"सदरक्षणाय खलनिग्रहणाय" आणि इस्लाम
महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" ज्याचा अर्थ आहे: "सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करणे."
इस्लाम धर्मातसुद्धा या संकल्पनेचे महत्त्व आहे, जिथे धर्मनिष्ठेचा मुख्य आधार म्हणजे समाजात न्याय, दयाळूता आणि शांती प्रस्थापित करणे आहे.
इस्लामच्या शिक्षांमध्ये एक विशिष्ट न्यायदृष्टिकोन आणि आदर्शवादी मूल्ये आहेत, जी समाजात सत्याचा प्रचार आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे पाठबळ देतात. कुरआन आणि हदीस या पवित्र ग्रंथांमध्ये मानवतेचा सन्मान, दुष्टांचा प्रतिकार, आणि सद्गुणांचा प्रसार करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
इस्लाममधील न्याय आणि शांतीची संकल्पना
इस्लाममध्ये अल्लाहने प्रत्येक मनुष्याला नीतिमत्ता, सत्य आणि न्यायाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि समाजातील खोट्या गोष्टींना विरोध करण्यासाठी ठरवले आहे. कुरआनने सांगितले आहे की, माणसाला दुष्ट शक्तींचा प्रतिकार करण्याचे आणि सत्याचा प्रचार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
उदाहरणार्थ, कुरआनमध्ये असे म्हटले आहे की,
"हे तुम्ही जे विश्वास ठेवलात, अन्यायाविरुद्ध उभे राहा आणि न्यायाचे साक्ष देणारे बना" (सुरह निसा, आयत १३५).
या आयतात सांगितले आहे की, समाजात अन्याय होत असेल, तर त्याविरुद्ध उभे राहणे आणि न्यायाचे समर्थन करणे आवश्यक आहे. हेच ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या संकल्पनेशी जोडलेले आहे.
इस्लामने मानवाच्या दयाळूपणावर भर दिला आहे. कुरआनच्या सुरह अल-हजरातमध्ये म्हटले आहे की, सर्व मानव एकच आहेत आणि त्यांच्यातील भेदभाव केला जाऊ नये. प्रत्येकाला न्यायाने वागवले पाहिजे आणि कोणाचाही अपमान किंवा अन्याय सहन केला जाऊ नये.
अन्यायाविरुद्ध प्रतिकार
इस्लाम धर्मात अन्याय आणि दुष्टांवर प्रतिकार करण्याचे आदेश आहेत. इस्लाममध्ये असं सांगितलं जातं की, जेव्हा कोणत्याही समाजात अन्याय प्रस्थापित होतो, तेव्हा त्याविरुद्ध उभे राहणे आवश्यक असते.
हदीसमध्ये प्रेषित मोहम्मद (स.) यांनी सांगितले की,
"जो व्यक्ती अन्याय होत असताना गप्प बसतो, तो अन्याय करणाऱ्याच्या पाठीशी उभा आहे."
हे संदेश स्पष्ट करतात की अन्यायाविरुद्ध बोलणे आणि त्याविरुद्ध उभे राहणे धर्माची अनिवार्य जबाबदारी आहे.
कुरआन आणि हदीस यांच्यातील मार्गदर्शन
कुरआन आणि हदीस या दोन्ही पवित्र ग्रंथांमध्ये ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ सारख्या संकल्पनांना समर्थन देणारे अनेक संदेश आहेत.
कुरआनमधील संदेश
१. सुरह बकरा (आयत १९०) - "आणि ज्यांनी तुमच्याविरुद्ध लढा उभारला आहे, त्यांच्या विरुद्ध लढा करा. परंतु, अतिरेक करू नका; कारण अल्लाह अतिरेक करणाऱ्यांना आवडत नाही."
२. सुरह नहल (आयत ९०) - "नक्कीच, अल्लाह न्याय, कृपाळूपण, आणि नातेवाईकांशी चांगुलपणा करण्याचे आदेश देतो; आणि निंदनीय, अश्लील गोष्टींना आणि अन्यायाला विरोध करतो."
या आयतांमधून स्पष्ट होते की, कुरआनने सन्मान, न्याय, आणि अन्यायाच्या प्रतिकाराला महत्त्व दिले आहे. हे आयते सांगतात की, माणसाला न्यायासाठी लढायला हवे परंतु अतिरेक न करता. म्हणजेच, न्यायाच्या मार्गावर असताना संयम ठेवला पाहिजे आणि गैरकृत्य किंवा उग्रतेला पाठिंबा देऊ नये.
हदीसमधील मार्गदर्शन
१. "जर तुम्ही एखादे वाईट कृत्य पाहिले तर तुम्ही त्याला तुमच्या हातांनी रोखले पाहिजे; जर तुम्ही ते हातांनी थांबवू शकत नसाल तर तुमच्या जिभेने विरोध करा; आणि जर तेही शक्य नसेल तर ते मनात नाकारावे, परंतु तो विश्वासाचा खालचा दर्जा आहे."
२. "प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम केले पाहिजे, त्यांच्यासाठी त्याचं भलं केलं पाहिजे, कारण जे दुसऱ्यांना मदत करतात, अल्लाह त्यांच्यावर दयाळूपणा दाखवतो."
या हदीसमधून प्रेषित मोहम्मद (स.) यांनी मानवतेचे रक्षण करण्याचे आणि वाईटाच्या प्रतिकाराचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
सद्गुणांचे रक्षण आणि समाजातील शांती प्रस्थापित करणे
इस्लाममध्ये न्याय आणि दुष्टांचा नाश करण्याच्या संकल्पनेतून मानवतेची उन्नती, एकता, आणि शांतीचा उद्देश आहे. कुरआन आणि हदीसने मानवतेचे कल्याण साध्य करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत.
सदरक्षणाय खलनिग्रहणाय या तत्त्वाची इस्लाम धर्मात पाळलेली मूल्ये स्पष्टपणे दिसतात.
- डॉ. रियाज़ देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त (सेनि), औरंगाबाद.