अन्यायाविरुद्ध स्वर गर्जनेचा : लेखनीतून बुलंद आवाज जनतेचा।

अन्यायाविरुद्ध स्वर गर्जनेचा : लेखनीतून बुलंद आवाज जनतेचा।

लेखनीतून न्यायाचा आवाज बुलंद करणारे वसंत मुंडे

अन्यायाविरुद्ध स्वर गर्जनेचा : लेखनीतून बुलंद आवाज जनतेचा।

     पत्रकारिता म्हणजे अतिसामान्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम आहे हे खूप कमी वयात उमगलेला वसंत मुंडे नावाचा तरुण पत्रकारितेत आला आणि सामान्यांचे प्रश्न मांडता मांडता वृत्तपत्रांचे आणि पत्रकारांचेही प्रश्न मांडू लागला! आश्चर्य म्हणजे वसंत मुंडे यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी पहिल्यांदा भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला. विद्यार्थिदशेत असताना गावालगत रोजगार हमी योजनेत सामाजिक वनीकरणाच्या कामावरील मजुरांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. तशी ती बर्‍याचदा होते. ‘लोकमत’चे अंबाजोगाईतील तत्कालीन पत्रकार मोटेगावकर सरांना हा भ्रष्टाचार सांगून त्यांनी या सर्व मजुरांना न्याय मिळवून दिला.

      पुढे पत्रकारितेचं औपचारिक शिक्षण घेतल्यानंतर दैनिक लोकसत्तामध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती मिळाली आणि वसंत मुंडे तेथे वीस वर्षांपासून कार्यरत आहेत. लेखणीतून वंचित, उपेक्षित वर्गासाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी आर्थिक मदत उभी करून दिली. शेती, शिक्षण या विषयांवर सकारात्मक व ऊर्जा निर्माण करणारे विपुल लिखाण केले. त्यातूनच तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी बोलावलेल्या निवडक पन्नास पत्रकारांच्या राष्ट्रीय परिषदेतही मुंडे यांची निवड झाली होती. ऊसतोडणी मजुरांबरोबर राहून लिहिलेल्या लेखमालिकेला ‘समर्थ’ने शिष्यवृत्ती दिली. याशिवाय अनेक पुरस्कारही मिळाले. उत्तम संवाद व बिनधास्तपणे मोजक्या शब्दांत विषय मांडण्याची हातोटी हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

प्रश्न मांडले, मार्ग सांगितलेः

लेखणीतून सामान्यांचे प्रश्न मांडताना सहकारी पत्रकारांच्या प्रश्नांचीही जाणीव वसंत मुंडे यांना झाली. समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांच्या प्रश्नांकडे बऱ्याचदा डोळेझाक होते. पत्रकारांना काही प्रश्न असतील असे राज्यकर्ते व समाजालाही वाटत नाही. हे जाणवल्यानंतर मुंडे यांनी पत्रकार संघाच्या माध्यमातून वार्ताहर आणि संपादकांचे प्रश्न मांडत ते सोडवण्याचे मार्गही सांगितले. औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर मुंडे यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रत्येक जिल्ह्यात शासकीय समितीची पत्रकारांबरोबर थेट खुली चर्चा उपक्रम राबवला. त्यातूनच जाचक अटी शिथिल होऊन अधिस्वीकृती पत्रिका मिळण्याचा मार्ग सोपा झाला. शहरापासून गावपातळीपर्यंतच्या पत्रकारांचे प्रश्न मांडून ते सोडवले जात असल्याने याची दखल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली.

संपादक नसलेला पहिला अध्यक्षः

वसंत मुंडे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या (मुंबई) राज्य अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. संपादक नसताना पत्रकाराची अध्यक्षपदी निवड होण्याची संघटनेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ होय! तब्बल तेरा हजारांपेक्षा अधिक पत्रकार सदस्य असलेल्या संघटनेचे कामकाज अधिक लोकाभिमुख करण्यासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर वसंत मुंडे यांनी आधुनिक पद्धतीचा वापर केला.

स्वावलंबी होण्यासाठी संपादकांची गोलमेज परिषदः

समाज माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे अडचणीत असलेला वृत्तपत्र- व्यवसाय कोरोनामुळे अधिकच डबघाईला आला. जाहिरातींचा ओघ कमी झाल्याने साखळी वृत्तपत्रासह छोट्या वृत्तपत्रांचेही आर्थिक गणित बिघडले. उत्पादन खर्चाच्या तीस टक्के किमतीत घरपोहोच वृत्तपत्र देण्याचे पारंपरिक धोरण; त्यात कोरोना, ऑनलाइन वाचनाची सवय यामुळे आर्थिक संकट ओढावले आणि काम करणाऱ्या पत्रकारांना पगारकपातीला सामोरे जावे लागले. अनेकांना तर नोकरीही गमवावी लागली. अशा परिस्थितीत वसंत मुंडे यांनी औरंगाबादमध्ये संपादकांची पहिली गोलमेज परिषद घेऊन वृत्तपत्रांनी आर्थिक स्वावलंबी होण्याचे आवाहन केले.  मागील वीस वर्षांत पेट्रोल ३० रुपयांवरुन १२० रुपये, तर डिझेल १६ रुपयांवरुन ९७ रुपये लिटर झाले. एक रुपयाचा चहा दहा रुपये झाला. छपाईचा कागद २५ रुपयांवरुन १०० रुपयांपर्यत झाला. सरकारने जाहिरातीवर व इतर वस्तूंवर ५ टक्के जीएसटी आणि इतर कर लावल्याने किमती पाच पटीने वाढल्या. असे सर्व वस्तूंचे भाव वाढत असताना वर्तमानपत्रांच्या किमतीत मात्र एक पटीनेही ‌वाढ झाली नाही. आजही ८ ते १२ पानांची वर्तमानपत्रेही दोन ते पाच रुपयांत घरपोहोच दिली जातात. त्यामुळे उत्पादन खर्चाच्या २० टक्के विक्री किंमत असणारे हे जगातील एकमेव उत्पादन आहे. जाहिराती कमी झाल्याने तोटा भरून काढणे अशक्य असल्याने विक्री किंमत ‌वाढवण्याचे गणित वृतपत्रांचे मालक, संपादक, वितरक यांना पटवून दिले. लोकपत्रकार भागवत तावरे यांनी शब्दबद्ध केलेली वसंत मुंडे यांची ‘वृत्तपत्रांचे अर्थकारण’ या विषयावरील मुलाखत राज्यातील तब्बल तीनशेपेक्षा अधिक वृत्तपत्रांनी प्रकाशित करून समर्थन केले. परिणामी राज्यातील तीनशेपेक्षा अधिक दैनिकांनी विक्री किंमत वाढवली. एका पत्रकाराची एकच मुलाखत विविध दैनिकांत प्रसिद्ध होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने वसंत मुंडेंचे नेतृत्व सर्वमान्य झाले.

साप्ताहिक सुटी घ्या, फायद्यात राहा!

वृत्तपत्र व्यवसायाला ऊर्जित करण्यासाठी केंद्र सरकारने करदात्यांना वृत्तपत्र खरेदीवर उत्पन्नकरात वार्षिक पाच हजारांची सवलत द्यावी, अशी मागणी श्री. वसंत मुंडे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे केली असून याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. पूर्वी माहितीची इतर माध्यमे नसल्याने वृत्तपत्रे नियमित काढण्याचे धोरण रूढ झाले होते. मात्र आता इतर साधने उपलब्ध असल्यामुळे वृत्तपत्रांनीही रविवारची सुटी घेतली पाहिजे. सरकारनेही आता पाच दिवसांचा आठवडा केला आहे. खासगी उद्योगातही सुटी असते. हा विचार मांडताना सुटीतून वृत्तपत्रांच्या आर्थिक फायद्याचे आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे गणित त्यांनी मांडले. याचा काही दैनिकांनी स्वीकार केल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत.

नव्या उपक्रमांतून आश्वासक वातावरणः

वर्षानुवर्षे सरकारकडे मागण्या करून काय साध्य झाले? याचा विचार करून माध्यमातील लोकांनीच सक्षम झाले पाहिजे अशी भूमिका वसंत मुंडे यांनी केवळ मांडली नाही तर पत्रकार संघाच्या माध्यमातून नवीन पायंडे सुरू केले. कोरोना काळात २८ जिल्ह्यांतील पत्रकारांशी वेबसंवाद करून लोकसहभागातून पत्रकारांना किराणा साहित्यासह मदत मिळवून दिली. पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. एकाच दिवशी राज्यभर ‘रक्तदान’ शिबिर घेऊन चौदाशे बॅग रक्त संकलन करून देण्याचा विक्रम नोंदवला. समाज माध्यमाच्या मोहजालातही संवाद कायम राहावा यासाठी औरंगाबाद विभागीय कार्यालयात वार्तालाप तर बीड येथे मासिक व्याख्यानमाला सुरू केली. परिणामी राज्यभरात संघाच्या माध्यमातून वार्तालाप घेतले जात आहेत. दिवाळीत स्नेहमिलन, तर रमजान ईदमिलन कार्यक्रम घेऊन संघाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबीयांना लोकसहभागातून मदत उपलब्ध करून देण्याबरोबरच वैद्यकीय उपचारांसाठीही संघाच्या माध्यमातून मदतीचा हात दिला. अशा नवीन उपक्रमांतून संघटना आणि वृत्तपत्रक्षेत्रात नव्या परंपरा पुढे आणत या क्षेत्राला सक्षम करण्यासाठी वसंत मुंडे यांनी आश्वासक वातावरण निर्माण केले आहे. 

पाच विभागीय अधिवेशनेः

वृत्तपत्रांचे अर्थकारण आणि पत्रकारांच्या समस्या यावर औरंगाबाद येथे संपादकांची गोलमेज परिषद आणि लातूर, ठाणे, नागपूर, जळगाव येथे विभागीय अधिवेशने घेऊन वृत्तपत्रांच्या अर्थकारणावर जागृतीची चळवळच वसंत मुंडे यांनी उभी केली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर वृत्तपत्रांच्या अर्थकारणावर स्वतंत्र अधिवेशने होण्याची ही पहिलीच वेळ होती. या पुढेही पत्रकारांसह समाजाच्या प्रश्नांना भिडण्याचे नवनवे मार्ग श्री. वसंत मुंडे शोधून काढतील याची खात्री आहे. सर्वजनहिताच्या या वाटेवर आम्ही त्यांच्या सोबत आहोत याचीही आम्ही ग्वाही देतो.

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध! ऐका पुढल्या हाका...

असे कवी केशवसुतांनी 'तुतारी' कवितेत म्हटले आहे. काळाच्या पुढे पाहणारे श्री. वसंत मुंडे यांची कामाची अभिनव पद्धत पाहून ही कविता हमखास आठवतेच!

~डॉ. प्रभू गोरे, औरंगाबाद
◆◆◆