प्रदेशाध्यक्ष आझमींचा विश्वासू नेता अब्दुल रऊफ शेख कोर कमिटीवर

छत्रपती संभाजीनगर : समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आसीम आझमी यांच्या निर्देशानुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी दहा सदस्यीय कोर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. या कमिटीमार्फत प्रत्येक जिल्ह्यातील पक्षाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असून संघटन अधिक मजबूत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
या कोर कमिटीमध्ये समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव अब्दुल रऊफ शेख यांचा समावेश झाल्याने छत्रपती संभाजीनगर सपा इकाईतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. अब्दुल रऊफ शेख हे मागील ३० वर्षांपासून पक्षाशी निष्ठेने जोडलेले असून या काळात त्यांनी विविध महत्वाच्या पदांवर जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
त्यांचे संघटन कौशल्य, कार्यकुशलता आणि जनसंपर्क यात ते विशेष पारंगत आहेत. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसीम आझमी यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास असून त्यांना सोपविण्यात येणारी प्रत्येक जबाबदारी ते इमाने-इतबारे पार पाडतात. आगामी काळातही त्यांच्या कार्यकौशल्यामुळे समाजवादी पार्टीचे संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांतून व्यक्त करण्यात येत आहे.