HITFIRE : विद्यापीठाच्या पेपरफोडीचा भाजप ‘प्रणित’ चोट्टेपणा
श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विधी शाखेच्या चौथ्या सेमिस्टरचा ‘लॉ ऑफ ट्रस्ट’ या विषयाचा पेपर फोडण्याचा प्रकार 20 मे रोजी विदर्भातील सुविख्यात शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या (विदर्भ महाविद्यालय) परीक्षा केंद्रावर चव्हाट्यावर आला. कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांचे नाव असलेल्या विद्यापीठाची आणि विदर्भात लौकीक मिळविलेल्या विदर्भ महाविद्यालयाची या प्रकाराने बदनामी झाली. या प्रकारात जे मोहरे पकडले गेले त्यात भाजप प्रणित भारतीय जनता युवा मोर्चाचा शहर जिल्हाध्यक्ष प्रणित सोनी व अन्य दोन कार्यकर्ते आहेत. त्यांनी पेपरफोडीचा चोट्टेपणा परीक्षेत चोरमार्गाने उत्तीर्ण होण्यासाठी की ऐशोआरामासाठी पैसा कमाविण्याच्या हव्यापापोटी केला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ द्यायचा नसेल तर या गैरप्रकाराची पाळेमुळे निखंदून काढणे गरजेचे आहे.
प्रणित सोनी आणि भूषण हरकूट हे दोघे पेपर सोडविण्यासाठी तर सौरभ पिंपळकर हा त्यांच्या मदतीसाठी परीक्षा केंद्रात दाखल झाला होता. परीक्षा केंद्रात मोबाईल, कॅलक्यूलेटर आदी इलेक्ट्रॉनिक्स उपकरण वापरण्यावर बंदी असताना प्रणित सोनी, भूषण हरकूट यांनी मोबाईल परीक्षा केंद्रात नेला एवढेच नव्हे तर प्रश्नपत्रिका हातात येताच प्रणित याने मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढून तो केंद्राच्या इतरत्र इमारतीत बसलेल्या सौरभ पिंपळकर या साथीदाराला पाठविला. प्रणित सोनी याची 36 तर भूषण हरकूट याची आसन व्यवस्था 37 क्रमांकाच्या रुममध्ये होती. दोघांच्या बैठक क्रमांकात 61 विद्यार्थ्यांचे अंतर होते. तरीसुद्धा भूषण हरकूट अर्धातास विलंबाने येऊन रुम क्रमांक 36 मध्ये प्रणित सोनी याच्या मागील बेंचवर बसला. त्याने सौरभकडून कॉपीचे दोन सेट आणले, त्यापैकी एक संच स्वतःकडे ठेवला तर दुसरा संच प्रणित याला दिला. पहिल्यांदा रुम क्रमांक 37 मध्ये गैरहजर दाखविलेल्या भूषणला नंतर खाडाखोड करून परीक्षेला हजर दाखविण्यात आले. त्यावर दोन्ही रुमच्या पर्यवेेक्षकांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. परीक्षार्थी आणि पर्यवेक्षकांच्या संगनमताने हा गैरप्रकार सुरू होता. तेथून कुणीतरी या गैरप्रकाराची माहिती थेट सायबर पोलिसांना दिली. सायबर पोलिसांपाठोपाठ विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य विद्याधर ऊपाख्य भय्यासाहेब मेटकर तेथे पोहोचले आणि पेपरफूट व नियोजनबद्ध कॉपीप्रकरणाचा भंडाफोड झाला.
सायबर पोलीस परीक्षा केंद्रात पोहोचले, तेव्हा सौरभ पिंपळकर हा भूगोल विभागाच्या इमारतीमधून संशयास्पदरित्या बाहेर पडताना दिसला. त्याच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका होती. त्याची लिहिलेली उत्तरे त्याने व भूषण हरकूट व प्रणित सोनी यांच्यासाठी पाठविल्याची धक्कादायक माहिती दिली. भूषण हरकूट व प्रणित सोनीकडे त्याची कॉपी आढळली. केंद्राधिकारी डॉ. किरणकुमार जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रणित सोनी, भूषण हरकूट, सौरभ पिंपळकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षा गैरप्रकार टाळणारा अधिनियम 1982 च्या कलम 6, 7, 8 अन्वये दखलपात्र गुन्हा नोंदविला. मात्र गुन्ह्यात 1 वर्ष शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची तरतूद असल्याचे कारण देत पोलिसांनी त्यांना नोटीस देऊन सोडले. शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या परीक्षा केंद्रात भाजप पदाधिकारी व मनपा विधी समितीच्या माजी सभापतीकडून विधी शाखेच्या उत्तरपत्रिकेवर प्रातःविधीचा गंभीरप्रकार सुरू होता, तेव्हा संस्थेचे प्रभारी संचालक श्रीकृष्ण यावले मात्र घरी झोपलेले होते, असे त्यांनीच कबूल केले आहे. कारवाईचा भाग म्हणून केंद्रातील रोजंदारी कर्मचारी दिवाकर झनके याला कामावरून कमी तर केंद्रप्रमुख किरणकुमार जाधव, माहुलकर यांना परीक्षेच्या कामापासून दूर करण्यात आले. या कारवाईने त्यांचे काहीही वाकडे झालेले नाही. पेपरफुटीचा अहवाल विद्यापीठाला सादर करण्याससुद्धा संस्थेने मोठी दिरंगाई केली, असे असताना आता ‘पेपरफूट’ आणि ‘कॉपी’ यातील फरकाचा उहापोह सुरू झालेला आहे.
यासंपूर्ण प्रकरणावर काँग्रेस, युवक काँग्रेसने मोठा आक्षेप घेत काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. पेपरफुटीच्या प्रकरणात काही आर्थिक व्यवहार झालेला आहे का, पेपर सुरू असताना प्रश्नपत्रिका किती लोकांपर्यंत गेली, यात कुणाचे हात ओले झालेले आहे, पकडल्या गेलेल्या भाजप पदाधिकार्यापासून भाजपच्या इतर कार्यकर्त्यांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचली होती काय, पोलिसांनी भाजयुमो पदाधिकारी प्रणित सोनी व त्याच्या साथीदारांना अजामीनपात्र गुन्हा असताना का सोडले, त्यासाठी नागपूर-मुंबईहून कुणाचा दबाव होता का, वेगवेगळ्या रुममधील दोन विद्यार्थ्यांना एकमेकांच्या मागे बसविण्यासाठी पर्यवेक्षकावर कुणाचा दबाव होता, आदींचा त्यात समावेश आहेत. त्याची उत्तरे विद्यापीठ व पोलिसांना द्यावी लागणार आहेत.
प्रणित सोनी याने यासंदर्भात खुलासा करीत यात आपला कुठलाही दोष नाही. मोबाईल खिशात स्वीच ऑफ होता, तो स्वीच ऑफ मोबाईल पोलिसांनी जेव्हा सुरू केला, तेव्हा त्यात कुठल्याही प्रश्नपत्रिकेचा व सोडविलेल्या उत्तराचा फोटो नव्हता, म्हणून पोलिसांनी कुठलिही कारवाई न करता सोडून दिले. हे राजकीय हेतूने रचलेले कारस्थान आहे, असा दावा केलेला आहे. एवढ्यावरच न थांबता कॉपी हे प्रकरण महाविद्यालय व विद्यापीठ यांच्यातील आहे. यात पोलिसांनी थेट परीक्षा केंद्रात प्रवेश कसा केला. शिवाय त्याच दिवशी त्या केंद्रात अन्य 17 ते 18 विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले, त्यांच्यासाठी वेगळा न्याय आणि आपल्यासाठी वेगळा न्याय, असा आक्षेप नोंदविला आहे. हा आक्षेप ‘सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली’, या उक्तीत मोडणारा आहे.
राजकमल चौकातील ‘लव्ह अंबानगरी’ हा ‘सिम्बॉल’ प्रणित सोनी याचीच कल्पकता आहे. शिर्डी व अन्य शहरात असे सिम्बॉल आहेत, त्याची कॉपी त्याने यापूर्वी केली, त्याला कॉपीचा सराव आहे, असे म्हणण्याला आता वाव आहे. त्याच्या पक्षाचा सर्वोच्च नेत्याच्या शैक्षणिक पदवीवर गत पंधरवड्यात देशभर पुन्हा एकदा चर्चा झाली तेव्हा डिग्रीपेक्षा काम महत्त्वाचे, असे म्हणून शरद पवार यांनी त्या नेत्याची पाठराखण केली. प्रणितचे कॉपीप्रकरण त्यातुलनेने कुठेच नाही, याचा अर्थ सुटका आहे, असे अजिबात नाही. परीक्षा केंद्रात आपल्याकडे मोबाईल होता, हे प्रणितने ‘अॅडमिट’ केलेले आहे. ते त्याचे ‘कन्फेशनल स्टेटमेंट’ म्हणून ‘ट्रिट’ केले पाहिजे. भूषणने प्रणितच्या मागील आसनावर बसणे, दोन्ही पर्यवेक्षकांनी हा गैरप्रकार ‘अॅडजस्ट’ करणे, सौरभने उपलब्ध करून दिलेल्या कॉपी भूषणने प्रणितला देणे आणि झडतीत त्या कॉपी प्रणितकडे आढळणेे, या कड्या एकमेकांना जोडल्यास पकडले गेलेले कॉपीबहाद्दर शिक्षेपर्यंत पोहोचतील. फक्त ‘मॅनेज’ ची लागण झालेल्या यंत्रणेने कुठे ढेप खाऊ नये, एवढेच!
-गोपाल रा. हरणे, वरिष्ठ पत्रकार
अमरावती.
9422855496