कुंजखेडा आरोग्य केंद्र तात्काळ सुरु करा : खासदार इम्तियाज जलील

कुंजखेडा आरोग्य केंद्र तात्काळ सुरु करा : खासदार इम्तियाज जलील

नविन बांधलेली इमारत अनेक वर्षापासून धूळखात; आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर

औरंगाबाद : कन्नड तालुक्यात काही वर्षापूर्वी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कुंजखेडा या रुग्णालयाचे नविन बांधकाम करण्यात आले होते; परंतु अद्यापपर्यंत तेथे वैद्यकिय अधिकारी, डॉक्टर्स व कर्मचार्‍यांची नियुक्ती न केल्याने लाखो रुपये खर्चून नविन रुग्णालयाची इमारत धूळखात पडलेली आहे. आरोग्य विभागाच्या या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे तसेच इतर खाजगी रुग्णालयांना आर्थिक फायदा व्हावा याकरिता रुग्णालय सुरु करण्यात येत नसल्याचा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी लावून आरोग्य विभागाच्या कामकाजावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

          ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी याकरिता विनाविलंब रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी, डॉक्टर्स व कर्मचार्‍यांची नियुक्ती करुन रुग्णालय सुरु करण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पत्राव्दारे खासदार जलील यांनी कळविले.

          खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले की, कन्नड तालुक्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कुंजखेडा या रुग्णालय इमारतीचे काही वर्षापूर्वी बांधकाम करण्यात आले होते. परंतु आरोग्य विभागाच्या हलगर्जी व निष्काळजीपणाच्या कारभारामुळे अद्यापपर्यंत सबब रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी, डॉक्टर्स व कर्मचार्‍यांची भरतीच न केल्याने लाखो रुपये खर्चुन बांधकाम करण्यात आलेले रुग्णालय आजपर्यंत सुरुच करण्यात आले नाही. हि बाब चुकिची व अतिशय गंभीरस्वरुपाची असुन संपुर्ण आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

          कुंजखेडा हे गाव जिल्हा परिषद सर्कलचे गाव आहे. कुंजखेडा व परिसरातील इतर सर्व गावातील गोरगरीब रुग्णांना तातडीची दर्जेदार वैद्यकिय सेवा मिळावी याकरिता प्रशासकीय मान्यतेसह निधीची उपलब्धता करुन देण्यात आली होती. सबब रुग्णालय इमारतीचे काही वर्षापूर्वीच बांधकाम पूर्ण होवून सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर सुध्दा रुग्णालय सुरु करण्यात आले नसल्याचे नमुद केले.

          कुंजखेडा ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित सर्व कार्यालय व अधिकारी यांना वारंवार विनंती करुन सुध्दा आरोग्य विभागातर्फे रुग्णालय सुरु करणेस्तव कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आणुन दिलेले आहे. फक्त काही खाजगी रुग्णालयांना आर्थिक लाभ व्हावा याकरिता जाणुनबुजुन वैद्यकिय अधिकारी, डॉक्टर्स व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येत नसल्याची माहिती प्राप्त होत असल्याचा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रात नमुद केले.

सुपर स्पेशिलिटी बिल्डींग लावणीचा कार्यक्रम घेण्यासाठी बनविली का ?

           घाटीत गोरगरीब रुग्णांना उच्च दर्जाची वैद्यकिय सेवा वेळेवर मिळावी यासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपये खर्चून सर्व सोयीसुविधायुक्त अद्यावत सुपर स्पेशिलिटी बिल्डींगचे बांधकाम करण्यात आलेले आहे. तसेच विविध शस्त्रक्रिया व उपचार करण्यासाठी आधुनिक वैद्यकिय यंत्रसामुग्री सुध्दा बसविण्यात आलेली आहे. परंतु आजपर्यंत डॉक्टर्स व वैद्यकिय कर्मचार्‍यांची भरती न केल्याने कोट्यावधीची बिल्डींग व यंत्रसामुग्री धुळखात पडलेली आहे. सुपर स्पेशिलिटी बिल्डींगमध्ये डॉक्टर्स, वैद्यकिय कर्मचार्‍यांची पदभरती होवून रुग्णांचे उपचार होणार आहे किंवा त्याठिकाणी लावणीचा कार्यक्रम घेण्यासाठी कोट्यावधीचा खर्च करण्यात आला आहे ? अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.