पाण्यातून शाळेत जाणारी मुलं – शासनाच्या उदासीनतेचा काळा चेहरा
छत्रपती संभाजी नगर, दि. ३ सप्टेंबर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मौजे मांडवा-तांदुळवाडी येथील भिल जमात आजही मूलभूत अधिकार आणि शासकीय योजनांपासून वंचित आहे. स्वातंत्र्याला तब्बल ७९ वर्षे उलटली, देश महासत्ता होण्याची स्वप्ने पाहतो, पण ४५ वर्षांपासून स्थायिक असलेली ७८ भिल कुटुंबं आजही अंधारातच जगत आहेत.
सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये लहान मुलांना पाण्यातून जीव मुठीत धरून शाळेत जाताना पाहिलं आणि समाजाचं मन हेलावलं. एवढ्या वर्षांतही या कुटुंबांकडे ना आधार कार्ड, ना जात प्रमाणपत्र, ना रेशन कार्ड! परिणामी आजवर एकही शासकीय योजना या कुटुंबांपर्यंत पोहोचलेली नाही. शासकीय यंत्रणेची ही दृष्टीआड अवस्था म्हणजे विकासाच्या गगनचुंबी दाव्यांवर जोरदार तमाचा आहे.
जेव्हा या बाबी उघडकीस आल्या तेव्हा छत्रपती संभाजीनगरच्या कर्तव्यदक्ष प्रकल्प अधिकारी सौ. चेतना मोरे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, भिल समाजातील अनेकांना आदिवासी विभागासाठी स्वतंत्र कार्यालय अस्तित्वात आहे हेच माहीत नव्हते! या समाजातील बांधवांना प्रत्यक्ष कार्यालयात नेऊन दाखवण्यात आलं आणि यानंतर सौ. मोरे यांनी तातडीने सर्वे करून शासकीय योजना भिल समाजापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी एकलव्य सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज बर्डे, उपाध्यक्षा सौ. सारिका बर्डे, संघर्ष शेतकरी संघटनेचे जिल्हा आरोग्य संपर्क प्रमुख श्री. रविंद्रकुमार कीर्तीशाही, सामाजिक कार्यकर्ते श्री. राजू मनोरे, श्री. अविनाश गोरे, पै. माऊली दादा शिंदे, श्री. गौतम शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने भिल समाजातील बांधव उपस्थित होते.
देशात विकासाची गीते गायली जात असताना एका प्राचीन जमातीला अजूनही मूलभूत हक्कासाठी लढावं लागतंय, ही लाजिरवाणी बाब आज सर्व समाजाच्या आणि प्रशासनाच्या गळ्यातील घंटा ठरते