ACB चा सापळा : लाच स्वीकारताच PSI पळाला, सिनेमा स्टाईल पाठलाग - कारमध्ये सापडले पाव किलो सोने अन लाखोंची रोकड
जालना : औरंगाबाद अँटी करप्शन ब्युरो ने लावलेल्या सापळ्यात पोलीस उपनिरीक्षकाने लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर त्याला संशय आल्याने त्याने घटनास्थळावरून आपल्या कार मध्ये बसून धूम ठोकली. अँटी करप्शन च्या पथकाने सिनेमा स्टाईल तीन किलोमीटर पर्यंत त्याचा पाठलाग करीत त्याला पकडले. पळून जाताना या लाचखोराने लाचेची रक्कम रस्त्यात फेकून दिली. त्याला पकडल्यानंतर त्याच्या कार मध्ये 9 लाख 41 हजार 590 रुपयाची रोकड आणि तब्बल पाव किलो (२५० ग्राम) सोने अँटी करप्शन पथकाचे हाती लागले. हा सापळा जालना शहरात बुधवारी सकाळीच लावण्यात आला होता.
अँटी करप्शन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या लाचखोर पोलीस सब इन्स्पेक्टर चे नाव गणेश शेषराव शिंदे वय 35 वर्ष असून तो जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. अँटी करप्शन विभागाला तक्रारदार यांनी अशी तक्रार केली होती की त्याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात त्याला अँटी सिपेटरी बेल म्हणजेच अटकपूर्व जामीन मिळाला होता. पोलीस सब इंस्पेक्टर गणेश शिंदे याने त्यास क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या 110 कलमाखाली कारवाई करून अटक करण्याची धमकी दिली होती. कलम 110 ऐवजी कलम 107 प्रमाणे कारवाई केल्यास त्याला अटक होणार नाही, कलम 107 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी तसेच त्याचे विरुद्ध दाखल गुन्ह्यात त्याला मदत करण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी केली. तळजोडीअंती लाचखोर पोलीस सब इंस्पेक्टर 75 हजार रुपये लाच स्वीकारण्यास तयार झाला.
तक्रारदारास या लाचखोर पोलीस सब इंस्पेक्टर ला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी औरंगाबाद अँटी करप्शन ब्युरो चे कार्यालय गाठले आणि तिथे तक्रार दिली. त्यानुसार जालना शहरात कदीम जालना पोलीस स्टेशनच्या आवारात बुधवारी सकाळी सापळा लावण्यात आला.
पोलीस सब इन्स्पेक्टर गणेश शिंदे यानी पंचांसमक्ष तक्रारदाराकडून 75 हजार रुपये ची रोकड स्वीकारली. परंतु त्याला अँटी करप्शन च्या सापळ्याचा संशय आल्याने त्याने कार मध्ये बसून घटनास्थळावरून पळ काढला. अँटी करप्शन च्या पथकाने त्याचा तीन किलोमीटर पर्यंत सिनेमा स्टाईल पाठलाग केला आणि त्यास ताब्यात घेतले. लाच म्हणून स्वीकारलेली 75 हजार रुपयांची रोकड त्याचे कडे मिळून आली नाही. मात्र त्याच्या कारची झडती घेण्यात आली असता कार मध्ये तब्बल 250 ग्राम सोने आणि 9 लाख 41 हजार 590 रुपयाची रोकड मिळवून आली. ती रक्कम आणि सोने अँटीकरप्शनचे अधिकाऱ्यांनी जप्त केले तसेच कार पण जप्त केली. लाच म्हणून स्वीकारलेली 75 हजार रुपयाची रोकड त्याने रस्त्यात फेकून दिल्याचे सांगितले.
ज्या कदीम जालना पोलीस स्टेशनमध्ये हा लाचखोर पोलीस सब इंस्पेक्टर नोकरीला आहे त्याच पोलीस ठाण्यात त्याचे विरुद्ध रात्री लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई औरंगाबाद अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर शिरसागर यांनी त्यांचे सहकारी पोलिसा अंमलदार नागरगोजे आणि काळे यांच्या सोबत केली.