महिलांना आज पासून एसटीत अर्धा तिकीट : 'महिला सन्मान योजना'

महिलांना आज पासून एसटीत अर्धा तिकीट : 'महिला सन्मान योजना'

अकोला, दि. 17 मार्च (प्रतिनिधी मोतेबर देशमुख) : महाराष्ट्र शासनाने यावर्षीचे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महिलांना एसटी बस प्रवास प्रवास भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत जाहीर केली. ही सवलत अर्थसंकल्पानुसार 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार होती. परंतु शासनाने ही सवलत जाहीर करताच एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांनी शासनाने जाहीर केलेल्या सवलतीचा आधार घेत दुसऱ्या दिवसापासूनच कंडक्टर लोकांकडे अर्धा तिकीट द्यावा म्हणून आग्रह धरण्यास सुरुवात केली. त्यामुळे कंडक्टर आणि महिलांमध्ये वादावादीच्या घटना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडल्या. 

          महाराष्ट्रातील शिंदे - फडणवीस सरकारने महिलांसाठी एसटी प्रवास भाड्यात महिलांना 50 टक्के सवलतीची  फक्त घोषणाच केली, मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही. अशी भावना एसटीत प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये व  पुरुषांमध्ये निर्माण होत असल्याने त्याचा परिणाम वोट बँकवर होऊ शकते अशी शंका शिंदे - फडणवीस सरकारला झाली. म्हणून या सरकारने 1 एप्रिल 2023 ची वाट न बघता काल गुरुवारी 16 मार्च 2023 रोजी रात्री उशिराने तडकाफडकी निर्णय घेत 17 मार्च 2023 पासूनच म्हणजे आज पासूनच एसटी बस मध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी पन्नास टक्के सवलत अमलात आणावी म्हणून आदेश दिले.

          महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुख्यालयाने त्यांचे परिपत्रक क्रमांक 6/2023 दिनांक 16 मार्च 2023 नुसार महाराष्ट्रातील एसटी चे सर्व कार्यालयांना 17 मार्च 2023 पासून सर्व महिलांना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये पन्नास टक्के सवलत सुरू करण्याबाबतचे निर्देश जारी केले. 

          या परिपत्रकात असे निर्देश देण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्याच्या सन 2023 - 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत घोषित केली आहे. सदर घोषणेच्या अनुषंगाने दिनांक 17 मार्च 2023 पासून सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत अनुज्ञेय करण्यात येत आहे. सदर सवलतीची प्रतिपूर्ती शासनाकडून करण्यात येणार आहे.

          सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेस मध्ये पन्नास टक्के सवलत अनुज्ञेय करणेबाबत निर्देश प्राप्त झाल आहे. त्यानुसार पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.....
• सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या साधी, मीडी/ मिनी निमआराम वातानुकूलित, शयन, आसनी, शिवशाही आसनी, शिवनेरी, शिवाईz साधी व वातानुकूलित इतर इत्यादी बसेस मध्ये पन्नास टक्के सवलत दिनांक 17 मार्च 2013 पासून अनुज्ञ करण्यात येत आहे.
• दोन सदरची सवलत ही भविष्यात राज्य परिवहन महामंडळाच्या ताब्यात नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस करिता देखील लागू राहील.
• सदर योजना ही 'महिला सन्मान योजना' या नावाने संबोधण्यात येत आहे.
• सदरची सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत अनुज्ञेय आहे.
• सदर सवलत शहरी वाहतुकीस अनुज्ञेय नाही.
• ज्या महिलांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे प्रवासाचे आगाऊ आरक्षण तिकीट (ऍडव्हान्स बुकिंग) घेतलेले आहे अशा महिलांना 50 टक्के सवलतीचा परतावा देण्यात येऊ नये.
• सवलत अनुज्ञेय केलेल्या दिनांक पूर्वीच्या आगाऊ आरक्षणावर केलेल्या प्रवासाच्या परतावा देण्यात येऊ नये.
•  सर्व महिलांना प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवासी संगणकीय आरक्षण सुविधा द्वारे, विंडो बुकिंग द्वारे, ऑनलाईन, मोबाईल ॲप द्वारे, संगणकीय आरक्षणाद्वारे तिकीट घेतील अशा प्रवाशांकडून सेवा प्रकार निहाय लागू असलेला आरक्षण आकार वसूल करण्यात यावा.
• सर्व महिलांना प्रवास शासनाने पन्नास टक्के सवलत दिली असल्याने 50% प्रवास भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे प्रवास भाड्यातील अ. स. निधी व वातानुकूलित सेवा करिता वस्तू व सेवा कर ची रक्कम आकारण्यात यावी.
• 75 वर्षावरील महिलांसाठी 'अमृत जेष्ठ नागरिक' योजनेच्या परिपत्रकीय सूचनेनुसार शंभर टक्के सवलत अनुज्ञेय राहील.
• 65 ते 75 या वयोगटातील महिलांना 'महिला सन्मान योजना: हीच सवलत अनुज्ञ राहील.
• पाच ते बारा या वयोगटातील मुलींना यापूर्वी प्रमाणेच 50% सवलत अनुज्ञेय राहील.