बुलढाणा SP ऑफिसचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर : आपले सरकार पोर्टलचा पासवर्ड हरवला...
बुलढाणा : सामान्य नागरिकांना ऑनलाईन तक्रार करण्यासाठी आणि त्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यात आपले सरकार पोर्टल कार्यान्वित करण्यात आलेले आहे. याच आपले सरकार पोर्टल बाबत बुलढाणा जिल्हा पोलीस विभागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील गेल्या तीन महिन्यापासून आपले सरकार पोर्टलचे लॉगिंग पासवर्ड हरवल्याचे किंवा नसल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या 29 डिसेंबर रोजी बुलढाणा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातील प्रभारी पोलीस उपअधिक्षक असलेले गिरीश ताथोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला लेखी पत्रव्यवहार करून बुलढाणा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातील आपले सरकार पोर्टलचे लॉगिंगचे नवीन पासवर्ड तयार करून देण्याची मागणी केली आहे. मात्र 15 मार्चपर्यंत बुलढाणा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातील आपले सरकार पोर्टलचे लॉगिंगचे नवीन पासवर्ड नसल्याबाबत ची माहिती समोर आली आहे.
याबाबत ची माहिती खुद्द बुलढाणा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातील प्रभारी पोलीस उपअधिक्षक असलेले गिरीश ताथोड यांनी सामाजिक कार्यकर्ता वहीद गफ्फार खान यांना माहिती अधिकारातुन दिली आहे. यामुळे बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. शिवाय आजपर्यंत पोलीस विभागात किती तक्रारी आपले सरकार पोर्टलवर दाखल झाल्या असतील व त्या तक्रारी बाबत बुलढाणा पोलीस विभागाला माहिती देखील नसेल तर या तक्रारींवर कारवाईचा प्रश्नच निर्माण होत नाही.
दरम्यान हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता वहीद गफ्फार खान यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.
चांदुर बिस्वा ता. नांदुरा येथील रहिवासी आणि सध्या मुंबईत एलएलबीचा शिक्षण घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता वहीद गफ्फार खान यांनी वर्षभरात आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेल्या तक्रारींवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत माहिती अधिकारात माहिती विचारली होती. त्यावर बुलढाणा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातील आपले सरकार पोर्टलचे लॉगिंग पासवर्ड नसल्याची माहिती खुद्द प्रभारी पोलीस उपअधिक्षक असलेले गिरीश ताथोड यांनी सामाजिक कार्यकर्ता वहीद गफ्फार खान यांना माहिती अधिकारात दिल्याने बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे आपले सरकार पोर्टलचे लॉगिंगचे पासवर्ड हरवल्याचे किंवा नसल्याचे समोर आले आहे.
आज पर्यंत दाखल झालेल्या तक्रारींवर आणि असा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जिल्हा पोलीस अधिक्षक सारंग आवाड काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.