मुंबईला ४०० किलो RDXने उडवण्याची धमकी देणारा समाजकंटक पकडला गेला : असे आहे त्याचं नाव

मुंबईला ४०० किलो RDXने उडवून लाखो लोकांचा बळी घेण्याची धमकी देणारा एक समाजकंटक अखेर नोएडा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. या दहशतवादी प्रवृत्तीच्या आरोपीचे नाव अश्विनी असे असून, त्याला अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांना एका व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे धमकी मिळाली होती. या मेसेजमध्ये लिहिले होते की, “लश्कर-ए-जिहादी” संघटनेचे १४ दहशतवादी मुंबईत घुसले आहेत आणि ४०० किलो RDX ३४ गाड्यांमध्ये ठेवून एक भयंकर स्फोट घडवणार आहेत, ज्यामुळे तब्बल एक कोटी लोकांचा बळी जाऊ शकतो.
ही माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तातडीने नोएडा पोलिसांशी संपर्क साधला. नोएडा पोलिस आयुक्त लक्ष्मी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. सखोल शोधमोहीम राबवून नोएडा सेक्टर-११३ परिसरात राहणाऱ्या समाजकंटक अश्विनीला स्वॅट टीमने बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी सांगितले की, अश्विनी हा मूळचा बिहारचा रहिवासी असून, तो गेल्या पाच वर्षांपासून नोएड्यात वास्तव्यास होता. पोलिसांनी त्याच्याकडून धमकीसाठी वापरलेला मोबाईल जप्त केला आहे.
या समाजकंटकाचा कोणत्या संघटनेशी संबंध आहे, कोणत्या राजकीय पक्षाशी त्याची नाळ जोडलेली आहे, अशा धमकीमागचा उद्देश नेमका काय होता – या सर्व मुद्द्यांचा तपास करणे तितकेच अत्यावश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या धमकीमागे मोठा कटकारस्थान तर नाही ना, याकडेही तपासयंत्रणांचे लक्ष आहे.
सध्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र हा प्रकार सामान्य शरारत किंवा खोडसाळपणा नसून, थेट दहशतवादी स्वरूपाचा आहे. त्यामुळे या समाजकंटकाविरुद्ध अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट (UAPA) अंतर्गत न्यायालयात खटला दाखल करणे अत्यावश्यक आहे.