विनोद पाटील लोकसभेच्या मैदानात : सत्कार कार्यक्रमात शक्तिप्रदर्शन,
औरंगाबाद, १ मार्च : जर तुम्ही म्हणत असाल तर, मी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविण्यास तयार आहे. तुम्ही ठरवाल त्या पक्षाकडून किंवा अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरेन, पण तुम्हाला साथ द्यावी लागेल, मराठा आरक्षणाची लढाई मी न्यायालयात लढत आहे, उच्च न्यायालय असो की सर्वोच्च न्यायालयात मी माझ्या समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहणार, असे विनोद पाटील यांनी शुक्रवारी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना घोषित केले, अन् सभागृहाने टाळ्यांच्या गजर करत, त्यांच्या या घोषणेला एकप्रकारे मंजूरी दिली. "विनोद भय्या तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है" या घोषणेने सभागृह दणाणून गेले. त्यांनी पुढे सांगितले मराठा आरक्षणाचा तिढा नेहमीसाठी सर्वोच्च सभागृहात पाठवण्याची जवाबदारी आता तुमची आहे.
आग्रा येथील लाल किल्ल्यावर सलग दुसऱ्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली, याबद्दल विनोद पाटील यांचा शुक्रवारी सकाळी जाहीर सत्कार करण्यात आला. एन-8 मधील गुलाब विश्व हॉल येथे हा सत्कार सोहळा झाला. औरंगाबाद शहर जिल्हा मित्रमंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला पृथ्वीराज पवार, संदीप बोरसे, प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे पाटील, राजगौरव वानखेडे, राजू शिंदे, शिवाजी दांडगे, राजेंद्र जंजाळ, अभिजित देशमुख, देविदास जरारे, राजेंद्र जंजाळ, रामेश्वर थोरात, नागेश भालेराव, कय्यूम अहेमद शेख, असद पटेल, शेख रफीक, जलिल कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यांनी आपल्या भाषणात सांगितले....
तुम्ही दिलेला मला आशिर्वाद, तुम्ही दिलेले मला मोलाचे शब्द, तुम्ही जर म्हटले तर मी लोकसभा लढायला तयार आहे. राहिला विषय पक्षाचा, तो तुम्ही सगळे ठरवा. तुम्ही म्हटले तर अपक्ष उमेदवार म्हणून लढण्यास तयार आहे. हे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर ठरले आहे. जर तुम्ही म्हटले घरी बसा, तर घरी बसेन, असे विनोद पाटील म्हणाले. यानंतर टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी स्वागत केले.
विनोद पाटील यांच्या या घोषणेमुळे लोकसभा निवडणुकीत विविध पक्षांची गणिते बिघडतील असे दिसत आहे. कारण विनोद पाटील हे मराठा समाजातून येतात. युवा आणि उच्चशिक्षित आहेत. म्हणून त्यांना या निवडणुकीत जास्त पसंती मिळेल अशी चर्चा आता मतदार संघात सुरू झाली आहे. पण विविध पक्षातून इच्छूक असलेले उमेदवार आहेत त्यांचे काय होणार.... महायुतीकडून त्यांना हायजॅक करण्यात आली तर आश्चर्य वाटायला नको.... किंवा ते अपक्ष उमेदवार असले तरी निवडून येतील अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.