पोलीस ठाण्यासमोरच प्रेमविवाह केलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला
खामगाव : (प्रतिनिधी) प्रेम विवाह केलेल्या एका तरुणावर युवतीच्या नातेवाईकांनी प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरात घडली.
धक्कादायक बाब म्हणजे हे प्रेमीयुगुल संरक्षण मागण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचलं होतं आणि पोलिस ठाण्यासमोरच या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील सतीफैल भागातील रहिवासी रघु तिवारी या 26 वर्षीय तरुणाचा काही दिवसांपूर्वी याच परिसरात राहणाऱ्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. घरून विरोध असताना ते पळून गेले होते. तीन महिने उलटल्यानंतर हे प्रेमी युगुल स्वरक्षणासाठी खामगाव च्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री पोहोचले. आणि आपला जबाब नोंदवला. दरम्यान याची कुणकुण युवतीच्या नातेवाईकांना मिळाली. तर काही नातेवाईक तरुण शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर पोहोचले आणि रघु तिवारी सोबत वाद घालत त्याच्यावर चाकूने प्राणघातक वार केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात, त्यानंतर अकोला येथे हलविण्यात आले. या घटनेमुळे खामगाव शहरात खळबळ निर्माण झाली. विशेष म्हणजे ही घटना चक्क पोलीस ठाण्यासमोर घडली आहे. त्यामुळे शहरात कायदा आणि पोलिसांचा धाक आहे की नाही? असाही प्रश्न निर्माण होत आहे.