वन नेशन, वन फसलेलं बिल: ‘मोदी है तो मुमकिन है’चा फुसका बार

वन नेशन, वन फसलेलं बिल: ‘मोदी है तो मुमकिन है’चा फुसका बार

          एकेकाळी ‘मोदी है तो मुमकिन है’ म्हणणाऱ्या भाजपाला आता ‘मोदी है तो झटकन चित’ म्हणण्याची वेळ आली आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या महत्त्वाकांक्षी विधेयकाचा लोकसभेत इतका घोळ झाला की, दोनतृतीयांश बहुमत तर सोडाच, भाजपाचे स्वतःचे सगळे खासदारही सभागृहात हजर नव्हते. तीन दिवस आधी व्हीप काढून खासदारांना धडाधड फर्मावल्या गेल्या, पण तरीही 20 खासदार बिनधास्त गायब! आता हा व्हीप मोदींना लागू होत नाही का, असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. कारण साहेब स्वतःच गैरहजर होते!

           विधेयक मंजूर होण्यासाठी 307 मतांची गरज होती, पण 269 मतांवर भाजपाची घसरगुंडी झाली. एवढंच काय, 198 खासदारांनी थेट विरोधात मतदान केलं. शेवटी काय, अरुण राम मेघवाल यांनी पराभव स्विकारत हा सगळा गोंधळ संयुक्त संसदीय समितीकडे (JPC) सोपवला. हाऊसच्या लाडक्या स्पीकरांनीही होकार दिला आणि ‘मोदी सरकार है तो जेपीसी जरूरी है’ हा नवा नारा राबवला.

         ‘वन नेशन, वन इलेक्शन’ म्हणजे मोदी सरकारचा खास ‘शोपीस’. पण त्यासाठीची तयारी आणि सादरीकरण पाहून वाटलं, यांच्याकडे ना नीती, ना नियोजन. यामुळे भाजपाचे दोन गट पडल्यासारखे झाले. महाराष्ट्र आणि हरियाणासारख्या राज्यांमध्ये भाजपाला माहीत आहे की, मोदींचा चेहरा दाखवला की लोक नको म्हणतात. त्यामुळे या राज्यांतले नेतेच निघून गेले असं वाटतं. गुपचूप नशिबावर खेळणाऱ्या या सरकारचं काय चाललंय, हे कुणालाच कळत नाही!

           गोंधळामुळे तरी सरकारचा मूळ हेतू साध्य झाला – गौतम अडाणींविरोधात चर्चाच होऊ न देणं. विरोधक अडाणींच्या भ्रष्टाचारावर चर्चा करू लागले, तेव्हा सरकारने एकाच फटक्यात ‘वन नेशन, वन इलेक्शन’चं कागदी विमान हवेत सोडलं. त्याचा जोर एवढा जास्त होता की, मीडिया लगेच भरकटला आणि अडाणी पार विसरले गेले. हा मुद्दा दबवण्यात सरकार नक्की यशस्वी ठरलं, पण त्याबदल्यात पक्षाच्या खासदारांनी मोदींनाच बघून दांडी मारली.

           जे खासदार गायब झाले त्यांच्यावर काही कारवाई होईल का? याची शक्यता नाही. नड्डा साहेबांना माहित आहे की, 240 खासदारांपैकी एकालाही काढण्याची जोखीम घेणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं. शिवाय मोदींचं उदाहरण पाहून बाकीच्यांनीही ‘तो गैरहजर तर आम्ही का नाही?’ असं म्हणायला सुरुवात केलीय. ‘आपलंही काही बिघडत नाही’ ही भावना आता पक्षात वाढली आहे.

         दहा वर्षांपूर्वी ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणत पुढे आलेली ही सरकार आता ‘सबका विश्वास, सबका उपहास’ झाली आहे. जीएसटी आणि नोटबंदीसारख्या निर्णयांनी आर्थिक ‘सर्जिकल स्ट्राइक’ केलेली सरकार आता स्वतःच अडखळत चालतेय. कधी ‘सुपरहिरो’ असलेले मोदी आता विरोधकांनाही दया वाटावी असे झाले आहेत. ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या पराभवाने हे स्पष्ट झालंय की, ही सरकार आता पांगळ्या अवस्थेत आहे.

          ‘वन नेशन, वन इलेक्शन’सारखे गाजावाजा करून आणलेले विधेयक हे फक्त मगरीच्या डोळ्यांच्या अश्रूंसारखं होतं. यामुळे ना देशाचं भलं झालं, ना सरकारचं भवितव्य उजळलं. आता भाजपाला त्यांच्या खासदारांची गैरहजेरी, जनतेचा राग आणि विरोधकांची एकजूट यांना सामोरं जावं लागेल. एक मात्र खरं – मोदी है तो मुमकिन है, पण आता काहीही ‘मुमकिन’ नाही!
-डॉ. रियाज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त (सेनि), औरंगाबाद.