आदर्श खासदार पुरस्कार गोज़ टू...:!! - इम्तियाज जलील
पुणे : डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अॅण्ड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा सहावा आदर्श खासदार पुरस्कार एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना दि.२७ जानेवारी रोजी पुणे येथे माजीमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जलील यांच्याव्यतिरिक्त शिवसेनेचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे व भाजपाचे खासदार रामदास तडस यांना सुध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संसदेतील अधिवेशनात संबंधित खासदारांचा विविध चर्चांतील सहभाग, सभागृहात परिणामकारकरीत्या प्रश्न उपस्थित करून त्याचा केलेला पाठपुरावा, सभागृहात मांडलेली खासगी विधेयकेतील चर्चा, मुद्देसुद भाषण, तरुणांना वैचारिक मार्गदर्शन आणि आपल्या मतदारसंघातील विविध सामाजिक व लोकोपयोगी कामे या निकषांवर 'आदर्श खासदार' पुरस्कारासाठी निवड केली जाते.
युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे स्थान निर्माण करण्यासाठी पुण्यातील डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अॅण्ड एज्युकेशनल संस्थेच्या वतीने यावर्षी सुध्दा युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पुण्यासह महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील व भागातील युवकांचा सहभाग होता.
युवकांमध्ये राजकीय आणि सामाजिक भान निर्माण करुन त्यांच्या सुप्त गुणांना विकासाची संधी देऊन सक्षम भारताच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक प्रगतीस योगदान देण्यासाठी आणि सशक्त युवा – सशक्त राजकारण – सशक्त भारत बनविण्यासाठी युवा संसद ची स्थापना २०१६ मध्ये जाधवर ट्रस्टने केली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर व उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांनी दिली.