हाऊस हजबंड
घर सांभाळणे, मुलांचा अभ्यास, सासू-सासर्यांचं हवं-नको पाहणं, मंडई, साफसफाई, स्वयंपाक, डबे, रोजची देवपूजा, सणवार-कुळाचार, पाहुणचार- आजारपण हे सगळं काम 'बिनपगारी-फुल अधिकारी' या तत्त्वावर जन्मभर करणारी जमात म्हणजे 'गृहिणी'.
पण कधी विचार केलाय की या हाऊस वाइफलासुद्धा कंटाळा येत असेल, सुटी घ्यावीशी वाटत असेल, आयता चहा-नाष्टा, जेवण मिळावं वाटत असेल.. मग ही थोडीशी विश्रांती या हाऊस वाइफला देता येणार नाही का आठवड्यातून, पंधरा दिवसातून, सुटीच्या दिवशी किंवा मग वीकेंडला ही मुभा नवरे मंडळी आपल्या पत्नीला देऊ शकणार नाहीत काय? नुसतं हजबंड होण्याऐवजी या सुट्यांच्या दिवशी तरी हाऊस हजबंड होता येईल काय? म्हणजे थोडी भांडी घासणं, धुतलेलं धुणे वाळत घालणं, भांडी रॅकमध्ये लावणं. अंथरुणं आवरणं, झाडांना पाणी देणं, देवपूजा करणं, मुलांचा अभ्यास घेणं अशा छोट्या छोट्या गोष्टींनीदेखील गृहिणींना खुप मोठा आधार आणि मोकळा वेळ मिळू शकतो.
अर्थात स्वत;च्याच घरातली छोटी छोटी कामं करण्यांसाठी पूर्णवेळ हाऊस हजबंडच व्हायला हवे असे काही नाही. आपण पुरुष कर्ते असलो तरी सगळं कुटुंब खऱ्या अर्थने सांभाळून घेते ती स्त्रीच. ती कुटंब एकहाती सांभाळते म्हणून पुरुष 'कर्ते' पण मिरवू शकतात, म्हणूनच वाटतं की पूर्णवेळ हाऊस हजबंड होता आलं नाही तरी पार्टटाइम हाऊस हजबंड व्हायला काय हरकत आहे? आपल्या या कृतीमुळे आपल्या गृहलक्ष्मीचा भार थोडा हलका होईल, तिलाही स्वत:साठी वेळ काढता येईल, छंद जोपासता येतील, हे सर्व गृहिणींच्या बाजूने बोलत असलो तरी नोकरी करणाऱ्या महिलांची स्थितीही यापेक्षा वेगळी कुठे असते. ऑफिस आणि घर या दोन्ही ठिकाणचा तोल सांभाळायचा, दोन्हीकडची वर्किंग टार्गेट्स पूर्ण करायची, या सगळ्यात नोकरदार महिलांना तरी स्वतः:साठी वेळ कुठे मिळतो? हा प्रश्नच आहे. मग हा वेळ आपण नवरेमंडळींनी मिळवून दिला तर...? यासाठी स्वत:च्याच घरातल्या कामांसाठी हाऊस हजबंड होता आलें तर... तर गृहिणी आणि नोकरदार स्त्रियांना स्वत:साठी क्वालिटी टाइम देता येईल, स्वतःसाठी स्पेस घेता येईल आणि ही स्पेस संसारातल्या स्पेसमध्ये आनंदामध्ये भरून जाईल हे नक्की...
- वर्धराज मिर्जी
संपर्क : 9371026297