नाईट शिफ्ट मुळे शरीराचेच नाहीतर देशाचेही नुकसान होते?

नाईट शिफ्ट मुळे शरीराचेच नाहीतर देशाचेही नुकसान होते?

नाइट शिफ्टमुळं केवळ व्यक्तीच्या शरीराचंच नाही तर आणखीही मोठं नुकसान होतं. नाइट शिफ्ट करणाऱ्यांच्या देशाचं आर्थिक नुकसान देखील होतं, असं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांचं दुःख केवळ नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांनाच कळू शकतं, असं बऱ्याचदा कानावर पडतं. पोलीस दल असो वा वैद्यकीय क्षेत्र असो की, कॉल सेंटरमध्ये काम करणारे कर्मचारी असोत या क्षेत्रातील बहुतेकांच्या वाट्याला नाइट शिफ्ट हमखास येते. त्यात जर 'रिलिव्हर' आला नाही तर त्या कर्मचाऱ्यांची स्थिती काय होते याबद्दल विचारूच नका.

ट्रेसी लोस्कर या अलास्कामध्ये नर्सचं काम करतात. त्यांची शिफ्ट 16 तासांची असते. आठवड्यामध्ये त्यांना चार वेळा या शिफ्टमध्ये काम करावं लागतं. आणि असं काम त्या गेल्या 17 वर्षांपासून करत आहेत.

"सुट्टीनंतर पहिल्या दिवशी मी कामावर जाते, तेव्हा मी जगज्जेती आहे असं मला वाटतं आणि आठवड्याच्या चौथ्या दिवशी मला वाटतं की आता बस्सं झालं. हे सगळं सोडून कुठं तरी निघून जावं," ट्रेसी सांगतात.

"मला रात्रीचं वातावरण आवडतं. सर्व काही शांत असतं. रस्त्यावर ट्रॅफिक नसतं, गजबजलेली दुकानं नसतात आणि काम अतिशय शांतपणे करता येतं," असं ट्रेसी म्हणतात.

"पण नाइट शिफ्टचे दुष्परिणाम देखील आहेत. रात्रीचं काम केल्यावर तुमची निरीक्षण क्षमता आणि आकलन क्षमता कमी होते असं जाणवतं. परिस्थितीला प्रतिसाद देण्याची जी आपली क्षमता आहे ती जर कमी झाली तर? त्याने कामावर दुष्परिणाम होऊ शकतो," असं त्या म्हणतात.

जनसत्ताच्या बातम्या WhatsApp वर पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

जगभरात लक्षावधी लोक नाइट शिफ्टमध्ये काम करतात. औद्योगिक देशांमध्ये अंदाजे 7-15 टक्के लोक रात्रीच्या वेळी काम करतात असं प्रिन्सटन युनिवर्सिटीनं केलेल्या सर्व्हेमध्ये म्हटलं आहे.

जैविक घड्याळ (बायोलॉजिकल क्लॉक) बिघडल्यामुळं कर्करोगाचा धोका उत्पन्न होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं देऊनही रात्रपाळीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही.

नाइट शिफ्टची प्रथा सुरू तरी केव्हा झाली?
"थॉमस अल्वा एडिसननं विजेच्या दिव्याचा शोध लावला आणि मानवानं काळोखावर विजय मिळवला. पण सगळ्यांची 'झोप उडाली'. पहिला बळी गेला तो बिचाऱ्या झोपेचा," असं ऑक्सफर्डचे प्राध्यापक रसेल फॉस्टर म्हणतात.

बायलॉजिकल क्लॉक म्हणजे काय?
बायलॉजिकल क्लॉक हा शब्द आपल्याला नेहमी ऐकू येतो. पण या शब्दाचा नेमका अर्थ काय याचं उत्तर दिलं आहे ते फॉस्टर यांनी. ते म्हणतात, "आपल्या शरीरात खूप साऱ्या जैव-रासायनिक प्रक्रिया होत असतात. एका प्रक्रियेवर दुसरी प्रक्रिया अवलंबून असते."

जैविक घड्याळाचं काम नैसर्गिकरित्या सुरू असतं. त्यासाठी आपल्याला काही करावं लागत नाही.

निसर्गानं आपल्या शरीराची जडणघडण अशी बनवली आहे की सर्वकाही आपोआपचं सुरळीत राहतं. त्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागत नाहीत. पण खरा प्रश्न तेव्हाच निर्माण होतो जेव्हा यातील नियमितपणा जातो.

फॉस्टर सांगतात, "गंमत अशी आहे की आपलं अंतर्गत जैविक घड्याळ हे बाह्य जगावर अवंलबून असतं. याचं कारण आहे दिवस आणि रात्रीचं चक्र."

अनादी काळापासून मनुष्य प्राणी हा रात्री झोपत आला आहे आणि दिवसा काम करत आला आहे. प्रकाशाच्या संपर्कात आल्यामुळं जैविक घड्याळावर परिणाम होतो.

रात्रीच्या वेळी काम करणाऱ्यांचा प्रकाशाशी संपर्क कमी येतो. रात्री काम करून सकाळी घरी परतताना त्यांना लख्ख उजेडातून जावं लागतं. यामुळं बायलॉजिकल क्लॉकवर परिणाम होतो.

तुम्ही रोज नाइट शिफ्ट करता की नाही हा प्रश्न नाही. काही आठवड्यांनंतर जरी तुम्ही नाइट शिफ्ट केलीत आणि लख्ख उजेड पडल्यानंतर घरी जाणार असाल तर तुम्हाला त्रास होणारचं.

नाइट शिफ्टमुळं शरीरावर काय परिणाम होतो?
फॉस्टर समजावून सांगतात, "तुमच्या शरीरात काही असे हार्मोन्स असतात, त्यांमुळं तुमचा 'स्ट्रेस अॅक्सिस' काम करू लागतो. ज्यावेळी प्रचंड तणावाची किंवा संघर्षाची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी हे हार्मोन्स स्रवतात त्याला स्ट्रेस अॅक्सिस सुरू होणं म्हणतात. रात्रीच्या वेळी काम करणं म्हणजे परिस्थितीशी करावा लागलेला एक प्रकारचा संघर्षच आहे. त्यामुळे हा स्ट्रेस अॅक्सिस काम सुरू करू लागतो."

"रात्रीच्या जागरणामुळं रक्ताभिसरणातला ग्लुकोजचा स्तर वाढतो, रक्तदाब वाढतो. रात्रीच्या वेळी आपण फक्त काम करत नसतो तर नैसर्गिक चक्राविरोधातही लढा देत असतो," असं फॉस्टर म्हणतात.

तणाव वाढल्यामुळे हृदयरोगांचा धोका वाढतो, मधुमेहासारखे रोग होऊ शकतात. तणावामुळे तुमची रोग प्रतिकार क्षमता कमी होते. परिणामी, या सर्वांमुळे कोलो रेक्टल आणि कर्करोगाचा धोका संभवतो.

अर्थात हे सर्व दीर्घकालीन दुष्परिणाम आहेत. पण झोप पूर्ण न झाल्यामुळं तुमच्या शरीरावर काही काळातच दुष्परिणाम दिसण्यास सुरुवात होते. झोप पूर्ण न झाल्यास शरीराची झीज भरून निघत नाही. त्यामुळं सातत्यानं थकवा जाणवू शकतो.

आकलन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. समाजात वावरताना सामाजिक संकेत पाळण्याची आणि समानुभूतीची आवश्यकता असते, त्यावर परिणाम होतो.

"सर्वच कंपन्यांना नाइट शिफ्ट बंद करणं आता तर शक्य नाही. पण भविष्यात या कंपन्यांवर न्यायालयीन दावे केले जातील," असं भाकीत फॉस्टर करतात. "जर या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची योग्य काळजी घेतली नाही तर त्या अडचणीत येऊ शकतील," असं ते म्हणतात.

कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी होणं आवश्यक आहे. त्यासोबतच त्यांना योग्य आहार मिळणं आवश्यक आहे.

जर रात्री जागरण होणार असेल तर पोषक आहार मिळण्याची शक्यता कमीच असते असं एका संशोधनातून समोर आलं आहे. काही दिवसांचं जरी जागरण झालं तर शरीरातलं ग्रेलिन हार्मोनचं प्रमाण वाढतं. त्यामुळं तुमच्या आहारातलं कार्बोहायड्रेटचं प्रमाण 35-40 टक्क्यांनी वाढू शकतं.

झोपेच्या अभावामुळं होणारं आर्थिक नुकसान
"झोपेच्या अभावामुळं फक्त शरीराचं नुकसान होतं असं नाही. पण त्यामुळं आर्थिक नुकसान देखील होतं," असं रॅंड युरोप संशोधन संस्थेतील अर्थतज्ज्ञ मॅक्रो हफनर यांचं म्हणणं आहे.

"युनायटेड किंगडममध्ये झोपेच्या अभावामुळं वर्षाला 40 अब्ज पाउंडचं नुकसान होतं. या नुकसानाचं प्रमाण यूकेच्या जीडीपीच्या 1.8 टक्के आहे," असं हफनर सांगतात.

मग हे काम का करावं लागतं?
"जर नाइट शिफ्टमुळं शरीराचं इतकं नुकसान होतं तर हे काम सोडून का दिलं जात नाही? असा प्रश्न काही जणांना पडू शकतो. पण बऱ्याच जणांकडं काही पर्याय नसतो," असं ट्रेसी लोस्कर म्हणतात.

"नाइट शिफ्ट करण्याचे काही फायदे देखील आहेत," असं ट्रेसी सांगतात. त्या म्हणतात, "सध्या मी जे काम करत आहे त्यामुळं मला माझ्या कुटुंबासाठी वेळ मिळतो. मी सात रात्री काम करते आणि सात दिवसांची मला सुट्टी मिळते. म्हणजे मला महिन्याला दोन आठवड्यांची सुट्टी मिळते."

"मी माझ्या झोपेच्या वेळापत्रकाबाबत फार काटेकोर आहे. मी काय खावं काय खाऊ नये याचा विचार करते", अस ट्रेसी यांचं म्हणणं आहे.

"नाइट शिफ्ट अंतर्मुख लोकांना अधिक सोयीस्कर ठरू शकते. रात्री काम करणं आणि दिवसा झोपल्यामुळं बऱ्याचदा तुम्ही लोकांमध्ये जात नाही," असं त्या सांगतात.