विश्रास, पित्रूतुल्य, परोपकारी दुसऱ्यांसाठी स्वकर्तृत्वाने लढणारे.  डॉ. आंबेडकर दारिद्र्यात पिचत पडलेल्या बहूजनाचे कैवारी, साऱ्या माणव जातीला माणूस म्हणून जगण्यासाठी अधिकार मिळवून देणारे. यात कवी म्हणतात. 

सर्वात मोठा संविधानाने, 
रक्तपात न करता…… 
लेखणीच्या स्वतंत्र क्रांतिने, 
नवा इतिहास घडवला….. 
सार्वभौम समाजवादी धर्म निरपेक्ष, 
गणराज्य घडवलत…. 
स्त्री पुरूष सर्व धर्माला देशात, 
न्याय दिलात……. 
युगपुरुष, त्राता बाबा तुम्ही! 

कवी निर्धार करतात व अशी ग्वाही देतात. 

लढताना मोडेल कणा माझा
स्वाभिमान अन्यायापुढे वाकणार नाही 
मी चळवळीचा वसा माझा
शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही 

कविच्या मन प्रेयसीला हळूवार" साद" "ह्वदयाची राणी" या कवितेतून साद घालतो.  साथ देण्याची व ह्वदयाची राणी होण्याची विनंती करतो. 

"नशा" या कवितेत सहचारिणीला सांगतो की आपल्याला बुद्ध विचाराने घडविले, बुद्ध, धम्म, संघाला शरण जातो.  प्रेमात एवढे आटोकाट बुडाले की , ......

प्रेमाची चढली  "नवनाथाला"  नशा
प्रेमाची तुच जीवनाची "आशा" 

"चढ उतार" अपयशातून यशही राहते मिळवत "थरकाप" मधे म्हणतात. 

पँथर दरारा संपत 
तुझ्या उतरत्या काळात 
म्हातारी बोथट चोच, नखं
उपटून तोडून काढ…. 
परत धारदार येतील! 

तर गरूड भरारी घेण्याचे सांगतात. 

मरगळ टाकून, 
घायाळ करून, 
सावज पकडशील, 
तुझ्या गरूड भरारीनं;
परत आसमंत ढवळून काढशील! 

एकप्रकारे धिर देत आहेत. 

"प्रतिक्षेत मराठी सत्तेच्या",  "श्रेय" , "आलेला निधी",  "शेवट अजून बाकी" आणि  "तडा"  अशा कवितेतून म्हणतात जीवन शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाले असले तरी,

 मला बनवलय कृतघ्न मानवांनी! 
माझ्या सर्वांगीण विकासाच्या… 
प्रतिक्षेत मराठी सत्तेच्या! 
     
तर राजकारणी श्रेयवादासाठी एकमेकांची डोकी फोडत आहेत. विकास कामासाठी आलेला निधी फक्त आणि फक्त कागदावरच आहे. प्रत्यक्ष मात्र भोपळा हा राजकारण्यांना मारलेला कटाक्ष भ्रष्टाचार कुठे पोचला आहे याची ग्वाही देते. भ्रष्टाचार, भेदभाव, भटकंती, वंचीताचे दु:ख अजूनही संपले नाही याची खंत आहे. विश्वाला तडा गेल्याने हाडांचा सापळा राहिला म्हणजे राजकारण्यावर किती विश्वास ठेवावा. 

"काडीमोड घेणारे दिल",  "अखेरचा श्वास", "माझ्या प्रीत फुला",  "आयुष्याच्या पहिल्या प्रेमात",  "बापाचं नाव लावायचं टाळलंस",  "मान",  "जीवनाच्या लढ्यात",  "माझी पहाट",  "पाझर फुटला",  "तू आणि मी",  "रात्र माझी जागत होती",  "मात",  आणि "जीवन" अशा आशयघन प्रेम कविताही प्रेमाची आणि संघर्षाची ज्योत पेटविल्या शिवाय राहत नाही.
 
संघर्षाने शिकवलं माझ्या, 
जीवनाला जगायला 

तर उतरत्या काळातही 

जीवन माझं आहे जगत 
जीवनाच्या माझ्या लढ्यात…. झटापटीत रेटारेटी.. 

असा हा जीवन संघर्ष सर्वांग सुंदर झालेला आहे. सर्वांनी आवर्जून वाचावा व आपल्याच व्यथा संघर्ष मांडले आहे असे वाटते. 

पुस्तकाचे नाव -: जीवन संघर्ष
कवी -: नवनाथ रणखांबे
पाने -: ८० 
किंमत -: ८०/- ₹
प्रकाशन -: शारदा प्रकाशन ठाणे 
पुस्तक समिक्षा लेखक  -: अशोक बी कांबळे, नागपूर
मो. ८६०००३३२०८ 
२४.०१.२०२२