कांग्रेस-राष्ट्रवादीचे नामांतर वरून लोटांगण..!! मग विरोधाचा ढोंगीपणा कशाला करत होता? आता "उद्धवसेने" सोबत फरफटतच जावं लागणार...??

कांग्रेस-राष्ट्रवादीचे  नामांतर वरून लोटांगण..!! मग विरोधाचा ढोंगीपणा कशाला करत होता? आता "उद्धवसेने" सोबत फरफटतच जावं लागणार...??

     1990 पासून नामांतराचा घोळ तसं सुरू होता. महानगरपालिका असो की लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका,  प्रत्येक निवडणुकीत शिवसेना भाजप कडून "हिरवा की भगवा", "औरंगाबाद की संभाजीनगर", हा मुद्दा गाजत असे. तेवढ्याच तीव्रतेने हेच अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात ते अजित पवार या नामांतराच्या मुद्द्याला खोदून काढायचं...!!

     1999 ते 2014 पर्यंत सलग पंधरा वर्षे या दोन्ही सोकाल्ड सेक्युलर पक्षांनी नामांतराला बळ दिलं नाही. आज सत्ता व राजकीय अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या या नेत्यांनी उद्धव सेने समोर चक्क लोटांगण घातलं. साष्टांग दंडवत करत तुम्हीच आमचं सर्वोच्च नेते, तुम्हीच आमचं पालनहार सारखं हे  वागलेत. औरंगाबादची सभा  ऐतिहासिक ठरली. होणारच होती. दुर्दैव याचेच की ज्या दलित-अल्पसंख्यक तसेच ऐतिहासिक व सांस्कृतीक वारसा जपणाऱ्यांच्या मतावर सत्ता गाजवली, या नेत्यांनी नामांतर स्वीकारून त्या मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा भास होतोय....!!

      महाविकास आघाडी सरकार जेव्हा अखेरच्या घटका मोजत होते तेव्हा अखेरच्या कॅबिनेट बैठकीत नामांतराचा मुद्दा संमत करण्यात आला. खरं म्हणजे ही वेळ नव्हतीच. मीटिंग नंतर बाहेर पडलेल्या कांग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलं होतं, सेना नेत्यांनी अत्यंत घाईघाईने हे मंजूर करून घेतलं. तुमच्या तोंडात तेव्हा काय पॉपकॉर्न होतं? काही तरी सांगायचं व आम्ही ते मान्य करायचं हे शक्यच नाही, कारण तेव्हा तुम्ही जे सांगितलं ते थोतांड होतं, असो.

      शिंदे सरकार बसल्या बसल्या पुन्हा नामांतर करून गेलं. नऊ महिने निघून गेली मात्र आता पर्यंत कांग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नामंतराला कडाडून विरोध केला नाही. त्याचा अर्थ काय? म्हणजे तुमची नामांतराला मूक संमती होतीच. आता  वज्रमुठ सभेत तर अजित पवार, अशोक चव्हाण व ते आपले थोरात, सर्वांनी संभाजीनगर वरच जल्लोष केला ना..!!  मग तुम्ही नामांतर विरोधकांना धोका दिला नाही का?

     लक्षात घ्या जेव्हा केंद्र सरकार ने एनओसी दिलं तेव्हा पासून एकही कांग्रेस-राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याने या विरोधात आंदोलन केलं नाही. काही चुटपुट बेचारे  मुस्लिम दलित नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. वर्षानुवर्षे दलित मुस्लिमांची मते घेऊन सत्तेत मदमस्त असणाऱ्यांना लाज का वाटली नाही? तसं ज्या औरंगाबाद शहर व जिल्ह्यात या सोकाल्ड सेक्युलर  पक्षांचा वाटोळं झालाच आहे. गेल्या निवडणुकीत लुच्चेगिरी करणाऱ्यांना तर उमेद्वारच भेटलं नाही, निवडून येण्याची क्षमता काय? लढण्याची क्षमताही संपली आहे. एमआयएम सारख्या हैद्राबादींनी तर यांची टरररर.... फाटून दिली आहे. एकटा इम्तियाज जलील यांना भारी पडत आहे. विशेष म्हणजे ते राष्ट्रवादी कांग्रेसचे बिचारे कादिर मौलाना, काल पर्यंत एमआयएमच्या हैद्राबादी पक्षाचे पार्सल परत पाठविण्या साठी मेहनत घेत होते. विरोधात बोलत होते, ते ही शेवटी वैतागले. पक्ष नेत्यांच्या दुटप्पी भूमिके मुळे वैतागून हैदराबादी पक्षाचेच फॅन झालेत. (मौलनांनी बी आर एस पक्षात नुकताच प्रवेश घेतला आहे )

     गेल्या 2019 विधानसभा निवडणुकीत मराठवाड्याच्या एकूण 46 जागा पैकी कांग्रेस-राष्ट्रवादीला फक्त 16 जागा जिंकता आल्या होत्या. त्यात ही अनेक ठिकाणी पक्ष नव्हे तर त्या त्या नेत्यांचा स्थानिक वर्चस्व असल्याने हे यश मिळाले. यात अल्पसंख्यांकांचा मोलाचा वाटा होता.

     महाराष्ट्रात दलित-मुस्लिमांनी नेहमी सेक्युलर पक्षांच्या नेत्यावर विश्वास ठेवला.त्यांना डोक्यावर घेतले. जातीवादी पक्षांचा विरोध केला.पुरोगामी महाराष्ट्राची सामाजिक-सांस्कृतिक ठेवा जपला. मात्र दुर्दैवाने सत्तेसाठी हे सोकाल्ड सेक्युलर नेते एक्सपोज्ड झालेत. आता पर्यंत एमआयएम पक्षाला "बी" टीम म्हणणारे स्वतःहून उद्धवसेनेचे  "बी" टीम झालेत. महाराष्ट्रात कांग्रेस राष्ट्रवादीच्या दुटप्पी भूमिके मुळे अल्पसंख्यांक नाराज झाला. म्हणूनच उर्वरित महाराष्ट्रात शिंदे गटाला एक राजकीय स्पेस मिळणार आहे. हे स्पेस मुस्लिमांचा राजकीय स्पेस आहे.

     सध्याच्या राजकीय वर्तुळात तब्बल पन्नास टक्केच्या वर नामांतर विरोधी मतदार येत्या निवडणुकीत महत्वाची भूमिका निभावणार आहे. त्याच बरोबर दलित जनतेचा ही विश्वास गमावला आहे. तुमच्या  "कथनी करणी" मध्ये फरक आहेत. मराठवडयातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात येत्या महानगरपालिका, नगरपालिका,  लोकसभा व विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम दिसेल. लक्षात ठेवा, औरंगाबाद व उस्मानाबाद मध्ये तुमचा कडाडून विरोध होणारच. मुस्लिम-दलित नामांतर विरोधी व सांस्कृतिक वारसा जपणारे तुमचा उदो-उदो कदापि करणार नाहीत. कारण दस्तुरखुद्द तुम्हीच "बी" टीम झालात. निवडणुकीच्या रणांगणात उद्धवसेनेचे बोट धरून "बोलो आका..!! क्या फर्मान है" म्हणावे लागेल.
जय हिंद.

अशफाक शेख, वरिष्ठ पत्रकार, औरंगाबाद